श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… ज्याचं त्याचं प्राक्तन किती वेगवेगळं असतं… हे जागतिक सत्य आहे आणि ते सर्वांना विदीत असतचं… फरक एव्हढाच असतो आपल्या सगळ्यांना मात्र हवं असतं फक्त अनुकूल असणारं प्राक्तन… म्हणजे बघा अथ पासून इति पर्यंत.. नव्हे नव्हे आदी पासून अंतापर्यंत अर्थात जन्मापासून ते मृत्युपर्यंत सगळा आयुष्याचा प्रवास कसा सुशेगात आणि सुखात होईल.. आता त्या मिळणाऱ्या सुखाची मात्रा थोडीफार कमीजास्त चालते पण अगदीच सुख मिळूच नये अशी भावना कधीच नसते बरं त्यात… तो आला राजा सारखा, सुखाचा जगला नि गेला अशी मागची जगरहाटी बोलत राहावी हिच एकमेव इच्छा असते…. पण पण…
प्राक्तनाचं दान देणाऱ्याच्या मनात नेहमी वेगळचं काहीतरी असतं… आपल्याला कायमचं ते गुढ असतं, रहस्यमय असतं… चारचौघांसारखाच असणारा आपला हा आयुष्याचा प्रवासात सतत आपल्या वाट्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळचं येत असतं… अनाकलनीय गोष्टी घडत असतात… अगदी कितीही पद्धतशीरपणे नियोजनबद्ध जगायचं आपणं ठरवतो हो पण तो नियंता तिसरचं आपल्या भाळी मारत असतो…घालमेल होते तेव्हा आपल्या जिवाची… सगळ्यांनाचं भलं करणार आपल्यालाच कसा विसरला असा प्रश्न पडतो.. आणि गमंत म्हणजे हे असं प्रत्येकाच्या मनात तस्सचं येतं.. मग तुम्ही कसंही जगा.. स्वतःसाठी, दुसऱ्या साठी काहीही फरक पडत नाही… जे जे होणार ते ते ठरल्याप्रमाणे तसेच होणार… ना आपल्याला ना दुसऱ्याला त्यात काडीमात्र बदल घडवून आणता येत नाही… साधी गोष्ट जन्म कुठे कधी व्हावा ते शेवटचा श्वास कधी कुठे सोडून द्यावा आहे का आपल्या हातात… मग या दोघांच्या मधल्या प्रवासातील अनेक गोष्टींचा आयुष्यभर आटापिटा करत असतो तो अनुकुलता असावी… पण प्रतिकुलतेची छाया सतत मंडरत राहते आणि आपला संघर्ष तिथे सुरू असतो… क्षणाचा आनंद मिळतो आयुष्याची बाजी लावून… संघर्षात उभे असतात आपलेच म्हणवारे,शत्रू, हितचिंतक… मुखवटे घातलेले चेहरे दाखवून…आणि आणि यादी कितीही मोठी करता येईल… तर हा सगळा प्रपंच आठवला कशावरून… ते प्राजक्ताचं फुल दिसलं आणि हा फापट पसारा मांडत गेलो…
प्राजक्ताचं इवलं इवलसं नाजूक सुकोमल फुलं बघाना.. उमलून येतं तेव्हा सुंगधाने किती परिलुप्त असतं.. फांदी फांदीवर लगडलेलं दिसतं.. किती किती प्रसन्न, टवटवीत नि आनंदविभोर असतं ते स्वतः आणि इतरांनाही ते तसाच अनुभव देतं… त्या प्राजक्तांच्या फुलांकडे बघताना प्रत्येकाला त्या फुलांबदल प्रेम हे वाटतचं… असं वाटतं या फुलानं असचं कायम या फांदीवर झुलत राहावं… पण तो वाहणारा वारा मात्र दोषाचा धनी होतो… अगदी मंद झुळूकेच्या रूपात वाहत जातो तेव्हा तो या निष्पाप फुलांना फांदी वरून अलगदपणे उचलून घेऊन जातो आणि आणि मधेच जड झाले बुवा आता तू माझ्या मागे मागे चाली चाली करत ये बरं असं सांगून त्या फुलांना तो जमिनीवर सोडून जातो… काही वेळ ती अबोध फुलं जमिनीवरून देखील वाऱ्यासह घरंगळत पुढे पुढे जाउ लागतात… पण तो प्रवास अल्पजीवी असतो.. त्यांचं सुकोमल देह धुळीत, मातीत लोळून गेल्यानं दगड धोंडे यांसारख्या अडथळ्यांना तटल्याने थकून जाऊन गलितगात्र होऊन मातीमय होतात… आपला शेवटचा श्वास त्या मातीमध्ये घेताना त्या मातीला आपला सुगंध अर्पण करून जातात… जवळपास सगळ्या फुलाचं असचं होतं… पण काही फुलं वाऱ्याने इतस्ततः होतात., भरकटतात… एकटीच पडतात… शोध घेत असतात इतरही फुलांचा ती कुठे आहेत… पण तो शोध कधीच लागत नाही… मग एकटेच पडल्याने त्यांच्या नशीबी बेवारसाचं मरणाला सामोरं जावं लागतं…जगणं आनंदाचं झालं वाटतं नाही तोच बाभळीच्या काट्यासारख्या झाडांच्या फांदीत अडकून पडणं होतं.. अरे तू कोण आहेस.. आणि इतका सुंदर सुगंध तुझ्याजवळ कोठून आला… थोडा आम्हालाही तो सुंगधानं न्हाऊ घालना.. नाही तरी आमच्या जगण्याला तसा काहीच अर्थ उरलेला नाही… ना आमच्या कडे कधी कोणी ढुंकूनही पाहिले जात नाही… आज तू आमच्या तावडीत बरा सापडला आहेस.. तेव्हा आमचं सगळ्याचं जिणं सुगंधीत करं बरं… असं म्हणून त्या प्रत्येक काट्याने त्या फुलाला कवटाळून घेण्यास सुरुवात करायला घ्यावी… या काट्यांच्या धुसमुळेपणाने त्या प्राजक्ता च्या फुलाच्या नाजूक देहाला कैक ओरखडे बसू लागतात…एकेक पाकळी विर्दिण होत जाते.. छिन्नविछिन्न होते.. केशरी देठ अलग होऊन तो एकिकडे खाली मातीत पडतो नि त्या त्या पाकळ्या आपला निश्वास सोडत दूर दूर मातीत गलितगात्र होऊन पडतात… त्या आक्रस्ताळी काट्यांना प्राजक्ताचा सुगंध तर मिळालाच नाही… उलट जनमानसाकडून त्याच्या या कृत्याची निर्भत्सना मात्र त्यांची झाली… अरसिक,निर्दयी मनाचे काट्यांनी अखेर त्या चुकलेल्या फुलाची जीवन यात्राच संपविली…. मग कुणी सात्वंनपर म्हणत गेलं त्याचं प्राक्तनच तसं होतं… आगळं वेगळं जगावेगळं… क्षणभंगुर जीवनात सुगंधाची बरसात करून जगलं… मी नियंता असूनही मला त्या प्राजक्ताच्या सुंगधाला वंचित व्हावं लागावं हा केव्हढा दैवदुर्विलास आहे…त्या नियंत्याला सुध्दा एक वेळ मनात किंतु चा कंटक टोचत राहतो…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈