विविधा
☆ सागरी किनारा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
हो माहित आहे मला खूप वर्षांपूर्वी आले होते तुला भेटायला मी. पण आजचं येणं काही वेगळंच. पंचवीस वर्ष पुर्वी तुला भेटायला आले होते, तेव्हाची मी या लाटांच्या सारखीच होते, खळाळत, वाहत जाऊन कोठेही आपटणारी.
पण आज नव्याने पाहते मी तुला. किती रे विशाल तुझं हृदय! सर्वांना अखंडपणे सातत्याने सामावून घेत असतो. कुठलाच भेदभाव नाही तुझ्याजवळ.
हो पण तुझी एक गोष्ट वाखाण्यासारखी. तुला जे हवं तेवढंच घेत असतो आणि नको असलेले सगळं किनाऱ्यावर आणून ठेवतोस.
भरती आणि ओहोटी म्हणजे तुझे दोन सुंदर अलंकार. किती खुश असतोस भरतीच्या वेळी. खळाळत फेसाळत येऊन सर्वांना भेटतोस पण नाराज नाही होत ओहोटीच्या वेळेस. त्यावेळेस तेव्हाही तेवढ्याच वेगाने पाठीमागे प्रवाहित होतोस कारण तुला माहितीये पुन्हा तितक्या च वेगाने तुला भरती येणार आहे, आनंदाचे उधाण येणार आहे. हेच शिकले मी आज तुझ्याकडून.
नको असलेल्या सगळ्या नकारात्मक भावना, ती विचारांची जळमट, त्या कटू आठवणी सगळं विसरायचे मला जीवनात. त्या सर्वांचे ऋणी व्हायचे मला ज्यांनी मला जगण्यासाठी भरभरून आठवणी दिल्या. माझे जीवन सुंदर आणि कृतार्थ केले त्या सर्वांचीच मी मनापासून आभारी आहे आणि ऋणी देखील आहे ज्यांनी त्यांच्या असण्याने माझे जीवन सुंदर बनवले.
ओहोटी आयुष्यात जास्त काळ नसतेच कारण मला माहिती आहे पुन्हा भरती येणार आहे. माझ्या आयुष्यात एका नव्या पर्वाची. पण मनात रुंजी घालत राहतील नेहमीच त्या सर्व आठवणी.
आता मी ठरवलंय मला देखील तुझ्यासारखाच व्हायचंय अखंडपणे प्रवाहित होऊन सर्वांनाच आपलयात सामावून घ्यायचंय. सरीतेला सागरात सामावून जायचं असतं, शेवटी ही जगमान्यता आहे. पण मलाच आता सागर व्हायचंय. अथांग, खोल ज्याची उंची कधीच कोणालाच मोजता येणार नाही अशी.
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈