श्री गजानन जाधव

? इंद्रधनुष्य ?

☆ एक “महावेडा” तलाठी… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ श्री सुनीत मुळे ☆

२०१६ मध्ये तलाठी म्हणून नोकरी लागल्यावर मिळणार्‍या पगारातील ५०% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणावर व अभ्यासिकेवर खर्च करणारा “महावेडा” तलाठी गजानन जाधव.

वास्तविक गजानन जाधव हे प्रोफेसर, प्राचार्य वा विद्यापीठात कुलगुरु व्हायला पाहिजे होते. त्यांनी अचंबित करणारे कार्य केले असते.

स्वतःचे लग्न कमी खर्चात करुन दहा गावात पुस्तकं देत दहा गावात अभ्यासिका सुरु केली. बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तकं भेट दिली. विचारवंतांचे शेकडो विचार व डझनभर लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा गजानन जाधव या वेड्या तलाठ्याची एक कृती श्रेष्ठ वाटते. लाखात लाच घेणारा क्लास वन अधिकारी श्रीमंत की ५०% पगारातून खर्च समाजासाठी देणारा क्लास थ्री तलाठी श्रीमंत… ??? शासकीय विभागात भ्रष्टाचारी असतात तसे देवदूत व मसीहाही असतातच.

२८-०२-२०२१ रोजी कोलारा येथे लग्न साधेपणाने करून चिखली तालुक्यातील दहा गावात स्वखर्चातून ग्रंथ देऊन, अभ्यासिका उभारुन समाजऋण फेडण्याचा निश्चिय करणारा महावेडा तलाठी- गजानन जाधव. २०१८ साली बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तके गोद्री व कोलारा गावातील अभ्यसिकेला देणारा शिक्षणप्रेमी तलाठी.

वडील मृत्यू पावल्यानंतर आईने शेती व मजुरी करुन ३ मुली व गजाननला शिक्षण देऊन वाढविले. इलेक्ट्रॉनिक दुकानात नोकरी करत डी एड व बी एड केले. २०१६ ला तलाठी म्हणून नोकरीवर रुजू. पगारातील ५०% रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व अभ्यासिकेसाठी खर्च करतात. बुलढाण्याचे रहिवासी असणारे गजानन जाधव हे औरंगाबाद येथील वैजापूर येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वतःच्या लग्नात दहा गावात स्वखर्चाने ग्रंथासह अभ्यासिका उभारण्याचा संकल्प करुन पूर्ण केला आहे.

२०२१ नंतर आजअखेर दिवठाणा, बोरगाव वसू, सवना, सोनेवाडी आणि शेलुद या ठिकाणी पुस्तके दान करुन अभ्यासिका सुरू केल्या आहेत. शिक्षणामुळे आयुष्य बदलते पण आर्थिक अडचणींमुळे मुलांना शिक्षण घेता नाही. मुलांना आर्थिक कारणांमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून पगारातून मदत करतात. गरीबीतून आल्यामुळे गरजा कमी आहेत. त्यामूळे ५०% पगारातील रक्कम खर्च करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे गजानन सांगतात.

मुळात डी एड व बी एड झाल्यामुळे शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था आहे. अभ्यासिका व पुस्तके यामुळे मुलांचे आयुष्य बदलते याची जाणीव डी एड व बी एड करताना झाल्यामुळे गजानन यांनी आईशी बोलून समाजासाठी मदत करायला सुरुवात केली.

महसूल विभागातील तलाठी हे ग्रासरुट लेवलवरचे महत्त्वाचे पद आहे. महसूल विभागातील लोकांच्या अनेक कथा आपण ऐकतो. लाच घेताना वरिष्ठ अधिकारी पकडले जात असताना तृतीय श्रेणीतील एक तलाठी कर्मचारी मात्र पगारातील ५०% रक्कम समाजासाठी खर्च करतात, ही गोष्ट गजानन यांच्या मनाची श्रीमंती दर्शविते, दानत दाखवून देते.

वडील अकाली मृत्यू तीन बहिणींचे शिक्षण व लग्ने, पार्ट-टाइम नोकरी करत करत शिक्षण व स्पर्धा परीक्षेतून तलाठी. हे सर्व करत असताना आईचे कष्टकरी जीवन. २०१६ नंतर परिस्थिती बदलत असताना बंगला, गाडी, शेत, दागिने यांची भर न करता दहा गावात अभ्यासिका उभारणे म्हणजे समाजऋण फेडणारे काम. समाजसेवा करणेसाठी गर्भश्रीमंत असावे लागते असं काही नसतं. मनाची श्रीमंती व दानत महत्वाची असते.

गजानन जाधव. औरंगाबाद, वैजापूर येथील तलाठी महसूल विभागासाठी नक्कीच एक आदर्श आहेत. डिपार्टमेंट कोणतेही असो प्रत्येक विभागात भ्रष्टाचारी जसे असतात तसे मानवतेचे मसीहा व देवदूतही असतातच. लग्न एकदाच होत असते. लग्नात थाटमाट न करता, हौसमौज न करता, डामडौल न‌ करता लग्नात होणारा खर्च समाजासाठी खर्च करणे ही बाबच समाजासाठी दीपस्तंभ ठरते.

…. गजानन जाधव आपणास, आपल्या मातोश्री व सौभाग्यवती तसेच आपल्या भगिनींनाही आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना !! 

लेखक : श्री संपत गायकवाड

(माजी सहायक शिक्षण संचालक)

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments