श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ समर्थ वाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
बरे असावे सुखी जगावे खरेच सारे मनात आहे
नमून घ्यावे तसेच द्यावे रिवाज हा ही जगात आहे
*
भले पणाच्या परिश्रमाने अमोल ठेवा घरात येतो
अजून नाही कुणास ठावे भविष्य लपले श्रमात आहे
*
मला कशाची जरूर नाही फिकीर नाही करावयाची
धनाढ्य मोठा असेल कोणी म्हणेल तोही भ्रमात आहे
*
पराभवाच्या अनूभवाने विशाल बुद्धी सतेज होता
जिथे कुठे मग अडेल तेथे विचार केला निवांत आहे
*
निभावताना जबाबदारी असेल कोणी हताश झाला
जपून त्याला उरी धरावा असा जगाच प्रघात आहे
*
पुराणपोथ्या लिहून गेले विचार त्यांचे समोर ठेवा
दुरावलेली मने जपाया उपाय त्यांच्या कथात आहे
*
जमेल तेथे जगावयाची सुरेख संधी लुटावयाला
सरावलेली समर्थ वाणी जपेल त्यांच्या मुखात आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈