सुश्री नीता कुलकर्णी
☆ “बंब…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
माझ्या मैत्रिणीच्या रेखाच्या घराचे इंटिरियर डेकोरेशनचे काम खूप दिवस चालु होते. ते पूर्ण झाल्यावर “बघायला ये “.. असा तिचा फोन आला. तरी बरेच दिवस मला जायला जमले नव्हते.
तिचे घर पाहून आलेल्या मैत्रिणी तिच्या घराची खूप स्तुती करत होत्या. त्यामुळे मलाही उत्सुकता लागली होती. एके दिवशी सवड काढून मी मुद्दाम तिच्या घरी गेले. तिने दार उघडल्यावर अक्षरशः बघत उभी राहिले. तिचे घर अनेक वस्तूंनी सजवलेले होते. फारच सुरेख दिसत होते. प्रत्येक गोष्ट अप्रतिम होती.
पण माझे लक्ष मात्र हॉलच्या कोपऱ्यात गेलं. तिथं तिने काय ठेवलं असेल ?…. मी कधी कल्पनाही केली नव्हती अशी गोष्ट तिथे होती.
तिथे तिने पूर्वी पाणी तापवायला वापरायचा तो तांब्याचा मोठा बंब ठेवला होता. पॉलिश केलेला असल्याने त्याचा लाल तांबूस रंग चांगला चमकत होता. त्याला गोमुखाची तोटी होती. विस्तवाच्या जागी ठेवायचा झारा सुद्धा होता. कितीतरी वेळ बंबासमोर ऊभ राहुन मी बघत होते.
खूप जुनी मैत्रीण अचानक रस्त्यात भेटली की आपल्याला जसा आनंद होतो तसा मला आनंद झाला होता. असा बंब मी कितीतरी वर्षांनी पाहत होते.
रेखा म्हणाली ” काय बघतेस एवढं?”
” हा तुझा बंब… अग किती छान दिसतोय “
यावर ती म्हणाली, ” ही माझ्या नवऱ्याची आवड.. हॉलमध्ये बंब ऑड दिसेल असं मला वाटत होतं. पण तुला सांगते घरी येणारा प्रत्येक जण बंब बघून खुश होतोय “
नंतर रेखाशी गप्पा झाल्या. खाणं झालं. मी घरी आले. घरी आल्यावरही तिचा बंबच माझ्या डोक्यात होता.
मनात विचार आला…. या जुन्या वस्तू निरुपयोगी झाल्या तरी आपल्याला हव्याशा का वाटतात.. ? मग विचार केल्यावर लक्षात आलं की ह्या वस्तूंकडे नुसतं पाहिलं तरी आपल्याला आनंद होतो.
गेलेले दिवस त्याच्या सोबतीने आपण पकडून ठेवायला बघतो..
तसंच असेल.. कारण तो बंब बघितल्या क्षणी मला माझे लहानपणीचे दिवस आठवले..
पहाटे उठून कामाला लागलेली आई आठवली. भाड्याचं घर… मागच्या अंगणात ठेवलेला बंब आठवला…
त्याच्या अनुषंगाने कितीतरी गोष्टी नजरेसमोर तरळल्या. मनात त्या आठवणींची एक सुरेख साखळीच तयार झाली. माझा तो दिवस त्या आनंदातच गेला..
आजोळ आठवलं. आजोळी बंबासमोर तांब्याच घंगाळ, पितळेचा तांब्या आणि “वज्री ” ठेवलेली असे. वज्री हा शब्द तर माझ्या स्मरणातून निघून गेला असेल असे मला वाटले होते. पण तो अचूक आठवला..
वज्री म्हणजे अंग घासायचा दगड… अजोळच
“न्हाणीघर ” डोळ्यासमोर आलं त्याला न्हाणीघरच म्हटलं जायचं… भांडी घासायला दुसरी जागा होती. तिला मोरी म्हटलं जायचं.
साध्या बंबावरून माझं मन कुठल्या कुठे भटकून येत होतं. काही दिवसां नंतरची गोष्ट..
यांचे मित्र मनोहर घरी आले. बोलताना मी त्यांना रेखानी बंब हॉलमध्ये ठेवला हे सांगितलं. तर ते म्हणाले… ” पूर्वी आमच्याही घरी तसा पितळेचा बंब होता. अंगणात तो ठेवलेला असे. आई गरम पाण्याची बादली भरून देई.. म्हणत असे
” विसण “घालून घे. विसण हा शब्द आता मुलांना कळणारही नाही.
आई बंबात लाकडं घालायची, पाण्याची भर घालायची, बंब चिंचेनी घासून लख्ख ठेवायची. आणि प्रत्येकाची बादली बाथरूम मध्ये ठेवून द्यायची… किती कष्ट करायची रे…”
असे म्हणेपर्यंत त्यांचे डोळे भरून आले होते. आम्ही दोघे त्यांच्याकडे बघत होतो.
ते आपल्याच तंद्रीत होते. पुढे म्हणाले ” तेव्हा आईच्या कष्टाची काही किंमत वाटायची नाही. जाणवायचे सुद्धा नाहीत. दिवसभर ती राबायची आणि तिची सेवा आम्ही करायची तेव्हा आई देवा घरी गेली. राहूनच गेलं बघ….. “
बंबाच्या विषयावरून मनोहरना त्यांची आई आठवली.. ते हळवे झाले होते..
आपल्याला कशावरून काय आठवेल… हे सांगताच येत नाही. कुणाची कुठे अशी नाजूक दुःख लपून बसलेली असतात.. नकळत त्यांना धक्का लागला की उफाळून वर येतात… तसंच त्यांचं झालं होतं…
रेखाच्या घरातल्या बंबाबद्दल मी पेंडसे आजीं जवळ बोलले.
त्या क्षणभर गंभीर झाल्या… नंतर हसल्या आणि म्हणाल्या,
” तुला एक गंमत सांगू का ?
“सांगा ना ” मी म्हटलं
” अगं लग्न होऊन सासरी आले तेव्हा माझं वय एकोणीस होत. अंगात अल्लडपणा, धसमुसळेपणा होता. वागण्यात कुठलाच पाचपोच नव्हता….. बंबात भर घालण्यासाठी बादलीनी पाणी ओतायला लागले की माझ्या हातून हमखास पाणी नळकांडण्यात पडायचं.. विस्तव विझायचा.. बंब परत पेटवायला लागायचा. मग सगळ्यांच्या आंघोळीला ऊशीर व्हायचा. सासुबाई सांगायच्या हळू बेताने ओतावं. तरी तीन-चार दिवसांनी माझ्या हातून तसंच व्हायचं. नंतर मात्र एकदा त्या चांगल्याच रागावल्या. त्यांनी तिथलेच एक लाकूड घेतलं आणि माझ्या हातावर मारलं “
” आणि मग काय झालं?” मी उत्सुकतानी विचारलं.
” मग काय.. हात चांगला सुजला. दोन दिवस काही कामं करता येत नव्हती. पण नंतर मात्र सासुबाई स्वतः रक्तचंदनाचा लेप उगाळून लावत होत्या. शिस्तीच्या होत्या पण प्रेमळही होत्या गं.. “
मी आजींकडे बघत होते.
त्यापुढे म्हणाल्या ” आता बटन दाबलं की गरम पाणी.. पण ती मजा नाही बघ.. तसं गरम पाणी सुद्धा नाही.
त्या पाण्याला वास होता जीव होता. ”
आजी जुन्या आठवणीत रंगून गेल्या होत्या.
त्या वेळी बंब इतका डोक्यात होता की जो भेटेल त्याला मी त्याबद्दल सांगायची. गंमत अशी की प्रत्येकाच्या मनात काही तरी निराळचं असायचं…
त्यावर तो अगदी भरभरून माझ्याशी बोलायचा.
मुलाचा मित्र प्रमोद गाव सोडून आला आहे. आता इथे पुण्यात नोकरी करतोय. तो घरी आला होता. तेव्हा बंबाचा विषय निघाला… तो म्हणाला..
” काकू तुम्ही सांगितल्यापासून मलाही गावाकडे आहे तसा बंब इथे आणावा असं वाटायला लागलंय.. पण ठेवू कुठे ?आम्हीच लहानशा दोन
खोल्यात राहतोय.. आमच्या बाथरूम मध्ये सुद्धा बंबाला जागा नाही. “
” गावाला बंब कुठे ठेवलाय रे ?”
मी विचारलं
” गावाकडे प्रशस्त घर आहे, परसू आहे, विहीर, रहाट आहे. तिथे बंब आहे. विहिरीचं पाणी काढायचं बंबात भर घालायची.. दिवसभर पाणी.. शहरातल्या सारखं नाही तिथे. हे एवढं मोठं अंगण आहे आणि आम्ही इथे आलोय… पोटासाठी पैशासाठी”
” परत जाताल रे गावाकडे “मी म्हणाले
” परत कुठले जातोय ?आता ईथेच राहणार.. गाव, जमीन, शेतीवाडी सगळं सुख मागे गेलय आणि आम्ही झालोय आता इथले चाकरमाने.. बंबातल्या गरम पाण्याच्या अंघोळीची मजा आमच्या नशिबात नाही. तिथे अंघोळ केल्यानंतर कस प्रसन्न वाटतं.. इथे आपलं घाईघाईत काहीतरी उरकायचं म्हणून अंघोळ होते.. ” उदासपणे प्रमोद बोलत होता.
माझ्या लक्षात आलं घरात नसली तरी प्रमोदच्या मनात बंबाला जागा होती. मनातलं बोलायला बंबाच निमित्त झालं होतं. गावाकडची पाळमुळं उखडून ही रोपटी इथे आली होती.. पण अजून इथे म्हणावी तशी रुजली नव्हती. शरीरानं इथ आलेली मुलं मनाने अजून गावाकडेच होती.
रेखाचा नवरा निखिल रस्त्यात भेटला. मी त्याच्या घराचे कौतुक केले विशेषत: बंबाचे… यावर तो म्हणाला
” तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगू का? त्या बंबाकडे पाहिलं की मला आमचे पूर्वीचे दिवस आठवतात. घरची गरीबी होती. खाणारी तोंडे खूप. कमावणारे एकटे वडील.. त्यात आजोबांच्या आजारपणात एकदा पैशाची गरज होती. घरात सोनं-चांदी नव्हतीच.. वडिलांनी मारवाड्याकडे बंब गहाण ठेवायचे ठरवले. बंब घराबाहेर काढताना आई-दाराआड उभी राहून रडत होती. नेमकं त्या क्षणी मी तिच्याकडे पाहिलं. तिची ती आर्त व्याकुळ नजर अजून माझ्या डोळ्यापुढे आहे. “
माझ्याशी बोलताना तो हळवा झाला होता. पुढे म्हणाला,
” ते दिवस गेले.. दिवस जातातच पण चांगले दिवस आले तरी आपण ते दिवस विसरायचे नसतात. तरच आपले पाय जमिनीवर राहतात. म्हणूनच माझ्या दृष्टीने तो नुसता बंब नाही. त्याच्यामागे खूप काही आहे. म्हणून त्यासाठीच तो हॉलमध्ये आहे. घरातल्या महत्त्वाच्या जागी…. “
मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागले. रेखाचा नवरा इतक्या गरीबीतून वर आला आहे हे मला नव्यानेच कळले. तो इतका नम्र आणि साधा का याचेही कोडे उलगडले.
केवळ रम्य भूतकाळच आपल्या आठवणीत राहतो असे नाही तर अशा गोष्टींनीही मनात घर केलेले असते. त्या आयुष्यभर साथ देतात. त्याच्या बरोबर जगताना ऊपयोगी पडणारं शिक्षण पण देतात…
केवळ एक साधा बंब हा विषय पण त्यावर किती जणांकडून काय काय ऐकायला मिळाले…
तुमच्या घरी होता का बंब? तुम्हाला आली का कुठली आठवण?असेल तर मला जरूर कळवा..
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈