श्री जगदीश काबरे
☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…–” ☆ श्री जगदीश काबरे ☆
लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल, तर सोशिकपणा धारण केला पाहिजे, हा आपल्या विचाराचा गाभा असला पाहिजे तरच आपण समाजसुधारणेच्या कामात तग धरू शकू. सुधारणेची गरज वाटते ती सुधारकाला. तो ज्या लोकांना सुधारण्याची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची, किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण सुधारक जिला सुधारणा म्हणतो, ती कुधारणाच आहे, असे स्थितिशील समाजाला वाटत असते. अशा वेळेस सार्वजनिक संस्था उभारणे आणि शस्त्रकाट्याच्या कसोटीवर टिकवून ठेवणे ही एक कसरतच असते.
अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून, त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की, कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल, तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमतांविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव देशात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे संस्थापक, त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही.
सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मात्र मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत, त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड, ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, तरच ती संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈