श्री सुनील शिरवाडकर
इंद्रधनुष्य
☆ अलेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
अलेक पद्मसी
त्या दिवशी ‘लिंटास’ मध्ये मिटींग होती. ‘युनीलिव्हर’ चं एक प्रॉडक्ट ‘रिन डिटर्जंट बार’ भारतामध्ये लॉंच करायचं होतं. तसं हे प्रॉडक्ट इतर देशात फेल गेलेलं.. ‘लिव्हर्स’ चा आग्रह होता की जाहिराती मध्ये ‘हा बार स्वस्त आहे’ यावर भर द्यावा पण अलेक आणि त्याच्या टिमचं म्हणणं.. शुभ्रतेवर भर द्यावा.
बऱ्याच चर्चेनंतर अखेर भर शुभ्रतेवरच द्यावा हे म्हणणं मान्य झालं. आणि मग अलेक पद्मसी आणि त्याच्या सहकार्यांनी ‘ती’ जाहिरात बनवली आसमंतातुन येणारा विजेचा झोत.. आणि मग त्यामागे येणारे शब्द..
… Whitening strikes again and again with RIN
आणि मग त्यानंतर इतिहास घडला. रिन आणि भारताचे अतूट नाते निर्माण झाले. रिनच्या विक्रीचे आकडे छप्पर फाडून वर गेले.
अगदी याउलट झाले ते काहीवर्षांनंतर. ‘निरमा’ पावडरचा खप प्रचंड वाढला होता. ‘सर्फ’ ची विक्री खूपच घसरलेली. ‘सर्फ’ साठी नवीन जाहिरात बनवायची होती. पुन्हा एकदा अलेक पदमसी आणि त्याची टीम कामाला लागली. यावेळी ‘लिव्हर्स’ चं म्हणणं जाहीरातीत शुभ्रतेवर भर द्यावा. वास्तविक ‘निरमा’ च्या तुलनेत ‘सर्फ’ खूपच महाग होता. यावेळी अलेकचं म्हणणं वेगळं होतं. अर्धा किलो सर्फ एक किलो निरमाच्या बरोबरीचा आहे हे त्याला गिऱ्हाईकांना पटवून द्यायचं होतं. अंतिमतः सर्फच घेणं फायदेशीर कसं आहे हे दाखवण्यासाठी त्याने एक भारतीय गृहिणी उभी केली.. ‘ललिताजी’ तिचं नाव. वेगवेगळ्या जाहिरातीतुन ललिताजी मग पटवुन देऊ लागली…
” भाई साब, सस्ती चीज और अच्छी चीज में फर्क होता है”… ती प्रत्येक गोष्ट विचार करुनच खरेदी करते.. आणि शेवटी म्हणते..
… “ सर्फ की खरीददारी में ही समझदारी है “
आणि मग तिथुन सर्फने पुन्हा एकदा मोठी झेप घेतली.
अश्या अनेक जाहिरातींमागे अलेकचं कल्पक डोकं होतं. मग ‘चेरी ब्लॉसम’ चा चार्ली असो.. की धबधब्याखाली आंघोळ करणारी ‘लिरील गर्ल’ असो.. ‘कामसुत्र’ची पूजा बेदी असो की ‘एमआरएफ’ चा मसलमॅन… अलेक पद्मसीने भारतीय समाजमन अचुक जाणलं होतं. प्रत्येक जाहिरात तो विचारपूर्वक बनवायचा.
अलेक पद्मसी.. एक खरा भारतीय. दक्षिण मुंबईत कुलाबा कॉजवेवर त्यांची अलिशान हवेली होती. वडिलांचा काचेचा व्यवसाय. घरात पाश्चात्य वळण.. पाश्चिमात्य वस्तूंची रेलचेल.. हंड्या.. झुंबरं.. भव्य पेंटिंग्ज.. इटालियन फर्निचर.. रविवारी सगळं कुटुंब ‘मेट्रो’ ला जायचं…. इंग्लिश फिल्मस् पहायला.
पण अलेक आणि त्याच्या भावंडांना मात्र नाटकाचं वेड. रात्र रात्र त्यांच्या दिवाणखान्यात तालमी चालायच्या. आणि मग त्यातुनच अलेकमधला अभिनेता घडत गेला.
रिचर्ड अँटनबरो ‘गांधी’ बनवत होते. महंमद अली जिनांच्या भुमिकेसाठी त्यांनी अलेकची निवड केली.
‘गांधी’ च्या संपुर्ण निर्मिती प्रक्रियेत तो अँटनबरो सोबत होता. गांधींच्या अंत्ययात्रेचं शुटींग करायचं होतं. त्यासाठी दिल्लीतल्या राजपथावर सुमारे पाच लाख लोकांची आवश्यकता होती. 31 जानेवारी 1981 या दिवशी हे शुटींग करण्याचं ठरलं. लोकांनी यात सहभागी व्हावं म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची होती.
रिचर्ड अँटनबरो अलेकला म्हणाले.. “ तू जाहिरात क्षेत्रातला आहेस.. लोकांनी शूटींगसाठी यावं यासाठी तू एक जाहिरात बनवशील? “…. आणि मग 30 जानेवारीच्या हिंदुस्थान टाईम्समध्ये अलेक पदमसीने बनवलेली एक ओळीची जाहिरात प्रसिद्ध झाली…. ३१ जानेवारीला इतिहासाची पुनर्निर्मिती होणार आहे. त्यावेळी तुम्ही तिथे असाल ?
… आणि खरंच त्या जाहिरातीला मिळालेला प्रतिसाद अपूर्व होता. अँटनबरोंच्या मनातील कल्पना ते जशीच्या तशी साकारु शकले ते केवळ आलेकमुळे.
अलेक पद्मसीच्या आत्मकथेचं नाव आहे.. “ अ डबल लाईफ. ”
खरंच तो दुहेरी आयुष्य जगला. चित्रपट.. दूरदर्शन.. वर्तमानपत्र.. यासाठी त्याने शेकडो जाहिराती बनवल्या.. पण तो एक उत्तम अभिनेता होता, दिग्दर्शक होता आणि एक रत्नपारखी सुध्दा.
अलेकनं अनेक जणांना घडवलं. त्यात श्याम बेनेगल होते.. कबीर बेदी होता.. डान्स डायरेक्टर शामक दावर.. अलीशा चिनॉय होती.. पॉपसिंगर शेरॉन प्रभाकर तर त्याची बायकोच. तिच्यामधले गुण हेरुन …. त्याच्याच मार्गदर्शनाने ती पॉप म्युझिकमध्ये टॉपला पोहोचली.
भारतीय समाजमन अचूक जाणणारा.. आपल्या जाहिरातींमधून त्यांच्या भावनेला हात घालणारा इंग्रजी रंगभूमीवर पन्नास नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा अलेक पद्मसी…. उच्च कोटीची प्रतिभा. कलात्मकता.. सर्जनशीलता.. आणि अपूर्व संघटन कौशल्य.. नाटकातून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट कधीच नव्हतं. म्हणूनच तो म्हणतो ….
“रंगभूमी रोजीरोटी मिळवून देऊ शकत नाही, हे खरं आहे…. पण तो माझा श्वास आहे. जाहिरात क्षेत्रात मात्र असं नाही. कॉपी लिहा…. शब्दांशी खेळ करा.. चित्रिकरण करा.. सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणा.. आणि भरपूर पैसे खिशात टाका. “
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈