श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ रविवारचा फराळ… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
At what cost…. ?
अगदी आदिम काळापासून मनुष्य सुखाच्या शोधात असल्याचे आपल्याला आढळून येते.
प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात कमीअधिक प्रमाणात सुखदुःख भोगायला मिळतात, यात कोणाचेही दुमत असणार नाही.
जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, नाही का ?
प्रत्येक गोष्टीची योग्य ती किंमत आपल्याला चुकवावीच लागते. (एकतर आधी किंवा नंतर…)
सध्याच्या काळाचा विचार केला तर मनुष्य सुख ( वस्तूसापेक्ष, परिस्थिती सापेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष) मिळवण्यासाठी धडपड करीत असल्याचे आपल्या लक्षात येईल.
हे सर्व करीत असताना तो किती धोका पत्करत आहे, याचे त्याला भान राहिलेले आहे असे दिसत नाही….!
अधिकाधिक वस्तूंच्या संग्रह करण्यात, त्यासाठी संपत्ती कमविण्यात मनुष्याचा जवळजवळ पाऊण दिवस खर्च होत आहे…
मिळवलेले साधने उपभोगायला त्याच्याकडे पुरेसा वेळच नाही…!
सर्व संतांनी आपल्याला हेच सांगितलं आहे की शाश्वत सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि अशाश्वताच्या मागे लागलो आहोत….!
प्रपंच म्हटला म्हणजे सर्व वस्तू लागतात, पण शांत बसून विचार केला तर घरातील ९०% वस्तू आपल्याला अगदी क्वचित लागतात…
मनुष्यदेह दुर्लभ आहे, आपण तो नक्की कशासाठी खर्च करणार आहोत, कशाच्या बदल्यात खर्च करणार आणि कसा खर्च करणार याचा आपण सर्वांनी सावकाशीने विचार करावा.
मध्यंतराच्या वेळी विचार केला तर पुढची दिशा मिळेल आणि आपल्या जीवनाची ‘दशा’ होणार नाही.
पूर्वी वस्तूंचा चलन म्हणून उपयोग करीत असत.
असे असले तरी व्यवहार करताना ‘विवेक’ केला जाई.
हिंगजिऱ्याच्या बदल्यात कोणी कस्तुरी देत नसे….!
आपण ‘विवेक’ करावा….!
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈