सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ ‘अवघा रंग एक झाला…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(वृत्त – मुद्रिका १ला चरण १०+११, २रा चरण १४+१३)
☆
पांडुरंग द्वारी रंग एकचि जमला
अवघा रंग एक झाला विठू भक्तगण नाचला
*
नाही याति धर्म मुखातचि एक नाम
विठोबाच्या दरबारात भक्ताचेच काम धाम
*
टाळ मृदुंग गजर चंद्रभागेतीरी
वारकरी हरीचा दास शुद्ध भावे स्नान करी
*
तुळशीमाळ गळा शोभतसे पितांबर
चंदनाचा टिळा भाळी विराजे तेज मुखावर
*
साजिरा गोजिरा उभा जो विटेवरी
भक्ताच्या काजासाठी धावतसे तो श्रीहरी
*
पांडुरंग विठ्ठल नामी दंग झाला
अवघा रंग एक झाला रंग रंग एक झाला
☆
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈