सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ आठवणीतले झाकीरजी… ☆ सुश्री शीला पतकी ☆
तबलानवाझ पद्मविभूषण झाकीर हुसेनजी यांच्या मृत्यूची बातमी वाचली… टीव्हीवर ऐकली …. खूप वाईट वाटलं. आणि मनातल्या त्यांच्या आठवणी उफाळून आल्या. त्यातल्या काही अनमोल आठवणी व्यक्त केल्याशिवाय आज खरंच रहावत नाहीये…
१९८३ साली सेवासदन संस्थेचा ६0 वा वर्धापनदिन होता… म्हणजे हिरक महोत्सव. या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातला सर्वाधिक संस्मरणीय ठरलेला कार्यक्रम होता शास्त्रीय संगीताचा. या कार्यक्रमात फार मोठे कलाकार सहभागी झाले होते. हे कलाकार एवढे दिग्गज होते की, मुळात एवढे मोठे कलाकार सोलापुरात आणि सेवासदनच्या कार्यक्रमात यायला कबूल कसे झाले असा प्रश्न सर्वांना पडला. पण तो प्रायोजित कार्यक्रम होता. इंडियन टोबॅको कंपनीने हा तीन दिवसांचा कार्यक्रम प्रायोजित केला होता. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला आय. टी. सी. संगीत संमेलन असे नाव होते. त्यात सहभागी झालेले कलाकार जागतिक कीर्तीचे होते.
प्रतिमा बेदी यांचे नृत्य, झाकीर हुसेन यांची तबल्याची साथ आणि स्वतंत्र तबला वादन, व्ही जी जोग यांचे व्हायोलीन वादन, डॉ. किचलू यांचे गायन अशी कलाकारांची मांदियाळी सांगितली तरी या कार्यक्रमाची उंची लक्षात येईल. कार्यक्रमाची तयारीही तशीच केलेली होती. मंडप टाकला होता. तिकिटे लावली होती. सर्वात पुढचे तिकिट १00 रुपयांचे होते. आता १00 रुपयांचे काही वाटणार नाही पण मी १९८३ चे दर सांगत आहे. तेव्हा १00 रुपये ही मोठी रक्कम होती. मात्र कलाकार सर्व दर्जेदार असल्यामुळे तरीही तिकिट विक्री अल्पावधीतच पूर्ण झाली होती.
कार्यक्रम जानेवारी महिन्यात होता. या काळात पाऊस पडेल असे ध्यानी मनी स्वप्नीसुद्धा वाटले नव्हते. पण व्ही. जी. जोग यांचे व्हायोलीन वादन आणि झाकीर हुसेन यांचा तबला यांची जुगलबंदी होणार होती त्या दिवशी अचानकच पावसाला सुरुवात झाली. काय करावे असा प्रश्न पडला. मग ताबडतोब निर्णय घेतला आणि कार्यक्रमाचे स्थळ बदलून रंगभवन असे केले. तिकिट विक्री थांबवावी लागली कारण रंगभवन सभागृहाची क्षमता मंडपाएवढी नव्हती. कसे का असेना पण तिथे ही जुगलबंदी सुरू झाली.
या विलक्षण रंगलेल्या जुगलबंदीची आठवण अजूनही मला आहे. ती संपली तेव्हा पं. विष्णुपंत जोग यांनी शेवटी टिंग असा आवाज केला तर झाकीर हुसेन यांनी हातातला हातोडा तबल्यावर आपटून ठप्प असा आवाज केला. जुगलबंदीचा शेवट टाळ्या घेऊन गेला. ही जुगलबंदी संपून पुढचा गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पण पंडितजी म्हणजे जोग यांनी आता विश्रांतीची गरज आहे असे म्हटल्यामुळे त्यांना त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन सोडावे लागले.
सारे कलाकार राजधानी हॉटेलवर उतरले होते. मी आणि तडवळकर सर गाडी घेऊन त्यांना सोडायला निघालो. सभागृहाच्या दारात आलो पण पंडितजींच्या चपलाच सापडेनात. खूप शोधाशोध केली पण चपलेचा पत्ता लागला नाही. शेवटी पंडितजी म्हणाले, “चलो हमे आज यहाँसे नंगे पाव जाना पडेगा.” असे म्हणून आम्ही बाहेर पडलो. सभागृहाच्या बाहेर नंगे पाँव पंडितजी आणि आम्ही गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच झाकीर हुसेन तिथे धावत धावत आले.
….. ते ओरडले, “ पंडितजी रुकिये, आपकी चप्पल मिल गयी है. “ आणि असे ओरडतच ते ती चप्पल आपल्या छातीशी धरून घेऊन आले. चप्पल खाली टाकली आणि त्यांच्या पायाशी बसून त्यांना ते चप्पल घालण्याची विनंती करायला लागले. पंडितजींच्या डोळ्यातून तर अश्रूंच्या धारा कोसळायला लागल्या. ते म्हणाले, “ आपने मेरी चप्पल सीनेसे लगायी है !” त्यावर झाकीर हुसेन म्हणाले, “ तो क्या हुआ ? मला तुमची चप्पल उराशी लावता आली हे माझे नशीब आहे. “
खरा कलाकार किती नम्र असतो याचे ते दर्शन घडून आम्हालाही गहिंवरून आले. आमच्या समोर एक अविस्मरणीय घटना घडत होती. तिचे साक्षी आम्हीच होतो. याचे वाईटही वाटले. कलाकाराच्या विनयशीलतेचा हा प्रसंग जगाला दिसायला हवा होता असे वाटले कारण झाकीर हुसेनच काय पण कोणा सामान्य माणसालाही अशी कोणा कलाकाराची चप्पल हृदयाशी धरण्यात कमीपणाच वाटला असता. ती सापडल्यावर कोणाकडून तरी ती पाठवून दिली असती.
हा प्रसंग घडताना स्वच्छ चांदणे पडले होते आणि साक्षात चंद्र या घटनेचा साक्षीदार होता. कोणीही व्यक्ती दिसते कशी आणि कपडे कशी घालते याचा तर प्रभाव पडतोच पण, तो चिरकाल टिकत नाही. मात्र कोणीही माणूस आपल्या वर्तनातून व्यक्त होतो तेव्हा त्याचा खरा आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडत असतो.
तो क्षण मी आजही विसरू शकत नाही.
कमालीचा कलावंत … भारतीयांचा अभिमान … विलक्षण नम्र माणूस … असा माणूस आपल्यातून गेला आहे. असा तबलापटू होणे नाही .. त्यांच्या वागण्यातील सुसंस्कृतपणा, बोलण्यातील मार्दव भारावून टाकणारे होते. सेवासदनमधील आम्ही भाग्यवंत माणसं … आमचा त्यांच्याशी जवळून परिचय झाला … बोलता आलं … पाहता आलं … ऐकता आलं…!
अशा ह्या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली !!!!!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈