श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ गीता जयंती विशेष – आपणही होऊ या अर्जुन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆
जगाच्या इतिहासात अशी एकमेव घटना असावी की ऐन युद्धाच्या धामधुमीत एका पथभ्रष्ट होऊ पाहणाऱ्या महापराक्रमी योध्यास त्याचा सारथी काही युक्तीच्या चार गोष्टी सांगतो. महापराक्रमी असणारा हा वीर पुरुष आपल्याशी लढायला सज्ज असलेल्या आपल्याच नातेवाईकांना पाहून युद्धातून पळ काढण्याची अनेक कारणे त्या सारथ्यास सांगतो. सारथी ती सर्व कारणे (?) शांत चित्ताने ऐकून घेतो. आणि त्यानंतर सलग अठरा अध्यायांचे कर्मशास्त्र त्यास सांगून त्या महापराक्रमी योध्यास युद्धास प्रवृत्त करतो. बरं ही कहाणी इथेच समाप्त होत नाही तर एका अर्थाने या कहाणीची ही सुरुवात (प्रारंभ) ठरते. कारण इतक्या सुस्पष्ट आणि चपखल शब्दात या आधी ‘कर्मशास्त्र’ कोणी कथन केलेले नव्हते. आणि केले असले तरी ते सामान्य जनांच्या कानी पडले नव्हते असेच म्हणावे लागेल.
श्रीमद्भगवद्गीता सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर सांगितली गेली आहे. ऐकणारा अर्जुन होता आणि सांगणारा साक्षात् भगवान कृष्ण होते. अर्जुन कोण होता तर पाच पांडवांपैकी एक. श्रीकृष्णाचा परमभक्त अर्जुन. प्रश्न असा पडतो की अर्जुनासारख्या नित्य नामस्मरणात असणाऱ्या थोर भक्ताला सुद्धा विषाद व्हावा, त्याचे मन अस्थिर व्हावे, हे विशेष नव्हे काय ? अर्जुनाची जर अशी स्थिती असेल तर सामान्य माणसाने काय करावे ? आजच्या एकूणच धकाधकीच्या जीवनात कसे आनंदी राहायचे हाच मोठा प्रश्न होऊन बसल्याचे आपल्या लक्षात येईल. अर्जुनाला किमान इतकी तरी खात्री होती, इतका तरी विश्वास होता की ‘भगवंत’ त्याच्या बरोबर आहेत, त्याच्या पाठीशी आहेत. आज सामान्य मनुष्याला त्याच्या बरोबर नक्की कोण आहे? याची शाश्वती नाही. तसेच बरोबर असणारे किती साथ देतील याची खात्री नाही. कारण त्याचा स्वतःवर जितका असायला हवा तितका विश्वासच नाही; तर दुसऱ्यावर कसा विश्वास असणार ? बरं, भगवंताला एखाद्याची दया आली आणि सहाय्य करण्यासाठी ते प्रगट झाले तरी या मनुष्याच्या मनातील शंका-कुशंका भगवंताला त्यास सहाय्य करण्यापासून नक्की रोखतील, अशी स्थिती आहे. आजच्या ‘अर्जुना’चे इतके ‘स्खलन’ झाले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.
गीता ही ‘धर्मक्षेत्र’ असलेल्या ‘कुरुक्षेत्रा’वर सांगितली गेली आहे. त्यामुळे भगवंतांना प्रगट होण्याइतके तरी ‘धर्मक्षेत्रे’ टिकविण्याची नितांत गरज असल्याचे आपल्या लक्षात येईल. सध्याचे ‘कुरुक्षेत्र’ हे ‘धर्मक्षेत्रां’वर आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण सामान्य मनुष्य स्वधर्मपालन करताना दिसतोच असे नाही किंवा स्वधर्म म्हणजे नक्की काय असते हे सांगण्याची, शिकविण्याची व्यवस्था आज आपण निर्माण केली नाही किंवा करू शकलेलो नाही. सध्या मनुष्य फक्त ‘धावतोय’. सकाळी उठून नोकरीवर जाण्यासाठी आणि नंतर नोकरीवरून घरी पोचण्यासाठी. कधी सुखाच्या मागे तर कधी दुःखापासून दूर जाण्यासाठी. यातच त्याची अर्धीअधिक ऊर्जा आणि वेळ खर्च होत आहे. आपण नक्की काय करतोय ? जगतोय की मरत नाही म्हणून जगतोय हेच त्याच्या लक्षात येत नाही.
मनुष्याला आपली सद्यस्थिती कळली तर तो त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकेल; पण सध्या मनुष्य शाळेत करायचा तसा ‘कदमताल’ करीत आहे आणि आपण फार मोठी उन्नती केली अशा भ्रामक समजुतीत सुख मानीत आहे. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे युद्धभूमीवर लाखो लोक असतील पण विषाद (संभ्रम) मात्र अर्जुनालाच झाला. कारण इथे अर्जुन सामान्य मनुष्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. जे मोठे (इथे कोणीही मनात जात आणू नये ) वर्गातील असतात त्यांना प्रश्न पडत नाहीत किंवा ते आपापल्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. तिसरा वर्ग लहान लोकांचा असतो त्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते, ते मिळविण्यातच त्यांचा वेळ जातो. प्रश्न फक्त दुसऱ्या वर्गातील अर्थात मध्यम प्रवृत्तीच्या माणसांना पडतात. आजपर्यंत जितक्या म्हणून ‘चळवळी’ झाल्या, आंदोलने त्यात सामान्य मनुष्य आघाडीवर असल्याचे आपल्या लक्षात येईल. भारतीय स्वातंत्र्ययुध्दात भाग घेतलेली बहुतांश मंडळी मध्यमवर्गीयच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ‘सामान्य’च होते. रामाने सुद्धा (वा)नरांच्या मदतीने रावणाचा पराभव केलेला आहे. या सर्व गोष्टी म्हणजे आपला विजयी आणि स्फूर्तिदायक इतिहास आहे.
भगवद्गीता हे ‘पुस्तक’ नाही. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ताण-तणावाच्या परिस्थितीला सकारात्मक, ‘स्वधर्मा’ची कृती जोडून तोंड देण्यासाठी केलेले ते उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. आयुष्यात अनेक समर प्रसंगांना तोंड देताना सर्वसामान्य माणूस अर्जुनाप्रमाणे गलितगात्र होऊन जातो. नैराश्य दाटून येते. कुठे तरी पळून जावेसे वाटते. मनुष्याला नित्यकर्म करावीशी वाटत नाहीत. हे करू की ते करू ? मीच का करायचे ? देव फक्त मलाच दुःख देतो ? माझेच वाईट होते अथवा केले जाते ? असे अनेक प्रश्न मनुष्यास पडत असतात. मग, मनुष्य थातुरमातुर कारणे देऊन निज कर्तव्यापासून स्वतःला दूर न्यायला लागतो. हाच ‘विषाद’.
‘विषाद’ कधी भोगात आणि कधी रोगात परिवर्तीत होत असतो. विषाद ‘योगात’ परावर्तित झाला तर गीतेचे ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यास विश्वरूप दर्शन होऊ शकते. पण तो जर भोगात किंवा रोगात परावर्तित झाला तर मात्र मनुष्याचे मोठे नुकसान होते.
त्या अर्जुनाला स्वत:च्या मर्यादांची जाणीव होती आणि कृष्णावर विश्वासही होता. अहंकार बाजूला ठेवून कृष्ण काय सांगतो आहे ते ऐकून घेण्याची, शरण जाण्याची त्याची मनापासून तयारी होती. म्हणूनच त्याच्या विषादाचे परिवर्तन ‘योगा’त होऊन जीवनाचे चिरंतन, शाश्वत तत्त्वज्ञान जन्मास आले. आपल्या विवंचना, चिंता आणि अन्य सर्व समस्यांकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघता आले पाहिजे. हाच दृष्टिकोन श्रीमद्भगवद्गीता आपल्याला शिकविते. त्यासाठी मात्र अर्जुन होण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, तसा प्रयत्न करायला पाहिजे, किमान प्रारंभ !!!
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈