श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ३५ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- आम्ही बाबांजवळ पोचण्यापूर्वीच बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता… ! आम्ही त्यांच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरच उभे तरीही त्यांच्यापासून लाखो योजने दूरसुद्धा… !!
बाबांचं असं अनपेक्षित जाणं पुढे येणाऱ्या अतर्क्य अनुभवांना निमित्त ठरणार होतं! )
बाबांचं असं अनपेक्षित जाणं माझं भावविश्व उध्वस्त करून गेलं होतं. मी अगदी हताश, हतबल होऊन त्यांचे दिवस होईपर्यंत आई व भावंडांबरोबर असूनही स्वतःच्याच दुःखात रुतून बसलो होतो. माझ्याही नकळत्या वयापासून वर्षानुवर्षे साठत गेलेल्या बाबांच्या कितीतरी आठवणी मनात गर्दी करीत रहायच्या ! त्या आठवणींमधेच मी गुंतून पडायचो. गप्पगप्प रहायचो.
बाबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अगदी साध्या साध्या गोष्टी पण ते गेल्यावर मात्र त्यांचं महत्त्व आणि मोल आत्ता खऱ्या अर्थानं जाणवतंय असंच वाटत रहायचं. त्या आठवणींमधली बाबांची कितीतरी रूपं! सगळीच आज हरवून गेलेली तरीही हवीहवीशी!! प्रतिकूल परिस्थितीतही कधी हतबल न होणारे, दत्त महाराजांवर अतिशय निखळ, दृढ श्रद्धा असणारे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती जपणारे, आर्थिक ओढग्रस्तीतही समाधानाने रहाणारे, जांभळाच्या झाडाचं लाकूड ठिसूळ असतं, आम्ही पडून इजा करुन घेऊ नये म्हणून काळजीपोटी आम्हाला कधीच दारातल्या जांभळाच्या झाडावर चढू न देता स्वतःचा जीव धोक्यात घालून, आमच्यासाठी रोज स्वत: झाडावर चढून आम्हाला ताजी टपोरी जांभळं काढून देणारे, आर्थिक ओढग्रस्तीमुळे आमचे अगदी साधे बालहट्टही बऱ्याचदा पुरे करता यायचे नाहीत तेव्हा त्यांच्या नजरेत भरून राहिलेली दुखरी खंत केविलवाणं हसत लपवायचा प्रयत्न करणारे… अशी बाबांची कितीतरी रूपं!
बाबा कधीच आमच्यावर हात उगारणं सोडाच आम्हाला रागवायचेही नाहीत. कधीतरी अतीच झालं तर चिडून आईच आम्हाला धपाटा घालायला यायची तेव्हाही, ” मारु नकोस गं.. लहान आहेत ती.. ” म्हणत आमची सुटका करायचे.. !
आम्हा सर्वच भावंडांवर त्यांचं प्रेम, माया होतीच पण त्याबाबतीत त्यांच्याकडून प्रत्येक वेळी झुकतं माप मिळत गेलं होतं ते मलाच. माझं काही खास कर्तृत्त्व होतं असं नाही, पण लहान वयात दोन इयत्ता एकदम करून मी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माझ्या भावाबरोबर तिसरीत शाळेत जाऊ लागलो याचंच त्यांना अप्रूप वाटायचं. माझ्यापेक्षा तो अभ्यासात कितीतरी पटीने हुशार. त्यामुळेच परीक्षेत माझ्यापेक्षा कितीतरी जास्त मार्क मिळवून तो नेहमी नंबरात असायचा. त्याला शाबासकी मिळायची पण जवळ घेऊन कौतुक मात्र माझंच व्हायचं. बाबा गेल्यानंतर हे सगळं आठवायचं तेव्हा मात्र एक वेगळीच रुखरुख मन कुरतडू लागायची. बाबांकडून लहानपणापासून असं उदंड प्रेम, माया मिळवूनही त्यांची सेवा करणं मात्र माझ्या नशिबात नव्हतं. बाबांचं आजारपण सुरू झाल्यापासून मी नोकरी निमित्ताने कायम त्यांच्यापासून दूर तिकडे मुंबईत. आई आणि माझे दोन्ही भाऊ यांनी बाबांच्या संपूर्ण आजारपणात त्यांची अतिशय प्रेमाने, मनापासून सेवा केली पण मला मात्र ते समाधान मिळालं नाही याचं दुःख मनात घर करुन राहिलेलं! बाबांचे दिवस होईपर्यंतच्या प्रत्येक क्षणी मला ते त्रास देत राहिलं होतंच आणि पुढंही दीर्घकाळ मनात रुतून बसलं होतं. त्या विचारात लपलेली माझ्या मनातली अस्वस्थता बाबांच्या पर्यंत मी न सांगता अलगद जाऊन पोचलेली होती याचा प्रत्यय देणाऱ्या घटना पुढे माझ्या आयुष्यात जेव्हा घडल्या तेव्हा मृत्यू आणि पुनर्जन्मामागच्या गूढ रहस्याची दारं थोडीतरी किलकिली झाली पण ते सगळं मधे बरीच वर्षे उलटून गेल्यानंतर! पण त्याही आधी बाबा गेल्याच्या आम्हा सर्वांच्याच मनातल्या दुःखावर हळुवार फुंकर घालून ते दु:ख हलकं करु पहाणारी एक घटना माझ्या मोठ्या भावाच्या संदर्भात घडली तीही आश्चर्याने थक्क व्हावं अशीच होती. आमचं समाधान करता करता बरंच कांही हातचं राखून ठेवणारी आणि म्हणूनच अनाकलनीय वाटावी अशीच ती घटना होती!
ती घटना अतुलच्या, माझ्या पुतण्याच्या तान्हेपणीची. बाबा सप्टेंबर १९७३ मधे गेले. त्यानंतर वर्षाच्या आत भावाचं लग्न करायला हवं म्हणून आमच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी वधुसंशोधन सुरु केलेलं. योगच असे जुळून आले की बाबा जाऊन वर्ष व्हायच्या आत मे १९७४ मधे भावाचं लग्नही झालं. अतुलचा म्हणजे माझ्या पुतण्याचा जन्म १९७५ मधला. जन्मतः तो अतिशय चांगला, तब्येतीने छान, सुदृढ होता. काळजी वाटावी असं कांही नव्हतंच. पण बाळंतपणानंतर तो तीन महिन्याचा झाल्यावर वहिनी त्याला घेऊन इस्लामपूरला परत आल्या आणि अचानक कधी कल्पनाही केली नव्हती असं विपरीत घडलं. तोवर एरवी अगदी शांत, लाघवी असणारं बाळ दिवसभर अगदी आनंदी, खेळकर असायचं पण तिन्हीसांजेला मात्र कर्कश्श रडू लागायचं. कितीही थोपटलं, जोजवलं, शांत करायचा प्रयत्न केला तरी त्याचं रडणं थांबायचंच नाही. खूप रडून थकल्यानंतर भुकेल्या अवस्थेतच मलूल होऊन झोपून जायचं. दुसऱ्या दिवशीही असंच घडलं. वरवर लक्षात येईल अशी कांहीच लक्षणं जाणवली नाहीत आणि आजीच्या बटव्यातल्या औषधाचाही काही उपयोग झाला नाही तेव्हा मात्र तातडीने त्याला ओळखीच्या डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी बाळाला तपासलं. सगळंच तर व्यवस्थित होतं. ‘एकदम वातावरण बदलल्यामुळं रडत असेल. काळजी करण्यासारखं कांहीही कारण नाही’ एवढा दिलासा डॉक्टरांनी दिला तेव्हा मनातली भीती काही अंशी कमी झाली खरी पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळीही अंधार पडू लागताच बाळ रडू लागलं तसा मात्र सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला. तो गुरुवार होता. आई देवापुढे दिवा लावत होती. तिने घाईघाईने दिवा लावून देवाला मनोभावे नमस्कार केला. तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊक. ती जागची उठली. बाहेर येऊन तिने वहिनींकडून बाळाला घेतलं. मांडीवर घेऊन त्याला थोपटत शांत करायचा प्रयत्न करत असतानाच तिने भावाला जवळ बोलावलं. म्हणाली, “हे बघ, मी देवापुढं दिवा लावून आलीय. आज गुरुवार आहे. तू आत जाऊन देवाला हात जोडून प्रार्थना कर, डबीतला चिमूटभर अंगारा हातात घे आणि यांचं स्मरण करुन त्यांना सांग, म्हणावं, ‘आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही आहोत. आणि कधी विसरणारही नाही. ‘ आणि बाळाला तो अंगारा लाव. यापेक्षा आत्ता याक्षणी बाकी आपल्या हातात कांहीही नाहीय. “
बाळाचं रडणं सुरूच होतं. भाऊ लगोलग जागचा उठला. आत गेला. देवाला प्रार्थना करून, बाबांचं स्मरण करून, त्यांने बाळाला अंगारा लावला आणि क्षणार्धात हळुहळू शांत होत बाळाचं रडणं कमी होत गेलं. हात-पाय हलवत इकडं तिकडं पहात बाळ आपली
बाळमूठ चोखत अलगद डोळे मिटत झोपून गेलं!
घडल्या गोष्टीचं आश्चर्य करीत सर्वांनी त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली खरी पण त्या आश्चर्याइतकंच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय घडतंय त्याचं नाही म्ह़टलं तरी थोडं दडपण प्रत्येकाच्या मनावर होतंच.
दुसऱ्या दिवशी तिन्हीसांजेला जेव्हा न रडता बाळ छान खेळत राहिलं, तेव्हा मात्र सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं आपसूकच हलकं झालं होतं!
या अनपेक्षित अशा अघटीत घटनेमुळे अतुल बाळाच्या रूपानं बाबाच या घरी परत आलेत अशीच भावना सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली आणि ते सहाजिकही होतंच!
हे सगळं पुढं कधीतरी गप्पांच्या ओघात मला प्रथम समजलं तेव्हा मनातल्या दृढ श्रद्धेमुळेच असेल पण त्याबद्दल कणभरही साशंकता माझ्याही मनात निर्माण झालेली नव्हती एवढं खरं. पण त्यावेळी मला न वाटलेली साशंकता माझ्या मनात नंतर डोकावून गेली ती या घटनेला परस्पर छेद देणारी, कधीच विसरता न येणारी, सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी एक अनपेक्षित घटना पुढे माझ्याही संसारात घडली तेव्हा! मनात डोकावून गेलेल्या त्या साशंकतेत मृत्यू आणि पुनर्जन्म याबाबतचं अनामिक असं कुतूहलही नकळत मिसळून गेलेलं होतं आणि तेच पुढं अनेक दिवस मला बेचैनही करीत राहिलं होतं!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈