श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

नवा विषाणू… ☆ श्री सुनील देशपांडे 

सर्व जगावर अधिराज्य करत हाहाकार माजवत होता. माणसे मरत होती, माणसं जगत होती, माणसं धडपडत होती, माणसांचं जे काही व्हायचं ते होत होतं. पण त्यालाही अंत होताच.  येणार येणार म्हणून येत असलेली आणि टोचणार टोचणार म्हणून टोचणीला सुरुवात झालेली लस आली.   जिच्या आगमनाकडे आपण डोळे लावून बसलो होतो ती, होय तीच आली.  आणखी एखादा विषाणू अजून येईल, झुंडीच्या झुंडी येतील. माणसांना टोचून जातील आणि संपून जाईल तो विषाणू. भविष्यात, उद्या, परवा कधीतरी. नक्कीच जाईल.

पण

असा एक विषाणू आपल्याला लक्षातही येत नाहीये.  तो शिरतोय सगळीकडे.  प्रसार माध्यमातून, प्रचार माध्यमातून, निवडणूक प्रचारातून, शिमग्याच्या बोंबाबोंबीतून. कुणातरी दोघांच्या संभाषणातून, पुढाऱ्यांच्या भाषणातून,  कोणत्याही धर्माच्या धर्म प्रचारातून, उपदेशातून, निवडणुकीतून, राजकारणातून, गुंडगिरीतून आणि तथाकथित सभ्य माणसांच्या अंतर्मनाच्या गाभार्‍यातून. तो पसरतोय माणसा-माणसांच्या गप्पातून, छापील माध्यमातून, व्हाट्सअप मधून, फेसबुक मधून, किंवा जी जी काही समाज माध्यमे आहेत त्या सर्व माध्यमातून. तो फिरतोय, पसरतोय, झिरपतोय आणि माणसाचे जीवन कठिण करतोय. शांततेनं जगण्याच्या सर्व सोयी नष्ट करतोय.

यावर औषध नाही. लस नाही. एवढच नाही तर, यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांचे खून होतायत. दिवसाढवळ्या खून होतायत.

मग नवीन  महामानव तरी जन्माला यावेत.  परंतु त्यांच्याही भ्रूणहत्या होत आहेत.  महामानव जन्मालाच येऊ नये म्हणून गर्भसंस्कारा पासूनच त्यांचं महात्म्य मारून टाकायचे प्रयत्न चालू असतात.

यावर उपाय शोधायला हवा, संशोधक निर्माण व्हावेत त्यांना संरक्षण मिळावे. अशी इच्छा धरण्याशिवाय आपल्या हातात काय आहे ?  परंतु आशा करूया यासाठी कोणतीही लस आणि औषध नसलं तरी लोकांची नैसर्गिक सहनशक्ती प्रचंड मोठी आहे.  ते वाट पाहतील कितीतरी वाट पाहतील त्यावरील उपायाची

किंवा

एका नव्या प्रेषिताची.

खरंच तो जन्म घेईल ? की या मानवजातीचा अंतच जवळ आला आहे ?  मानवाचं नष्टचर्य हे या नव्या विषाणूतच दडलं आहे का?

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments