डॉ. संदीप श्रोत्री
परिचय
शिक्षण – MBBS.MS. FIAGES. (लॅप्रास्कोपी व जी आय एंडोस्कोपी सर्जन.सातारा.)
फाउंडर सेक्रेटरी, सातारा सर्जिकल सोसायटी, फाउंडर सेक्रेटरी,असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांचे पदाधिकारी. तसेच या क्षेत्रातून सामाजिक सेवेचे उपक्रम यशस्वी रित्या राबवले आहेत.
कार्य व सन्मान:
- संस्थापक, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा
- दुर्ग साहित्य संमेलनांचे आयोजन व सक्रीय सहभाग
- वन्य लोकसंस्कृती व जैव विविधता यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रकारे जनजागृती
- डोंगर पठारावरील वनस्पतीत व पक्षी यांचा विशेष अभ्यास
- हिमालय ट्रेकिंग मोहिम… सहभाग व लेखन
- पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण यावर व्याख्याने,स्लाईड शो, वृत्तपत्रीय लेखन
- वसंत व्याख्यानमाला, पुणे
- निमंत्रित विख्यात : इंडिया क्लब, दुबई येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान… “माझी भटकंती” इत्यादी
- अध्यक्ष, तिसरे ‘ शिवार ‘ साहित्य संमेलन. इत्यादी
पुरस्कार
वसुंधरा पर्यावरण पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, कोयना निसर्ग मित्र पुरस्कार, द. महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी प्रवासी संघटना पुरस्कार, गिरिमित्र सन्मान पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी(कासवाचे बेट), वसुंधरा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार (कासवाचे बेट), श्री स्थानक ठाणे मराठी ग्रंथालय पुरस्कार (उत्कृष्ट प्रवास वर्णन), धन्वंतरी पुरस्कार, महाराष्ट्र. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (कासवाचे बेट)
प्रकाशित साहित्य
एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस, साद अन्नपूर्णेची, काटेरी केनियाची मुलायम सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवांचे बेट, मनू राष्ट्रीय अरण्य, इंकांची देवनगरी, रहस्यमय पेरु, निसर्ग गुपिते भाग १, सातशे पेक्षा जास्त लेखांचे विविध माध्यमातून प्रकाशन
इंद्रधनुष्य
☆ त्याचं असं झालं… भाग-१ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆
(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)
पुस्तक : त्या चं असं झालं
लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर
प्रकाशक : चतुरंग प्रकाशन
पृष्ठ : 264
किंमत : रु. 150
त्याचं असं झालं, .. मी एकदा दुपारी सांगली मधील क्लिनिकमध्ये बसलो होतो, मला मिरज येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ डी के गोसावी यांच्याकडून फक्त ‘एक व्ही आय पी रुग्ण’ येणार आहे, इतकेच माहिती होते, आणि त्या मागील दराने आत येतील. बरोबर साडे तीन वाजता मागील दारात एक गाडी थांबली, गाडीतून पांढरीशुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली, नम्र स्त्री उतरली, तिने तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितले, ‘नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे!’ अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती. एकूण आठ एक्सरे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या, इतक्या कि ‘सैंया’ चित्रपटातील ‘काली काली रात रे, बडा सताये, तेरी याद में..’ हे गाणे आठवून आम्ही दोघांनी मिळून एकसुरात गुणगुणलो! ती होती गान कोकिळा, स्वरशारदा लता मंगेशकर !
त्याचं असं झालं, .. दुपारी डॉ डी के गोसावी यांचा फोन आला, त्यांच्या मिरज येथील फार्म हाउस वर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावले होते. मी वेळेवर गेलो, टेबलावर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवलेले होते, एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरापान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली, हे कविवर्य बा भ बोरकर!
त्याचं असं झालं, .. ती व्यक्ती दोन वेळा माझ्या घरी राहिली होती, तोंडात पान सतत असल्यामुळे ओठाचा चंबू, चणीने लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा एक्स रे छातीचा मी बघितला आणि म्हणले, ‘एक फुफ्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरे देखील हवेचे फुगे झाल्यामुळे (एम्फिझिमा) लवकरच कामातून बाद होणार! तरिही ते गात होते, तासंतास! त्यांचे नाव पंडित कुमार गंधर्व !
त्याचं असं झालं, .. मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो, खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली, मागे वळून बघितले तर दोन मित्र होते, त्यांना मुंबईला जायचे होते. इथे रेल्वे बदलावी लागायची, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केले नव्हते, अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारले. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला, त्यांने दोन बर्थ मिळवून दिले, त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर!
त्याचं असं झालं, .. एकदा सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी एकस रे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो, कामे आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत होती, नुकताच आपल्या क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळविला होता. सहज म्हणून वर गेलो. केबिनबाहेरील सेक्रेटरीकडे ‘ओल्ड फ्रेंड’ म्हणले आणि स्वतःचे नाव न लिहिता चिठ्ठी दिली, आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली, दार उघडल्याक्षणी मला मिठी मारून विचारले, ‘काय श्री, काय म्हणतोस?’ ती व्यक्ती होती, भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर !
त्याचं असं झालं, .. सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या दोन खुर्च्या हाताने साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या, एका पोलिसाने आणलेल्या मळकट किटलीमधून दोन कप चहाचे भरले, ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते, चहा आणि बिस्कीट खात गप्पा मारत बसलेल्या त्या दोन व्यक्तिपैकी एक म्हणजे मी होतो, आणि दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग!
त्याचं असं झालं, .. एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला, लगेच विलिंग्डन क्लब वर ये, आम्ही तिघे आहोत, चौथा पार्टनर हवा आहे. मी गेलो. हातात रॅकेट, पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते प्रसिद्ध उद्योगपती श्री आदित्य बिर्ला!
त्याचं असं झालं, .. सांगलीमध्ये एकदा १९९४ साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो, माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले. समारंभ छान पार पडला, शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकाच वाक्य म्हणले, ‘नेव्हर इमाजिंन्ड यु आर अ मेडिकल डॉक्टर!’ ती व्यक्ती होती, श्री रतन टाटा!
त्याचं असं झालं, .. घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या, समोरची व्यक्ती सांगत होती, ‘आमच्या वाटेला हिरॉईन कधी येत नाही, येतात त्या मर्कटचेष्टा करणाऱ्या बारबाला, स्कॉच बाटलीमधील कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यावा लागतो आणि झिंगावे लागते खोटे खोटे ! आम्ही पडलो व्हिलन, आमच्या गोळीबारात कधी कुणी मारत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीने एकेक मुडदा पडतो.’ ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर!
त्याचं असं झालं, .. माझा मित्र डॉ आडिगा याचा फोन आला, आज रात्री साडेसात वाजता घरी जेवायला यायचे आहे. मी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलो. तिसर्या मजल्यावरील खोलीत तीन खुर्च्या होत्या, टेबलावर ‘जॉनी वॉकर’ होती, समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते, गोरेपान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणे. ते होते ओंकारप्रसाद उर्फ ओ पी नय्यर!
त्याचं असं झालं, .. घरी ‘काका’ आले होते, गप्पांना सुरुवात होणार, तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, ‘चला संध्येची वेळ झाली’, मी म्हणले, ‘काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेंव्हा व्हिस्की माझी!’ गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला सांगतात, ‘सुधाताई, आमचं अमृतप्राशन झाल ग, आता वाढ!’ मला वाटले, काका स्वतःच्या कवितेतील अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते, त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असते, ती दारू नसतीच, ते असते अमृत! आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’!
त्याचं असं झालं, .. बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती, पांढरीशुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडाबंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडके घेतले आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ, त्या वेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरु होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यातदेखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळे आमच्यापर्यंत येत होता. रविंद्र जैन यांचे संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे. विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळे मालिकेमध्ये रंगत आली आहे. तिकडे तो राग ऐकला कि गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचे विस्तारण करून, विडंबन करत गंमतजमत करून गात होती. तिकडे रामायण संपले, इकडे गाडी स्वच्छ धुवून झाली, मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती, ‘पंडित भीमसेन जोशी !’
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. संदीप गजानन श्रोत्री,
सातारा
मो 9822058583
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈