श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनका एक भावप्रवण आलेख चिंधी जिसमें उन्होंने “कपडे के टुकड़ों “ का महत्व एवं उसका धार्मिक, पौराणिक एवं सामाजिक जीवन में योगदान पर विस्तृत चर्चा की है। उन्होंने महाभारत काल में द्रौपदी के चीरहरण, साईँ बाबा के वस्त्र और ग्रामीण महिलाओं द्वारा चिन्दी से गुदड़ी सिलने के व्यवसाय तक की चर्चा की है। इस आलेख को पढ़ते वक्त हमें हिंदी की कहावत “गुदड़ी के लाल” सहज ही याद आ जाती है। )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 14 ☆
☆ चिंधी ☆
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण..!! ”
आचार्य अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई ‘ चित्रपटातलं ,आशाताईंच्या सुरेल आवाजातलं गाणं ऐकत होते.. किती छान गाणं..!
ऐकताना विचार करु लागले खरंच चिंधी ही किती क्षुल्लक व टाकावू पण तिला श्रीकृष्णाच्या बोटावर विराजमान होण्याचं भाग्य लाभलं अन् ती अजरामर झाली.
महाभारतातल्या एका प्रसंगात श्रीकृष्णाच्या बोटाला कापलं रक्ताची धार लागली ते पाहून त्याची सख्खी बहीण सुभद्रा कपडा आणायला अंतर्गृहाकडे धावली तर मानलेली बहीण द्रौपदीनं क्षणाचाही विचार न करता स्वत:च्या अंगावरच्या भरजरी शेल्याचा पदर फाडून त्याची चिंधी भाऊ श्रीकृष्णाच्या बोटाला तात्काळ बांधली.
देवही परीक्षा पहात असतो.!
तुम्ही किती मायेनं तत्परतेनं,आस्थेनं करता ते तो कधीही विसरत नाही. म्हणूनच द्रौपदी वस्त्रहरणाचे वेळी सर्व स्वकीयांना बोलावले पण तिने बंधू श्रीकृष्णाला हाक मारताच क्षणाचाही विलंब न करता कृष्णाने एका चिंधीच्या बदल्यात एकाचवेळी असंख्य साड्या पुरवून तिचे अब्रूरक्षण केले.
जगात कोणतीही वस्तू टाकावू नसते हा महान मंत्र द्रौपदीच्या चिंधीने जगाला दिला.
चिंधी चिंधी जोडून आई फाटक्या लुगड्याची गोधडी लेकरासाठी शिवते ती त्याला आयुष्यभर प्रेमाची ऊब देते.
रंगीबेरंगी चिंध्या रंगसंगती साधून एकत्र जोडून बाळासाठी देखणी दुपटी बारशाचेवेळी शिवली जातात. त्याला आईच्या मायेची ऊब असते त्यामुळे बाळ त्यात शांतपणे झोपी जातं.
शिर्डीचे महान संत श्रीसाईबाबांच्या अंगावर नेहमी चिंध्यांनी जोडून केलेला अंगरखा असे. आज मात्र त्यांच्या प्रतिमेला भरजरी कपड्यांनी सजवलं जातंय!
स्वत: अशिक्षित असूनही शिक्षणाचा व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या अंगावरही गोधडीचाच अंगरखा असायचा, म्हणून त्यांना गोधडेबुवाही म्हणत असत.
माझ्या लहानपणी मी त्यांना पंढरपूर,देहू आळंदी इथं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे.मी इतकी भाग्यवान की माझे वारकरी काका-काकू त्यांचे अनुयायी त्यामुळे आम्हा सर्वांना हातात झाडू घेऊन त्यांचेबरोबर आळंदीला थोडीफार स्वच्छता सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं.
माणदेशी महिला महोत्सवात बचत गटाच्या महिलांनी बनविलेल्या अतिशय सुंदर गोधड्या मला पहायला मिळाल्या.भारतात त्यांना रुपये पाचशे पासून अंदाजे पाच हजारांपर्यंत किंमत मिळते., तर परदेशातही त्यांना भरपूर मागणी असल्याचे समजले. श्रमजीवी महिलांना या चिंध्यांपासून एक चांगला रोजगार मिळाला व त्यांच्या श्रमाचं चीज झालं असं म्हणावं लागेल.
खेड्यातल्या महिलांना शेतातली उन्हाळी कामं झाली की दुपारचा भरपूर मोकळा वेळ असतो त्यावेळी बऱ्याचजणी एकत्र येऊन ‘वाकळा ‘ शिवतात. खेड्यात गोधडीला वाकळ म्हणतात. वाकळ जोडत असते एक एक चिंधी, तशा त्या महिलाही एकमेकींशी जोडल्या जातात. त्यांची मन एकमेकींकडं मोकळी होतात. मनात साठलेलं सगळं मळभ निघून जातं व त्या नवी ऊर्जा घेऊन ताज्या दमाने पुढल्या वर्षीच्या कामाला लागतात.
थोडा विचार केला तर माणसाच्या मनातल्या कप्प्यातही अशा अनेक चिंध्या असतात. त्या सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारच्या असू शकतात. त्यातली कुठली चिंधी कशी व कुठं जोडायची अन् आयुष्य कसं सांधायचं, जोडायचं, उभं करायचं हे प्रत्येकानं ठरवायचं असतं.
एकेक चिंधी जोडत त्याची वाकळ होऊ शकते तसेच आपल्या मनातले विचार एकत्र गुंफले तर त्यांच्या प्रतिभेला स्फुरण चढते व सुंदर प्रासादिक काव्य लेखन निर्मिती होऊ शकते !…. हो नां…!