सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
☆ “‘हो ची मिन्ह‘ च्या विमानतळावरची दिवाळी…” ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆
मोठी सुट्टी लागली की एखादी परदेशात सहल करावी असे बरेच दिवसापासून मनात होते. माझी आणि मुलीची सुट्टी अगदी दिवाळीच्या दिवसातच होती, त्यामुळे दिवाळी घरी साजरी न करता सहलीला जायचे ठरवले.
खूप विचारपूस व चौकशी केल्यावर आम्ही एक आठवड्याची व्हिएटनामची सहल ठरवली. दिवाळीचे कुठलेच दिवस घरी नसल्यामुळे दिवे पणत्या, आकाशकंदील रांगोळी, फराळ बनवणे ह्या सगळ्या गोष्टी सोडून फिरायला जावे लागत होते त्यामुळे मनात थोडी खंत होते. पण सुट्टी कमी असल्यामुळे तसे करणे भाग होते.
मुंबईहून आम्ही सकाळी हो ची मिन्ह ला पोचल्यावर जेवण कुठे करता येईल ह्याचा शोध घेत आम्ही खूप फिरलो. शुद्ध शाकाहारी जेवणाच्या शोधात खूप वेळ गेला व शेवटी दमल्यामुळे राहत्या हॉटेलमध्येच अननसाचा भात व बटाट्याच्या चिप्स यावर जेवण भागवावे लागले. एकूण काय तर जेवणाची आबाळच झाली. हे जेवतांना घरच्या भाजी भाकरीची निश्चितच आठवण आली. यापुढे प्रवासात जेवण कसे मिळेल ह्याची मनात पाल चुकचुकली.
रात्री मात्र केळीच्या पानात छान जेवण जेवायला मिळाले. दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात भारतीय भोजनालय शोधून गूगलची मदत घेवून आम्ही तंदूर नावाच्या हॉटेलमध्ये पोहचलो. दारातच शिवलिंग व त्याचा अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला गणपती, लक्ष्मी, बाळकृष्ण अशा अनेक देवदेवतांच्या मोहक मुर्त्या मांडल्या होत्या. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटले. जगजितसिंहची गझल कानावर पडली आणि आनंदात अजून भर पडली. मेनू कार्ड बघून तर आनंद अगदी द्विगुणित झाला. कांदा भजीपासून खिचडी पर्यंत सगळे पदार्थ तिथे उपलब्ध होते. तृप्तीची ढेकर देत आम्ही आमच्या राहत्या स्थळी पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच आम्हाला ‘ मॅकाँग डेल्टा ‘ बघायला जायचे होते. नाश्ता करायला गेलो आणि जरा हिरमुडच झाली. उकडलेले रताळे, कणीस, कच्च्या भाज्या आणि फळे ह्या पुढे फारसे काही शाकाहारी तिथे नव्हते. जे काही एक दोन भाताचे प्रकार होते त्यालाही फार काही चव नव्हती. तिथले लोक एवढे तंदुरुस्त ह्या जेवणामुळेच असावेत. मग भाज्या व फळे आणि ब्रेड खाऊन आम्ही गाडीची वाट पाहत बसलो. आम्हाला मॅकाँग डेल्टा बघायला जायचे होते व दुपारी तिथेच आमच्या जेवणाची सोय केली होती.
आम्ही जेवायला पोहोचलो तेव्हा काही स्टार्टर्स आमच्या टेबल वर आधीच ठेवले होते ते पाहून जरा बरे वाटले. नंतर खूप मोठ्या मोठ्या भाज्यांचे तुकडे असलेली पाणीदार भाजी आणि कोरडा पांढरा भात असे आम्हाला जेवायला आणून दिले गेले. एकूण काय बाहेर कितीही सृष्टी सौंदर्य असले तरी जेवण स्वादिष्ट मिळाले नाही तर चिडचिड होतेच. एकूणच हो ची मिन्ह ला फळं, फुलं आणि आत्ता ह्या भाज्या सगळे आकाराने खूप मोठे मोठे होते. दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला मिळालेल्या जेवणामधेच समाधान मानावे लागले. रात्रीच्या जेवणासाठी आम्ही भारतीय हॉटेल शोधले. इथल्या हॉटेलमध्ये चक्क मसाला डोसा, मेदू वडा व पावभाजी मिळाली व खूप छान वाटले.
दुसऱ्या दिवशी आम्हाला ‘दनांग’ ला जायचे होते म्हणून आम्ही परत त्या उकडलेल्या भाज्या व फळे खाऊन विमानतळावर आलो. विमानतळावर आल्यावर समजले की दनांगला जायचे विमान जवळ जवळ दोन तास उशीराने येणार आहे. त्यामुळें विमानतळावरच खूप वेळ घालवावा लागणार होता. अचानक तिथे एक चाळीस जणांचा घोळका आला. चौकशी केल्यावर समजले की ते मुंबईहून शाह कंपनीतर्फे व्हिएतनाम फिरायला आले आहेत. आम्ही आमच्या जवळचे फराळाचे पदार्थ खात वेळ घालवत होतो. त्यांच्यातील एकाने सगळ्यांना जेवणाची पॅक ताटे दिली. सगळेजण अगदी हसत खेळत आवडीने जेवू लागले. खूप दिवसांनीं ओळखीच्या अन्नाचा सुवास अगदी हवाहवासा वाटला. अचानक एक व्यक्ती तीन ताटे घेऊन आमच्याकडे आली आणि आम्हाला जेवायचा आग्रह करू लागली. तिथे भारतीय आम्हीच होतो म्हणून त्यांनी त्यांच्याकडे जास्ती असलेली ताटे आम्हाला दिली व ते आम्हाला जेवायचा आग्रह करू लागले.
त्यांनी खूपच आग्रह केल्यावर आम्ही त्याच्यातील एक जेवणाचे ताट घेतले. जेवण खूपच स्वादिष्ट होते. त्यानंतर एकजण आमच्यासाठी गुलाबजाम घेऊन आला व आग्रहाने आम्हाला त्यांनी ते खाऊ घातले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या पद्धतीचे अगदी स्वादिष्ट जेवण मिळाले त्यामुळे मन अगदी तृप्त झाले.
ह्या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे.. बाहेर कितीही सृष्टी सौंदर्य असेल, झगमगाट असेल, तरी घरची भाजी भाकरी किंवा भारतीय जेवण करून आम्हाला जे समाधान मिळाले ते खूप जास्त होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी भारतीय जेवणाचा आस्वाद घेता आला.
…. ‘ हो ची मिन्ह ‘ ला विमानतळावर दिवाळीच्या दिवशी जे स्वादिष्ट जेवण मिळाले त्यामुळे दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाल्यासारखे वाटले.
© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर
साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे
संपर्क : सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.
फोन : ७५०६२४३०५०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈