डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई …  ☆ डॉ अभिजीत सोनवणे

साधारण चार वर्षांपूर्वी COVID लॉकडाऊन काळात मला भेटलेली एक माऊली… 

स्वतःचं सर्व आयुष्य उध्वस्त झालेलं… 

मुलं सोडून गेलेली… 

आयुष्य संपवायच्या विचारात असलेली…

 

त्याच टप्प्यावर एक अपंग मुलगा तिच्या आयुष्यात येतो… 

ती त्याचं मातृत्व स्वीकारते…. 

70 व्या वर्षी ती पुन्हा आई होते… 

त्याच्या आनंदासाठी ती कोणत्याही थराला जावू शकते… 

….. फक्त एक आईच हे करू शकते…. !!! 

 

हा सर्व भावपूर्ण प्रसंग मी माझ्या शब्दात ” आई ”  या शीर्षकाखाली मांडला होता ! 

 

श्री. व सौ. भाविका काळे हे माझे स्नेही… त्यांचा मुलगा विवस्वत काळे… ! 

कोवळ्या वयातच या मुलाने दिग्दर्शक होण्याचे स्वप्न पाहिले… ! 

पहिल्यांदा हा मला भेटला, त्यावेळी मी त्याला विचारले, “ बाळा आयुष्यात तुला पुढे काय करायचंय ?” 

 

“ समाजाला एक सकारात्मक दिशा मिळेल… नुकत्याच उमलणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना एक आशा मिळेल; असे चित्रपट मला पुढे बनवायचे आहेत काका …  मला व्ही. शांताराम सर, सत्यजित रे साहेब यांच्यासारखा दिग्दर्शक व्हायचंय… “ .. ठाम स्वरात विवस्वत बोलत होता. 

…. हा मुलगा जेमतेम १८  वर्षाचा सुद्धा नसेल… 

 

अठरा वर्षांचा असतानाचा मला मी आठवलो … 

शाळा / कॉलेज बुडवून, दे धमाल हाणामारीचे पिक्चर मी मित्रांसोबत पाहायचो… 

एकतर डोअरकीपर आमचा मित्र असायचा… आमच्या भीतीने तो तिकीट नसतानाही गप गुमान आम्हाला आत सोडायचा… 

एखाद्या अनोळखी डोअरकीपरने आत सोडायला आम्हाला अटकाव केला तर, चित्रपटाआधीच आमच्यातल्या प्रत्येकाच्या अंगात बच्चन… मिथुन… धर्मेंद्र यायचा… ! 

… मग त्या नवीन डोअर कीपरचा आम्ही “चुथडा” करायचो… ! 

 

मी साधारण त्यावेळी बारावीत असेन… 

मला कोणतीही दिशा नव्हती… ! 

वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये…. वडिलांचे मित्र म्हणजे लय मोठे अधिकारी… 

ते घरी यायचे आणि मला विचारायचे, “ बाळा आयुष्यात पुढे तू कोण होणार आहेस… ? “

मी नव्या नवरीगत खाली मान घालून उत्तर द्यायचो… “ बच्चन, मिथुन किंवा धर्मेंद्र… ! “

….. ते मोठे सायेब गेल्यावर, बापाचा लय मार खात असे मी… ! 

 

आम्हाला … म्हणजे आमच्यासारख्या मुलांना एक सकारात्मक दिशा मिळेल… नुकत्याच उमलणाऱ्या, आमच्यासारख्या तरुणांना एक आशा दिसेल, असे आमच्यापुढे कोणीच रोल मॉडेल नव्हते… किंवा असतील तर त्यांना पाहण्याइतपत … समजण्याइतपत आमची अक्कल आणि लायकी नव्हती…  

 

‘ अशा मोठ्या लोकांना पहा रे… समजून घ्या रे बाळांनो… ‘   हे प्रेमानं सांगणारे लोकही आम्हाला त्यावेळी भेटले नाहीत… ! 

मला फक्त आठवतात… चुकलो म्हणून मुस्काटावर खणखणीत मारलेला हात…. आणि ढुंगणावर बसलेली लाथ… !

 

…. “हात” आणि “लाथ” यापेक्षा आमच्यासारख्या नालायक मुलांशी, थोडीशी जर कोणी केली असती “बात”….  तर आम्ही बी घडलो असतो… ! 

… पण नाही… आम्ही बिघडलो…. ! 

 

“ सर…” विवस्वत ने हाक मारली आणि मी डोळे उघडून, भूतकाळातून पुन्हा वर्तमान काळात आलो…!

“ सर मला तुमचा “आई” हा अनुभव आवडला आहे…  आणि मी त्यावर शॉर्ट फिल्म करू इच्छितो, आयुष्याची सुरुवात … ध्येयाची सुरुवात मी आपल्यापासून करू इच्छितो… आपल्या शब्दांनी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल समाजामध्ये…आपण मला शॉर्ट फिल्म करायची परवानगी द्याल काय ?” 

 

डोळे उघडून मी जागा झालो…  

…. जगाने “ना लायक” ठरवलेल्या माझ्यासारख्या एका मुलाला, विवस्वत नावाच्या दुसऱ्या एका “लायक” मुलाने दिलेली ही सलामी होती…

माझ्या डोळ्यात पाणी होतं… !!! 

 

मी त्याला म्हणालो,  “ ए भावा, समाजाला दिशा किंवा तरुणांची आशा म्हणून माझे शब्द किती योग्य ठरतील मला माहीत नाही रे… पण तू आयुष्याची सुरूवात माझ्या सारख्या नालायक माणसापासून करू नकोस… समाजात खूप लायक आणि नायक लोक आहेत… तू त्यांची एखादी कथा किंवा अनुभव घे ना..!”

 

“ सर, प्लीज तुम्ही लायक आहात किंवा नालायक हे समाजाला ठरवू द्यात… विवस्वत सारख्या मुलांना ठरवू द्यात… तुम्ही जजमेंट नका देऊ…”  सौ भाविकाताई काळे, विवस्वतची आई बोलली. 

…. यापुढे परमिशन देण्या आणि घेण्याचा प्रश्नच नव्हता… ! 

 

यानंतर या छोट्या मुलाने, “आई” नावाने एक शॉर्ट फिल्म बनवली… 

ती जगभर गाजली… 

माझ्या शब्दांना त्याने चित्ररूप दिले… ! 

या शॉर्ट फिल्मची लिंक खाली देत आहे…

…… शॉर्ट फिल्म आवडली, तर त्याचे सर्व श्रेय विवस्वतचे… ! … माझा रोल करणाऱ्या श्रीपाद पानसे यांचे… 

… आजीचा रोल करणाऱ्या श्रीमती आरती गोगटे यांचे… 

https://youtu.be/zhm6g-X2IoQ?si=J-1bGa6aAKZlXaiv

नाहीच आवडली फिल्म, तर सर्व शिव्या या  ना – लायकाच्या पदरात घाला… ! 

मी पदर पसरून उभा आहे माऊली… !!! 

आपला;

डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments