श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘असं माहेर ग माझं’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आंबट कैरीच्या अर्धकच्च्या वयात बा. भ. बोरकरांची` ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता अभ्यासली होती. तेव्हाच गोमंतक भूमीच्या दर्शनाची ओढ मनात रुजली. पुढे कॉलेजच्या पाडाच्या कैरीच्या वयात बोरकरांच्या गोव्याच्या लावण्यभूमीचे वर्णन करणार्‍या अनेकानेक कविता वाचनात आल्या आणि ती लावण्यभूमी पुन्हा पुन्हा खुणावू लागली. तिथल्या माडांच्या राया त्यावर निथळणारे चांदणे, त्यामधून झिरपणारी प्रकाश किरणे, केळीची बने, तांबड्या वाटा, लाटांवरची फेनफुले हे सारं स्वप्नदृश्याप्रमाणे जागेपणीदेखील मिटल्या डोळ्यांपुढे साकार व्हायचं. उघड्या डोळ्यांनी हे आपल्याला कधी बघायला मिळेल का? कधी बरं मिळेल? हेच विचार तेव्हा मनात असायचे. ते वयही कविता आवडायचं होतं.

 पुढे गोव्यातील पोर्तुगिजांची राजवट संपुष्टात आली. गोवा अखील भारताचा अविभाज्य भाग बनला. गोव्यातील कॉलेजेस मुंबई विद्यापीठाला जोडली गेली आणि माझे मेहुणे (मामेबहिणीचे यजमान) गोव्याला संस्कृतचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रुजू झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचचीच ही गोष्ट. ते गोव्यात गेले, या बातमीनेच मी खूश झाले. कारण गोमंतकभूमी आता माझी स्वप्नभूमी राहणार नव्हती. मला तिथे जाणं आता शक्य होणार होतं. याची देही याची डोळा मला त्या भूमीचं सौंदर्य, लावण्य निरखता, न्याहाळता येणार होतं.

माझी बहीण लता तिथे जाऊन बिर्‍हाडाची मांडामांड करते न करते, तोच मीदेखील तिथे पोहोचले. त्या नंतर गोव्याला मी अनेकदा गेले, पण तिथे जातानाचा पहिला प्रवास मी कधीच विसरणार नाही. रात्री मिरजेहून बसलो. पहाटे पहाटे लोंढा स्टेशन आलं. कॉफी घेऊन मी खिडकीला जशी खिळलेच. लोंढा मागे पडलं आणि झाडा-झुडुपांच्या हिरव्या खुणा जागोजागी पालवू लागल्या.

कॅसलरॉकपासून हे गहिरेपण अधीकच गहिरं होऊ लागतं. नानाविध छटातून आणि आकारातून डोळ्यांना सुखवू लागतं. हे हिरवेपण दिठीत साठवता साठवता एकदम वेगळंच दृश्य डोळ्यापुढे साकारतं. शंकराची स्वयंभू पिंड वाटावी, अशा पहाडातून तीन धारांनी दुधाचा प्रवाह खाली उतरताना दिसतो. गंगेचा उगम काही मी पाहिला नाही. पण, दूधसागरचा हा धबधबा पाहून गंगोत्रीच्या दर्शनाइतकी कृतार्थता वाटली. सभोवताली चैतन्य फुलवण्यासाठी, जीवन घडवण्यासाठी हा प्रवाह दूधसागर नदी होऊन पुढे पुढे जाणार होता. गाडी दोन मिनिटं त्या धबधब्याशी थांबून पुढे पुढे जाऊ लागली पण मन मात्र अजूनही त्या धबधब्याखाली सचैल स्नान करत होतं. दूधधारेचा तो जीवनस्त्रोत अंगांगावर वागवीत होतं.

 मडगावमधलं बहिणीचं पहिलं घर गावाबाहेर टेकडीच्या उतारावर होतं. घरकामापुरतं घरात वास्तव्य आणि रात्री किंवा बाराच्या उन्हाच्या वेळेला घराचं छप्पर. एरवी टेकडी हेच घर झालं होतं तेव्हा. कलंदरपणे मनमुराद भटकायची हौस त्या टेकडीवर भागली. सकाळी सूर्योदय बघायला टेकडी चढायची. संध्याकाळी सूर्यास्त बघायला टेकडीचा माथा गाठायचा. दूरवर पश्चिम क्षितिजावर समुद्रात सूर्य बुडताना, टेकडीवरून बघणं मोठं बहारीचं वाटे. शिवाय हे सारं बघायला आम्ही घरचेच तेवढे. मी, बहीण, सत्यवती-सतन म्हणजे बहिणीची माझ्याएवढीच नणंद. कधी कधी प्रोफेसर महाशयही आमच्या पोरकटपणात सामील होत. सगळ्यात मला एक गोष्ट बरी वाटे. फिरायला जाण्यासाठी तयार होणं, कपडे बदलणं, वेणी-फणी, नट्टापट्टाटा करणं याची कटकट नव्हती. घरातही आम्ही तिघे-चौघे. टेकडीवरही आम्हीच तेवढे. नाही म्हणायाला गावड्यांची काही शाळकरी मुले इकडे तिकडे दिसत. किंवा कुणी कष्टकरी गावडे. त्यामुळे घरच्या पोषाखातआ आणि अवतारात बाहेर पडायला हरकत नव्हती. तेवढे १५-२० दिवस सूर्य केवळ आमच्यासाठीच उगवायचा आणि मावळायचा.

 कधी-मधी आम्ही गावात जात होतो. चालत जायचं आणि चालत यायचं. सार्वजनिक वाहन व्यवस्था अद्याप साकारलेली नव्हती. त्यावेळी वाटायचं, स्वच्छ, चकचकितडांबरी रस्ते केवळ आमच्यासाठी उलगडलेआहेत. गावात गेलं, की तिथल्या एका उडपी हॉटेलमध्ये अडीच आण्याचा मसाला डोसा खायचा आणि चालण्याचा शीण शमवायचा. कोलवा बीचवर एकदा गेलो होतो. तुरळक माणसं तिथे दिसली तेव्हा. आमच्यासारखीच नवशी-हौशी आलेली असणार. तेव्हाही वाटायचं पुळणीवरती रेतीचा मऊशार किनारा आमच्यासाठीच हांतरलाय. लाटांचं नर्तन केवळ आमच्यासाठीच चाललय. माडांच्या झावळ्यासुद्धा फक्त आमच्यासाठी झुलताहेत. तेव्हा असं वाटायचं कारण हे सारं दृश्य अनिमिषपणे पाहणारे फक्त आम्हीच असायचो.

 सुरुवातीला वाटायचं, काय करंटी इथली माणसं. निसर्ग आपलं लावण्य नाना कळांनी उधळतोय. यांची आस्वादाची झोळीच फाटकी. मग लक्षात आलं, इथला निसर्ग प्रत्येकाच्याच अंगणा-परसात आपलं वैभव उधळतोय. माझ्यासारखी निसर्ग सौंदर्य शोधत फिरण्याची यांना गरजच काय?

 त्यानंतर अनेकदा अनेक कारणांनी गोव्याला जाणं होत गेलं. एकदा गोव्याला गेले असताना माझी गोव्यातील मैत्रिण मुक्तामाला सावईकर मला तिच्या घरी जांबवलीला घेऊन गेली. तिच्या घरी त्यावेळी तिच्या आजोबांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव होता. त्यांच्या घरची आपुलकी, जिव्हाळा, आजही मनात घर करून आहे. तितकीच मनात खोलवर खोलवर रूतलेली आहे, जांबवलीच्या आस-पास केलेली मनमुक्त भटकंती.

 माडांच्या रायातून मुक्तामालाने आम्हाला एका छोट्याशा धबधब्याजवळ नेले. दीड पुरुष उंचीवरून खाली उडीमारणारा हातभर रुंदीचा तो पाण्याच प्रवाह म्हणजे कुशावती नदीचं उगम स्थान. हे मला नंत रकळलं. खालच्या सखल भागात गळाबुडी पाणी साठलेलं. छोट्याशा विहिरीएवढाच विस्तार असेल तिथे साठलेल्या पाण्याच्या तळ्याचा. तिथून पाण्याची निर्झरणी लचकत मुरडत दूर निघून गेलेली. शाळेत असताना अभ्यासलेला, कड्यावरूनउड्या घेणारा, लता-वलयांशी फुगड्या खेळणारा, बालकवींच्या कवितेतला निर्झर मी इथे प्रत्यक्ष पाहिला. मुक्तामालाची सात-आठ वर्षाची आत्येबहीण पण आमच्याबरोबर होती. ती म्हणाली, `’माई न्हायाचं. ‘ मुक्तामालाला घरी माई म्हणत. मी पण डिक्लेअर केलं, `माका पण न्हायाचं. मग आम्ही तिघी त्या गळाबुडी पाण्यात डुंबू लागलो. वरून कोसळणर्‍या प्रवाहाखाली किती तरी वेळ पाण्याच्या धारा झेलत राहिलो. आस-पास माणसांची वस्तीच काय, चाहूलही नव्हती. एक निळाभोर पक्षी तेवढा पंख फडफडवत दूर उडून गेला, तेव्हा वाटलं, तळ्याच्या पाण्याचा ओंजळभर तुकडाच सघन होऊन आणि चैतन्य रूप घेऊन एखाद्या दूतासारखा आभाळाकडे चाललाय. आस-पास सळसळत्या वृक्ष-वेलींशिवाय तिथे दुसरी कसलीच चाहूल नव्हती. सारा भवताल त्यावेळी आमच्यासाठी स्नानगृह झालेला. बराच वेळ पाण्यात डुंबल्यावर आम्ही बाहेर आलो, तेव्हा लक्षात आलं, आम्ही फिरण्यासाठी बाहेर पडलो होतो, नदीत डुंबण्यासाठी नव्हे. अर्थात बरोबर कपडे नेले नव्हते.

 मग आम्ही अंगावरच्या कपड्यांसकट स्वत:ला सूर्यकिरणी वाळवलं. पुढेपाच-सहा वर्षांनी लिरीलची जाहिरात पाहिली, तेव्हा वाटलं, या अनाघ्रात निर्झरणीचा लिरीलच्या अ‍ॅड एजन्सीलाही शोध लागला की काय?

 दुसर्‍या दिवशीजांबवलीहूनरिवणला आलो. कशासाठी तिथे गेलो होतो, हे आता आठवत नाही. आठवते ती फक्त केलेली भटकंती. कुणाकुणाच्या कुळागरातून, माडांच्या रायातून, पोफळीच्या बनातून, मेंदीसारखे पायरं गवणार्‍या लाल चुटूक, नखरेल पायवाटांवरून, पाण्याच्या पाटातून चटक-फटक पाणी उडवत केलेली भ्रमंती आणि आठवतात जागोजागी झालेलीस्वागतं. समोर आलेले पिवळे धमक केळीचे घड, थंडगार शहाळी आणि कोकमसरबत. सुमारे ४९- ५० वर्षापूर्वी गोव्याच्या इंटिरिअरमधून केलेली ही भटकंती, माझ्या सदाचीच स्मरणात राहिलीय.

 एका दिवाळीत गोव्याला असण्याचा योग आला. दिवाळीत महाराष्ट्रातील वातावरण जसं चैतन्याने रसरसलेलं असतं, तसं गोव्यात काही जाणवलं नाही. मात्र दिवाळीच्या म्हणजे नर्क चतुर्दशीच्या आदल्या दिवशी, घरोघरीच्या चुलाण्यावर लखखित घासून ठेवलेले पाण्याचे तांब्याचे हंडे दिसले. त्यावर पांढर्‍या मातीने आणि गेरूने नाजुक नक्षीकाम केलेलं. हंड्याची पूजा केलेली. वाटलं, आता लगेचच खालचं चुलाणं रसरसून पेटवावं. भोवती रांगोळी घातलेल्या पाटावर आडवं लावून बसावं. वासाचं तेल-उटणं लावून अंग छानपैकी चोळून –मोळून घ्यावं आणि हंड्यातील वाफाळलेलं पाणी घेऊन शिणवठा, हवेमुळे जाणवणारी चिकचिक दूर करावी. ताजं-तवानं, प्रसन्न व्हावं, पण या सार्‍यासाठी आणखी सात-आठ तास तरी मला धीर धरायला हवा होता.

 दिवाळीत गोव्यात सगळ्यात जास्त महत्व असतं, ते नर्क चतुर्दशीला. नरकासुरांची मिरवणूक (आपल्याकडे गणपती विसर्जनाची असते तशी) आणि नरकासूर व श्रीकृष्णाचे लुटुपुटीचे युद्ध पाहत आम्ही रात्र जागवली. दुसर्‍या दिवशी सकाळी सगळं लवकर आवरून प्रा. सोमनाथ कोमरपंतांकडे काणकोणला गेलो. ते साधारणपणे १९८०साल असावं.

कोमरपंतांच्या अंगणात बाहेरच्या उंबर्‍याशी टेकलो. पांढर्‍या स्वच्छ मऊ रेतीनं आमच्या पावलांचं स्वागत केलं. वाटलं, चपला काढून तिथेच फतकल मारून बसावं आणि रेतीचा तो मऊ मुलायम स्पर्श अंगभर शोषून घ्यावा. ती रेती, पाढरी वाळू मुद्दाम आणून शोभेसाठी पसरलेली नाही, तर रेतीचंच अंगण आहे, रेतीचीच जमीन आहे, हे लक्षात यायला खूप वेळ लागला. कोमरपंतांकडे इतवकं आग्रहाचं जेवण झालं, की पाय पसरून बसताक्षणीच डोळे मिटू लागले. पोहे आणि मासे यांचे अगणित प्रकार. आम्ही मात्र, गाढवाला गुळाची चव नसल्याने, माशांची कालवणे बाजूला सारली आणि पोह्यांचे विविध प्रकार आस्वादत, कौतुकत राहिलो. जेवल्यानंतर सुस्ती आली, तरी उठलोच. समुद्रावर जायचंहोतं. पाळोळ्याचा समुद्र किनारा कोमरपंतांच्या घराच्या अगदी जवळ. परसात असल्यासारखा. गोव्याला येणर्‍या पर्यटकांमध्ये कळंगुट, कोलवा, मिरामार हे सागर किनारे महत्वाचे. पाळोळ्याच्या सागर किनार्‍यावर आम्ही पाऊल ठेवलं आणि अक्षरश: स्तिमित झालो. अगदी अनाघ्रात सागर किनारा. `पदोपदी नवांमुपैती’. पावला-पावलाव रलावण्याचा अनुपम साक्षात्कार घडला. समुद्राच्या पाण्याचा छोटासा प्रवाह वळून आत आलेला. शेतातल्या झडा-झुडपापर्यंत पाणी पोचावं, म्हणून शेता-भाटातून पाट काढतात, इतका छोटा प्रवाह. तो ओलांडून पुढे गेलो, आणि एक ठेंगणी-ठुसकी टेकडी स्वागत करती झाली. टेकडीवर चढून गेलो आणि चारीबाजूला नजर फिरवली. सागरानं चंद्रकोरीचा आकार धारण केलेला. प्रत्येक दिशेलाच काय, प्रत्येक कोना-कोनातून वेगळीच रम्यता. कुठे दूरवर आकाशाच्या निळाईत मिसळून गेलेली समुद्राच्या पाण्याची निळाई, कुठे निळ्या पाण्याने वेढलेला, कासवाच्यापाठीसारखा दिसणारा जमिनीचा तुकडा, कुठे हिरवी गोल टोपी पाण्यात पालथी घालावी तशी दिसणारी हिरवीगार छोटीशी टेकडी. सारं भवताल मनस्वी. आत्ममग्न. गोव्यातले सारेच सागरकाठ स्वच्छ सुंदर देखणे. पण पाळोळ्याला अनुभवलेली निरामय मनस्विता मी पाहिलेल्या इतर किनार्‍यानवर मला प्रतीत झाली नाही. पाळोळ्याच्या सागरकाठाची रमणीयता आज आठवताना आणि तो अनुभव शब्दबद्ध करताना जाणवतय, आपलं अभिव्यक्तीचं सामर्थ्य किती तोकडं आहे. फारच तोकडं.

 गोमंतकीय दुसरं साहित्य संमेलन डिचोली इथे झालं. अध्यक्ष होते, पंडित महादेवशास्त्रीजोशी. या संमेलनात माझ्या बहिणीचा सौ. लता काळेचा बालगीतांचा संग्रह `जमाडीजम्मत’ प्रकाशित होणार होता, तिच्या संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा गोव्यात जाणं झालं. या निमित्ताने तिथे गेलेल्या मला संमेलनाचा आनंद मनमुराद घेता आला. प्रकाशन करणारे अध्यक्ष पंडित महादेवशास्त्री जोशी आमच्या जवळिकितले. म्हणजे सौ. सुधातार्इंना माझे मामा बहीणच मानत. त्यामुळे त्यांच्या हस्ते लताच्या पुस्तकाचं प्रकाशन ही गोष्ट आम्हा सर्वांनाच अप्रूप वाटणारी. संग्रहाचं प्रकाशन अगदीऔपचारिकपणेच झालं, पण या संमेलनाच्या निमित्ताने तिथे गेलेल्या मला संमेलनाचा आनंद मनमुराद घेता आला या संमेलनाच्या निमित्ताने तिथे आलेल्या अनेक समान धर्मियांशी माझी नव्याने ओळख झाली. जुन्या ओळखींना नव्याने उजाळा मिळाला. संमेलनाला प्रेक्षकांची खूप गर्दी होती, तरीही वाटलं, इथल्या वातावरणातला नित्याचा निवांतपणा ही गर्दीदेखीलं पांघरून बसलीय. व्यासपीठावरचे कार्यकम रंगले, त्याहीपेक्षा अधीक रंगल्या खोल्या-खोल्यातून झडणार्‍या गप्पांच्या मैफली आणि हो, कवितांच्यासुद्धा. विठ्ठल वाघ यांनी व्यासपीठावरून सादर केलेली आणि नंतर पोरा-टोरांच्या, नवकवींच्या आग्रहामुळे खोल्या-खोल्यातून पुन्हा पुन्हा म्हंटलेली, खानदेशी लयकारीची डूब असलेली कविता `’मैना उडून चालली आता उदास पिपय’ ही कविता आणि नंतरच्या काळात` ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातलं त्यांचं लोकप्रिय झालेलं गीत `काळ्या मातीत मातीत तिफण चालतय.. ‘ या कविता म्हणजे खानदेशी लयकारीतलं त्यांचं तेव्हाचं कविता-वाचन अजूनही स्मरणात आहेत. प्रा. विठ्ठल वाघ हेही व्यासपीठावरला भारदस्तपणा जरा बाजूला ठेवून, शिंग मोडूनवासरात शिरले. बा. सा. पवार, पुष्पाग्रज, मेघना कुरुंदवाडकर, चित्रसेन शबाब या सार्‍या पोरांबरोबर त्यांच्यातलेच होऊन गेले. गोव्यातील अनेक नवोदित कवींचं कविता वाचन, व्यासपीठापेक्षा, खोल्या- खोल्यात रंगलेल्या अनौपचारिक बैठकीतून अधीक रंगलं. त्या सगळ्यांच्या कविता ऐकता ऐकता, एक गोष्ट सहजच जाणवून गेली. अलिकडे बर्‍याच कविमंडळींच्या काव्यातून ऐकू येणारा कटुतेचा सूर, विद्रोहाची, विस्फोटाची जहालता, या गोमंतीय कविमंडळींच्या कवितेतून अगदी तुरळकपणे आली आहे. मुक्तछंदापेक्षा वृत्तबद्ध, संगितात्मक रचना करण्याकडे त्यांचा अधीक कल दिसला. मनात आलं, हाही त्यांच्या भवतालचाच प्रभाव असेल का? समुद्राची गाज तालबद्ध. माडांचं डोलणं तालबद्ध. वार्‍याचं वाहणं तालबद्ध. या सार्‍या लयकारीनं भारलेल्या परिसरात, मनात उमटणार्‍या भावनाही लय घेऊनच येणार. या आश्वासक निसर्गाच्या सहवासात माणूस आनंदित होईल. त्याच्या गूढतेने चकित होईल. क्वचित दिङ्मूढही होईल, पण त्याच्यात कडवटपणा येणार नाही. कधीच नाही. डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात, गोव्यातील बुजुर्ग साहित्यिक, बा. द. सातोस्कर यांचा परिचय झाला. नुसता परिचयच नव्हे, तर इतकी आत्मीयता आणि जिव्हाळा निर्माण झाला, की त्या क्षणापासून ते मला मुलगीच मानू लागले. दादा सातोस्कर या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा गोव्यातखूपच दबदबा. फार मोठ्या माणसांशी माझं सहसा जमत नाही. जमतनाही, म्हणजे काय, तर माझ्यातील न्यूनगंडाची भावना अधीक गडात होत जाते. वागता-बोलताना सतत अंतर जाणवत राहतं. त्यांच्याशी वागता-बोलताना एक प्रकारचं दडपण येतं. धाकुटेपणाची भावना मनाला सतत वेढून राहते. पण दादांचं मोठेपण असं, की हे अंतर त्यांनी स्वत:हून तोडलं आणि ते आपल्या मनमोकळ्या वागण्यानेआणिबोलण्याने धाकुटेपणाच्या जवळ आले. `उदंड साहित्य प्रेम’ हाच केवळ आम्हालाजोडणारा भावबंध. एरवी त्यांची साहित्य सेवाकिती प्रचंड. एक लेखक म्हणून, संपादक म्हणून, प्रकाशक म्हणून. मी तर अजून धुळाक्षरेच गिरवित होते.

 पुढच्याच वर्षी मंगेशीला झालेल्या गोमंतकीय तिसर्‍या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. संमेलनाला मला त्यांनी आवर्जून निमंत्रण दिले होते. संमेलनासाठी तिथे जमलेले गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी, कृ. बा. निवुंâब अशा किती तरी मोठमोठ्या लोकांशी त्यांनी माझी ओळख`ही माझी मुलगी उज्ज्वला. कथा-कविता फार चांगल्या लिहिते’, अशी करून दिली. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्‍या या व्यक्तीने तितक्याच तोला-मोलाच्या महान व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, मला अगदी संकोचल्यासारखंच नव्हे, , तर ओशाळल्यासारखंही झालं. त्यांच्या एका गोवेकर मित्राने थट्टेने विचारले, `आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला झाली तरी केव्हा?’ ते सहजपणे म्हणाले, `गेल्या वर्षीच्या डिचोलीच्या साहित्य संमेलनात!’

मनात आलं, नातं जोडणं सोपं असतं, पण आपल्याला निभावणार आहे का ते? ज्या अभिमानाने त्यांनी माझी ओळख एक लेखिका म्हणून करून दिली, तो अभिमान सार्थ ठरेल, असं लेखन खरोखरच होणार आहे का आपल्या हातून?

बा. द. सातोस्करांशी मुलीचं नातं जोडल्यानंतर साहजिकच त्यांचा गोवा माझे`माहेर’ झाले. माझी मामेबहीण लताताई तर मडगावला होतीच होती. एके काळची माझी स्वप्नभूमी अशी माझं `माहेर’ बनली. माझ्या तापलेल्या, त्रासलेल्या मनाला गारवा देण्यासाठी या माहेराने आपलीहिरवी माया माझ्यासाठी पसरून ठेवली. गोव्यातील करंजाळे येथील दादांचे घर `स्वप्नगंध’ आणि घरातले दादा-आई जेव्हा आठवतात, तेव्हा तेव्हा विजय सुराणाच्या कवितेच्या ओळी अपरिहार्यपणे ओठांवर येतात,

 ‘असंमाहेर ग माझं, गाढ सुखाची सावली

 क्षणभरी पहुडाया, अनंताने अंथरली. ’

अलिकडे गोव्याच्या प्रत्येक ट्रीपमध्ये गोव्याचं हिरवेपण कमी कमी होऊ लागलेलं जाणवतय. त्यातच नुकतीच अरुण हेबळेकरांची बहुदा, `रुद्रमुख’ ही कादंबरी वाचनात आली. कादंबरी वाचून झाली आणि मन अतिशय उदास, अस्वस्थ झालं. कादंबरी होती, गोव्यात वाढत जाणार्‍या प्रदूषणाविषयी. कादंबरी वाचली आणि जिवाचा थरकाप झाला. गोवा- माझं माहेघर, इथं मिळणारं क्षणाचं सुख, गारवा, डोळ्यांना लाभणारी तृप्ती, अनंत काळाच्या ताणाचा नि मनस्तापाचा त्याने विसर पडतो. मग संजीवनी मिळाल्यासारखं ताजं-तवानं, टवटवित होता येतं. मग वाटलं हे क्षणाचं सुख तरी आपल्याला अनंत काळ लाभणार आहे का? की तेही प्रदूषणाच्या धुक्याने वेढलेलं असेल.

 आता इतक्यावर्षानंतर गोवा आता पहिल्यासारखा राहीला नाही, असे गोव्याचेच लोक म्हणताहेत. त्यात आता बा. द. सातोस्कर म्हणजे दादा राहिले नाहीत. माझ्या बहिणीने लताने ८-१० वर्षापूर्वी गोवा सोडून पुण्याला बिर्‍हाड केले. आता तर तीही तिथे उरली नाही. आता माझे गोव्याचे माहेर क्षणभरी पहुडायाही उरलेनाही.

© सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments