सौ राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ व्यवहारापलीकडचं नातं… भाग – १ – लेखिका – सुश्री मिताली वर्दे ☆ प्रस्तुती – सौ राधिका भांडारकर ☆
(मी तिला विचारले, ‘तू पासबुक का भरून घेतलं नाहीस?, वेळेत पासबुक भरलं असत तर तेव्हाच समजलं असत. ते वाचून ती रडायला लागली. पैसे भरलेली रक्कम थोडीथोडकी नाही तर सव्वा लाख रुपये एवढी होती.) – इथून पुढे
तिने मला तिची कहाणी सांगितली. तिचा नवरा दहा वर्षांपूर्वी मलेरियाने वारला. तो मुन्सिपाल्टीच्या शाळेत शिक्षक होता. घरी गरिबी असली तरी वातावरण शिस्तीचं आणि सचोटीच होत. मुलगा दहावीत शिकत होता. शिकायला बरा होता. नवराच त्याचा अभ्यास घेत असे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या येणाऱ्या तुटपुंजा पेन्शनवर तिने आपल्या एकुलत्या एक मुलाला वाढवला… “ मुलगा इंजिनिअर असून बंगलोर येथे आपल्या बायको मुलांबरोबर राहतो. त्याने स्वतःच लग्न जमवलं. मी त्याच्या घरी सहा वर्ष मोलकरणीसारखी राहिले. अगदीच सहन झालं नाही म्हणून आमच्या घरी परत आले. आता आमचा संबंध नाही. नवऱ्याचं पेन्शन मला पुरतं. पण हे पैसे माझ्या नवऱ्याचे कष्टाने कमावलेले होते. तो नोकरीनंतर शिकवण्या करीत असे व दर महिन्याला मी ते पैसे खात्यात भरत होते. मी परत आल्यावर मला मी भरलेल्या पैशाची आठवण झाली. मी गेली तीन वर्ष बँकेत खेपा घालत आहे, कोणीही माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही व मला वेड्यात काढलं. “
“तुम्ही मला पुरावा आणायला सांगितला आणि मी घर धुंडाळल, तेव्हा जुन्या हिशोबाच्या वहीत मला ह्या पावत्या मिळाल्या. आता माझे पैसे मला मिळवून द्या. मी तिला स्पष्टच सांगितलं मला पंधरा दिवसाची मुदत हवी, मला प्रथम त्या शहा नावाच्या इसमाला शोधायला लागेल. नंतर त्याने दहावर्षांनंतर तुझे पैसे दिले तर बरच आहे. कुलकर्णी बाईंनी डोळ्यात प्राण आणून माझ्याकडे बघितले व हात जोडून मला म्हणाली मॅडम काहीतरी करा, मी तुमच्याकडे खूप आशेने आले आहे. ”
माझ्या रोजच्या कामात मला एक नवीन काम मागे लागलं. मी शहांच्या पत्यावर दहिसरला माणूस पाठवला. शहा फॅमिली ते घर विकून मोठ्या घरात कांदिवली येथे राहायला गेली होती. माझ्या मनात आलं, दहिसर येथून हा माणूस मुलुंडला बँकेत का येत असावा? ‘शोधा म्हणजे सापडेल’ या उक्ती प्रमाणे त्याचं ऑफिस मुलुंड येथे आहे हे समजलं. माहिती काढली असता तो माणूस मुलुंड येथील ऑफिसात मोठ्या हुद्यावर आहे व तो काही महिन्यात रिटायर होणार आहे असे समजले. आता मात्र मला लवकरात लवकर स्वतःच शहाची भेट घ्यावी लागणार होती. मी एकदा दुपारी लंच टाइममध्ये त्याच्या ऑफिसात गेले. रिसेप्शनिस्टला मी बँकेतून आले असे सांगून शहांची भेटीची वेळ मागितली. शहांनी चार दिवसांनी मला संध्याकाळी सहा वाजताची वेळ दिली. त्यांना भेटणार कधी व मी मुलुंहून मालाडला माझ्या घरी पोचणार कधी हा विचार माझ्या मनात आला.
चार दिवसांनी गुरुवारी मी त्यांना भेटायला गेले. मला बघितल्यावर ते म्हणाले, “ मी तुमच्या बँकेतील खाते कधीच बंद केले आहे, पण तुम्ही स्वतः आलात म्हणून मी तुम्हाला वेळ दिली, ”.. मी त्यांना थोडक्यात सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला, त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी बँकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढले. ‘बरं झालं मी असल्या बँकेतील खात बंद केलं ‘ असं देखील ते म्हणाले. त्यांनी दुसऱ्याचे पैसे त्यांना मिळाले ही गोष्ट अमान्य केली. ते म्हणाले “ माझ्या खात्यात लाखोने रुपये पडून असतात. ठराविक रक्कम सोडली तर मी पैशाला हात देखील लावत नाही. माझा प्युन पासबुक भरून आणून माझ्या खणात ठेवतो. माझे हे एकच खाते नाही. माझी वेगवेगळ्या बँकेत चार खाती आहेत. आमचे किराणामालाचे दुकान आम्ही भाड्याने चालवायला दिले आहे. त्याचे पैसे कोणी इथे भरत असेल. मी पैशाचे व्यवहार फारसे बघत नाही. दहा वर्षापूर्वी माझ्या सीएने सुद्धा ह्या छोट्या रकमांवर आक्षेप घेतला नाही. मला कसं समजणार हे माझे पैसे नाहीत ते. ही संपूर्ण बँकेची चूक आहे. ”
मी सुद्धा मुरलेली होते. मी त्यांच्या खात्याचं स्टेटमेंट घेऊन गेले होते. मी त्यांना कुलकर्णीबाईंनी दिलेल्या पैसे भरलेल्या पावत्यांची झेरॉक्स कॉपी दाखवली. त्या बाईचे आणि तिच्या सद्यःपरिस्थितीचे वर्णन केले व तुमच्या सद्सदविवेक बुद्धीला पटेल तेच करा असे सांगून सात वाजता त्यांच्या ऑफिसातून निघाले. घरी जाताना माझ्या डोळ्यासमोर कुलकर्णीबाईचा चेहेरा उभा राहिला. पै पै साठवून चुकीचा खाते नंबर घालणारी ती बाई दोषी, की भरमसाट पैसे मिळवूनदेखील फारशी व्यवहारी वृत्ती नसलेले, बँकेचे खाते न तपासणारे हे शाह दोषी, की दहा वर्षांपूर्वी चुका करणारे बँक कर्मचारी व ऑफिसर दोषी.
दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला मी शहांना भेटल्याचे सांगितले. पुढे काय करायचे ते नंतर बघू म्हणून फोन ठेऊन दिला. पंधरा दिवसांनी दिवाळी होती. बँकेने कार लोनसाठी नवीन ड्राइव्ह काढली होती. कमी इंटरेस्ट रेट ठेऊन नवीन ग्राहक शोधा असा बँकेचा आदेश होता. कमीतकमी पाच कार आणि पन्नास लाख रुपयाचे लोन डिसबर्स करावे असे बँकेने फर्मान काढले होते. बॅंकभर लोनचे पोस्टर लावले होते. दारातच कार लोनच्या जाहिरातीचा स्टँडही होता. मी सहा कारसाठी लोन दिले पण लोनची रक्कम पंचेचाळीस लाख होती. मी सुद्धा खूप धावपळीत होते. एक पाच लाखाचं लोन डिसबर्स केलं की माझं टार्गेट होणार होत. अजून दोन दिवस माझ्या हातात होते.
या गडबडीत ग्राहकांचा वेळ संपला. बँकेचं शटर बंद केलं व आम्ही सगळे डबा खायला बसलो. तेवढ्यात गुरखा सांगायला आला, एक माणूस तुम्हाला भेटायला आला आहे. गाडीत बसला आहे. मी डबा बंद केला आणि त्या इसमास आत पाठवायला सांगितले. दोन माणसांनी त्या इसमास उचलून आणून माझ्या समोरच्या खुर्चीत बसवले. त्या माणसाच्या पायात ताकद नव्हती, ते नुसतेच लोमकळत होते. जवळ आल्यावर लक्षात आलं पाय नाही तर घातलेल्या पँटचे पाय लोमकळत होते. त्या माणसाला पायच नव्हते. ते दुसरे तिसरे कोणी नसून शहा होते. त्या दिवशी तर मला त्यांना पाय नाहीत हे समजलच नव्हतं. मी त्यांना पाणी दिलं. त्यांच्यासाठी चहा मागविला. मला काय बोलावं ते क्षणभर सुचलंच नाही. ते का बरं आले असतील? ह्याचा मी विचार करू लागले. त्यांनी खिशातून एक लाख पंचाहत्तर हजाराचा चेक काढून दिला. खात्यातील एक लाख पंचवीस हजार आणि दहा वर्षाचं त्यांनी पैसे वापरले त्याचे मूल्य म्हणून पन्नास हजार. चेक सीमा कुलकर्णीच्या नावाने होता. शहा म्हणाले मी आजच रिटायर झालो. काल रात्री मला झोप आली नाही. अनावधानाने का होईना मी दहा वर्ष कोणाचे तरी पैसे वापरले ह्याचे मला वाईट वाटले. तुम्ही बाईचे केलेले वर्णन ऐकून तिला पैशाची किती निकड असेल आणि हे तिचे हक्काचे पैसे आहेत. हा चेक तुम्ही तिला द्या. त्यांचे पाय ऍक्सीडेन्ट मध्ये कापावे लागले असे त्यांनी सांगितले. चहा पिताना ते ब्रँचमधील पोस्टर न्याहाळत होते.
“ही माझी गाडी ऑफिसची आहे. मी दहा लाखाची नवीन गाडी बुक केली आहे. नोकरीत असतो तर तुमच्याकडून लोन घेतलं असत “ असं ते म्हणाले. मी म्हणाले “ तुम्ही दहा लाखाचं फिक्स्ड डिपॉझिट माझ्या बँकेत ठेवलं तर मी दहा लाखाचं लोन तुम्हाला स्पेशल केस म्हणून सॅंक्शन करून देईन. तुम्ही ते लोन तीन वर्षात फेडा. तुमची रिसीट बँकेकडे सिक्युरिटी म्हणून राहील. ” शहा लगेच तयार झाले. सगळ्या फॉर्मॅलिटी पटापट झाल्या. माझे पाच कार व पन्नास लाख लोन हे टार्गेट पूर्ण झाले. शहांचे नवीन खाते उघडून घेतले. शहासारख्या निर्मळ मनाच्या माणसाची ओळख झाली.
दुसऱ्या दिवशी मी कुलकर्णीबाईला बोलावून घेतले. तिच्या हातात मी एक लाख पंचाहत्तर हजाराचा चेक ठेवला. तिला झालेला आनंद वर्णनातीत होता. आज ती आनंदाने रडत होती. तिचे डॉरमन्ट झालेले खाते मी सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून नॉर्मल केले, जेणेकरून ती तो चेक तिच्या खात्यात भरू शकणार होती.
दोन दिवसाने दिवाळी होती. ब्रँच कंदील लावून व दिव्यांची रोषणाई करून सजवली. दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळे जण नटून थटून ब्रँचमध्ये आलो होतो. सालाबादप्रमाणे ग्राहक मिठाईचे बॉक्स आणि भेटवस्तू आणून देत होते. साधारण बारा वाजत कुलकर्णीबाई आली. आज ती क्रीम कलरची सिल्कची साडी नेसली होती. डोक्यात गुलाबाचे फुल होते. गळ्यात मोत्याची माळ होती. छान प्रसन्न दिसत होती. मला म्हणाली “मुलाकडून आल्यापासून तीन वर्षांनी माझ्या घरी तुमच्यामुळे दिवाळी साजरी झाली. हे घ्या बक्षीस “ म्हणून तिने एक छोटीशी भेटवस्तू माझ्या हातात दिली आणि आली तशीच ती निघून गेली. मी ती भेटवस्तू बाजूला ठेऊन दिली. निघताना सगळ्या भेटवस्तू तश्याच ठेऊन कुलकर्णीबाईने दिलेली भेटवस्तू मी घरी घेऊन गेले. घरी जाऊन वरील पेपर काढल्यावर आतमध्ये पितळेचा छोटासा पेढेघाटी डबा होता. त्यात पाच बेसनाचे लाडू होते. आत एक चिट्ठी होती… ‘ माझी दिवाळी आनंदी केल्याबद्दल प्रेमपूर्वक भेट ‘. आता डोळ्यात पाणी यायची वेळ माझी होती. मला आतापर्यंतच्या दिवाळीत मिळालेली ही सर्वात मौल्यवान भेट होती.
माझं आणि कुलकर्णी बाईचं आणि माझं आणि शहांचं व्यवहारापलीकडचं नातं निर्माण झालं होतं.
— समाप्त —
लेखिका : सुश्री मिताली वर्दे
प्रस्तुती : सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈