श्री मुबारक उमराणी
कवितेचा उत्सव
☆ आले आले ढग… ☆ श्री मुबारक उमराणी ☆
☆
आले आले ढग ढग
रानी पेरीत काजळ
झाडे आनंदात दंग
धारा वाहे खळ खळ
*
अवखळ पोरे खेळी
रानोमाळ सूरपाट्या
संगतीला फुलबाळे
गंध देत वाट्या वाट्या
*
पावसाचे येता थेंब
धूळ होई थेंब धार
पान पान शहारता
झाड होई गार गार
*
माती गंधाळ गंधाळ
रात सुगंधात दंग
हर्ष उल्हासी होऊन
वारा वाजवी मृदंग
*
थेंब स्पर्श होताक्षणी
माती होई ओली ओली
रात माऊली होऊन
गीत अंगाई ती बोली
☆
© श्री मुबारक उमराणी
राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈