सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ व्रतोपासना – ३. अन्नाचा स्वीकार ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
मला घरातील ज्येष्ठ मंडळी कायम स्मरणात असतात. त्यांची काही वाक्ये लहानपणी पासून ऐकतो. त्यावेळी फारसे कळायचे नाही. पण मोठ्यांना उलट प्रश्न विचारण्याचा तो काळ नव्हता. पण त्या मुळे मनावर चांगले संस्कार कोरले गेले. आणि त्यातील काही वाक्ये आत्ता लक्षात येतात आणि ती किती महत्वाची होती हे लक्षात येते. कोणत्याही पदार्थाला नकार दिला की एक वाक्य आजी कायम म्हणायची, कोणाचाही हात मोडू नये. हे ऐकून त्यावेळी आम्ही तोंडावर हात ठेवून हसत असू. मोठ्याने हसलो किंवा उलट बोलले तर मार मिळेल या भीतीने गुपचुप हसायचे. आणि हात कसा मोडतो? हा प्रश्न पडायचा. पण त्याचा अर्थ जसे वय वाढत गेले तसा लक्षात यायला लागला. आणि हे पूर्वीचे संस्कार फार महत्वाचे आहेत हेही जाणवते.
समोर आलेले अन्न आपण स्वीकारले नाही किंवा त्याला नकार दिला तर त्याचा आनादर होतो. आणि ज्या व्यक्तीने आपल्याला दिलेले असते त्या व्यक्तीचाही अपमान होतो. त्यामुळे आपल्याला न आवडणारा पदार्थ समोर आला तर त्याला कधीही नकार देऊ नये. त्याचा आदर करण्यासाठी त्यातील एखादा अल्पसा घास तरी ग्रहण करावा. मी कित्येकदा असा अनुभव घेतला आहे, की एखादा पदार्थ नाकारला तर दिवसभर काहीच खायला मिळत नाही. अगदी जवळ पैसे, स्वतःचा जेवणाचा डबा असेल तरी जेवणासाठी वेळ मिळत नाही.
अजून एक विचार असा आहे, ज्या अन्ना मुळे आपले भरण पोषण होते त्याच अन्नाने आपला अनादर केला तर? आपल्या शरीरात अन्नद्वेष निर्माण झाला तर? आपले जगणे पण अशक्य होऊन जाईल. म्हणून कोणतेही अन्न मना पासून स्वीकारावे. तरच ते चांगले पोषण करते. आपण अन्नाला व पाण्याला भावना देऊ शकतो. त्या भावना अन्न ग्रहण करते. अन्नाला सकारात्मक व चांगल्या भावना देण्यासाठी आपल्या कडे स्वयंपाक करताना पाळायचे काही नियम असतात.
त्यामुळे हे अन्नाचा स्वीकार हे व्रत म्हणून सर्वांनीच आचरणात आणावे. तेच संस्कार आपल्या मुलांवर होणार आहेत. सोपे पण महत्वाचे व्रत आहे ना? माझ्या मताशी सहमत आहात का? नक्की कळवावे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
९/११/२०२४
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈