डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ कुणाच्या खांद्यावर… — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(आधीच आजी सतत म्हणत असते, “ बघ, तुझी आई तुला टाकून गेली. मी सांभाळलं नसतं तर काय केलं असतंस रे तू? कठीणच होतं बरं बाबा तुझं.”) – इथून पुढे —
“मावशी, हे सतत ऐकून माझा कॉन्फिडन्स शून्यावर आलाय. सगळा खर्च हल्ली आजी माझ्यावरच लादते. अगं नुसत्या स्वयंपाकीण बाईना आठ हजार पगार देते आजी. मला हे दिसतं पण मला बोलता येत नाही ग. पण मी जर या वयात आजीला सोडून गेलो तर तो कृतघ्नपणा होईल. तीही म्हातारी होत चाललीय ना?”
“चिन्मय, असा वेडेपणा करू नकोस राजा. आजी ही तुझी जबाबदारी नाही. आम्ही तिच्या तीन मुली आहोत. जरी तुझ्या आईने टाळले तरी मी आणि अमला मावशी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. तुला तुझं आयुष्य आहे ना? हक्क आहे तुला ते आनंदात जगायचा. तू असा आजीत गुंतून राहू नकोस. सरळ बँकेचे कर्ज काढून छानसा फ्लॅट घे. मिळेल ना तुला कर्ज? ”.. आरती त्याला समजावत म्हणाली.
“हो मिळेल मावशी. पण मग आजीचं काय? “
“ते मी बघते. बोलते आईशी दोन दिवसात. ” … पण आरती विचारात पडली. हा गुंता कसा सोडवावा याचा तिने खूप विचार केला.
दुसऱ्या दिवशी तिने रजनी ताईंजवळ हा विषय काढला… “ आई, चिन्मयच्या लग्नाचं काय करायचं आपण?”
रजनीताई म्हणाल्या, “ करू दे की खुशाल. आहे का हिम्मत वेगळं घर घ्यायची? मी म्हणून दिलाय बरं थारा. ”
आरतीला हे ऐकून अत्यंत चीड आली.
“आई, अग काय बोलते आहेस हे तू? त्या बिचाऱ्या चिन्मयचे आयुष्य तू स्वतःला जखडून टाकलं आहेस. पार घरगडी करून टाकला आहेस तू त्याला. किती करतोय तो तुझ्यासाठी हे समजत नाही का तुला? सतत हुकूम करत असतेस त्याला आणि राबवून घेत असतेस. आणि खुशाल म्हणतेस हो ग, आहे का हिम्मत त्याच्यात ? हे बघ.. नक्कीच आहे त्याच्यात हिम्मत. तो बँकेचे कर्ज काढून फ्लॅट घेऊ शकतो. लग्न करू शकतो. तू त्याला अशी जखडून ठेवू नकोस. गुणी मुलगा आहे ग तो. आई, आम्ही तीन मुली आहोत तुला. तू ही आमची जबाबदारी आहेस, त्या चिन्मयची नाही. अशी स्वार्थीपणाने वागू नकोस ग. हे बघ. मी सांगते ते ऐक. बघ पटतं का. मी आणि अमला सुदैवाने उत्तम आर्थिक परिस्थितीत आहोत. अलका तर एक नंबरची स्वार्थी आणि अप्पलपोटी निघाली. तिला आम्ही आमची बहीण मानतच नाही. तर, हा तुझा फ्लॅट तू एकट्या चिन्मयच्या नावावर कर. तू इच्छापत्र कर आणि हे घर चिन्मयला दे. तो तर हे न घेता सुद्धा कायम तुझ्याजवळ राहील.. पण त्याच्या चांगुलपणाचा आपण किती फायदा घ्यायचा? मी आणि अमला तुझी सेवा, देखभाल करायला येणं अशक्य आहे ग. आणि आम्हाला तुझ्या इस्टेटीतलं खरोखर काहीही नको. पण हा आपला चिन्मय सज्जन आहे, तुझ्याबद्दल किती माया आहे त्याच्या पोटात. तू आता त्याचाही विचार कर. उद्या त्याचं लग्न होईल. त्याची बायको का म्हणून तुझ्या घरात नोकरासारखी राहील? तू तिलाही असे वागवायला कमी करणार नाहीस. मी ओळखून आहे तुला. तर हे पटतंय का बघ. दोन दिवस विचार कर. पण मी चिन्मयचं आयुष्य मार्गी लावल्याशिवाय यावेळी जाणार नाही हे नक्की. त्याला आधार नको का? उद्या तू त्याला हाकलून दिलंस तर तो कुठे जाईल? नीट विचार कर. शेवटी तरी तू हे घर आम्हा मुलींना देणार. पण जर ते आम्हालाच नकोय तर ते तू चिन्मयला द्यावेस. तो तुला कधीही अंतर देणार नाही ही मला खात्री आहे. ” अतिशय गुणी गरीब मुलगा आहे तो. हे मी अमलाशीही फोनवर बोलले आहे. तिलाही हे अगदी मान्य आहे. उद्या मला विचार करून सांग. आणि मी आत्ता म्हणतच नाहीये की तू त्याला आत्ताच हा फ्लॅट देऊन टाक… मला कळतंय, तुलाही नक्की वाटत असणारच, की जर चिन्मयने नाही विचारलं तर आपलं काय होईल? म्हातारपण वाईट असतं बरं. हे मलाही माहीत आहेच ग. पण हे तू तुझ्या पश्चात करायचे आहे. आत्ता कोणालाच हा फ्लॅट द्यायचा नाही. बघ पटतंय का… आणि हो… आणखी एक. चिन्मय ठराविकच रक्कम तुला देईल. तू वाटेल तसा खर्च करायचा नाहीस. तुझ्या डॉक्टरचा खर्च, औषधपाणी सर्व खर्च यापुढे तूच करायचा. चिन्मय करणार नाही. किती ओरबाडून घेशील ग त्याला आई? कमाल आहे तुझी. तुझा खर्च तूच करायला हवास. त्याचा अंत बघू नकोस. नाही तर चिन्मय स्वतःचा फ्लॅट घेईल आणि निघून जाईल. आम्ही दोघी सतत अजिबात येऊ शकणार नाही तुझ्यासाठी. मग नाईलाजाने वृद्धाश्रम हाच पर्याय उरतो आमच्याजवळ. बघ…. विचार कर आणि सांग मला. त्याप्रमाणे निर्णय घेऊन मगच मी लंडनला जाईन. ”
… अत्यंत परखडपणे आरती हे रजनीताईंशी बोलली. कोणीतरी हे बोलायला हवंच होतं.
दुसऱ्या दिवशी रजनीताई म्हणाल्या, ”आरती, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी खूप स्वार्थीपणे वागले सगळ्यांशी. पण पटलं मला तुझं. मी चिन्मयच्या नावावर हा फ्लॅट माझ्या मृत्युपत्राद्वारे करते. तू चांगला वकील शोध. आपण माझं मृत्युपत्र रजिस्टर करू म्हणजे चिन्मयला माझ्या पश्चात अडचणी येणार नाहीत. शिवाय मी माझ्या अकाउंटमधून सगळा खर्च करत जाईन. ठेवून तरी काय करायचा तो पैसा? माझं खरंच चुकलं ग वागायला चिन्मयशी. करू दे लग्न तो एखाद्या चांगल्या मुलीशी आणि दोघेही इथेच आनंदात राहू देत. मी सगळ्या कामाला बाई ठेवीन म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही. ”
आपल्या आईचे हे बोलणे ऐकून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं रजनीताईंना मिठी मारली.
“आई, किती चांगली आहेस तू. वेळेवर स्वतःची चूक कबूल करायलाही मोठं मन लागतं ग. मी मुलगी आहे तुझी. तुझ्यावरही अन्याय होऊ देणार नाही आणि चिन्मयवरही नाही. ”
आरतीने चार दिवसात वकील बोलावले आणि रजनीताईंचं मृत्युपत्र रजिस्टर केलं सुद्धा. याही गोष्टीला बरेच दिवस होऊन गेले. चिन्मय – विदिशाचं लग्न झालं. दोघे आजीच्या घरात आजीबरोबर सुखात राहू लागले. रजनीताई विदिशाशी अतिशय छान वागू लागल्या.
हा त्यांच्यात झालेला बदल किती सुखावह होता. ! विदिशा तर लाघवी होतीच. तिनेही आजी आजी करत त्यांना जिंकून घेतलं.
आरतीचा निर्णय अगदी शंभर टक्के खरा ठरला.
आज रजनीताई या जगात नाहीत. पण आरतीच्या सल्ल्याप्रमाणे ते रहातं घर, बँकेतली शिल्लकही चिन्मयला देऊन आणि चिन्मय आणि विदिशाचा सुखी संसार बघूनच त्यांनी डोळे मिटले.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈