इंद्रधनुष्य
☆ मोक्षदा एकादशी असूनही.. ? — लेखक – ॲड. रमेश दिनानाथ जोशी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
आज मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी आहे. तरीही पंढरीमध्ये भक्तांची गर्दी का नाही? तर त्याचे कारण आहे की मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग हा गोपाळपूर जवळील विष्णू पदावरती विराजमान आहे.
त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया…..
२६ नोव्हेंबरला कार्तिक वद्य एकादशी म्हणजे आळंदी एकादशी झाली.
या एकादशीला आळंदी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी मध्ये लिन होण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे सर्व भागवत भक्त वारकरी मंडळी यांनी एकच आळंदीकडे धाव घेतली होती. लाडक्या भक्ताचा निश्चय समजल्याने प्रत्यक्ष पांडुरंगाने देखील आळंदी कडे धाव घेतली होती. त्यामुळे कार्तिक वद्य एकादशीला म्हणजे आळंदी एकादशीला लाखो वारकरी भक्त आळंदी मध्ये दर्शनासाठी उपस्थित आजही असतात. त्यानंतर एक दिवसाचे अंतराने कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा होत असतो. लाखो भागवत भक्तांच्या वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचां महापुर असतो. माऊली शिवाय दुसरा शब्द कानावर पडत नाही. आज जर आपल्या मनाची इतकी उलघाल होत असेल तर प्रत्यक्ष माऊलींनी समाधी घेताना त्या वेळची परिस्थिती कशी असेल ? काय असेल लहान बंधू सोपान याच्या मनाची अवस्था ? काय असेल त्या मुक्ताईची मनाची अवस्था ?
निवृत्तीनाथ मात्र स्थितप्रज्ञ आणि गुरूच्या भूमिकेत असल्याने धीर गंभीर शांत होते समाधी घेण्यासाठी माऊलींनी गुहेत प्रवेश केल्यावर निवृत्तीनाथ दादांनी हाताला धरून माऊलींना आसनावर बसविले, कोण होते त्यावेळी साक्षीला तर प्रत्यक्ष पांडुरंग च, अन्य कोणी नव्हते. बाहेर येऊन गुहेचा दरवाजा मोठ्या दगडी शिळेने बंद करताना मात्र मुक्ताईने मात्र हंबरडा फोडून एकच आर्त किंकाळी मारली होती. त्या वेळचाच अभंग म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा होय. लाडक्या भक्ताने म्हणजे माऊलींनी समाधी घेतल्याने प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील विरह सहन झाला नाही आणि त्यांनी पंढरी सोडली आणि भीमा नदीच्या तीरावर गोपाळपूर येथे विष्णू पदावर जाऊन मन शांत करण्याचा प्रयत्न म्हणून एक महिना वास्तव्य केले. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग पंढरपूर मध्ये नसून विष्णू पदावर वास्तव्यास असतो, म्हणून तिथे सर्व भक्त मंडळी दर्शनासाठी रांग लावतात.
गोपाळपूरलाच बाल गोपाळांचा मेळा जमवून गुरे राखताना तिथेच भक्तासह घरच्या जेवणाचा अंगत पंगत करून गोपाळकाला करून देवाने प्रसाद ग्रहण केला होता, त्याची आठवण म्हणून आजही विष्णू पदावर घरचे डबे घेऊन जाऊन सामुदायिक एकत्र बसून प्रसाद घेण्याची परंपरा भक्ताकडून पाळली जाते. विष्णुपदावर नदी काठाला घाटावर पायऱ्या उतरताना संत सखुला जिथे सुळावर देण्याचा प्रयत्न झाला आणि त्या सुळा चे पाणी झाले अशी आख्यायिका आहे, ती जागा तिथे आहे. तर जवळच गोपाळपूरला संत जनाबाईचा संसार आहे. जनाबाईंनी पांडुरंगाबरोबर दळण दळलेले दगडी जाते आणि हांड्यामध्ये विरजण घुसळलेले रवी वगैरे दाखवली जाते. विष्णू पदावर नदीपात्रामध्ये छोटेसे नारद मंदिर देखील आहे.
आळंदी म्हणजे इंद्रायणी काठी वसलेली अलंकापुरी होय.
ज्ञानेश्वर माऊली यांचा काळ १२ व्या शतकातला. तर संत एकनाथ महाराज यांचा काळ सतराव्या शतकातला. देवत्वाला पोहोचलेली आणि देवाशी संधान समक्ष बांधलेली अशी ही संत मंडळी. १२ व्या शतकात माऊलींनी समाधी घेतल्यानंतर गुहेच्या वरती असणाऱ्या अजान वृक्षाची मुळे गुहेमध्ये जाऊन माऊलींच्या शरीराला आणि गळ्याला गुंडाळल्यासारखी झाली होती, त्यामुळे माऊलींना त्रास होत होता, पण सांगणार कोणाला ? आणि समजणार कोणाला ? प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आणि वनस्पतीमध्ये सुद्धा जीव असतो असे आपला धर्म सांगतो. साहजिकच अजानवृक्षाच्या मुळांना देखील माऊलींच्या आकर्षणाने मोह आवरला नसणार आहे. माऊलींनी संत एकनाथ महाराजांच्या कानावर ही गोष्ट आंतरज्ञानाने घातली असावी. त्यामुळे संत एकनाथ महाराज यांनी माऊलीच्या समाधीच्या गुहेवरील शिळा बाजूला करून त्या अजानवृक्षांच्या सर्व मुळांना बाजूला केले होते अशी देखील आख्यायिका आहे. असे ऐकले आहे. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. देवावरती ज्यांची आढळ श्रद्धा आहे त्यांना निश्चित प्रचिती येत असते.
ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी माऊलीचे दर्शन घ्यावे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना आमचा अजिबात आग्रह नाही. त्यांनी तिकडे फिरकू देखील नये.
माऊलींना त्यांच्या २१ वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप लोकांनी त्रास दिला, यातना सोसाव्या लागल्या. तरी देखील त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. ज्ञानेश्वरी हा जगाच्या अंतापर्यंत मानव धर्माला मार्गदर्शन करेल असा ग्रंथ लिहून ठेवला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या खांबाला टेकून माउलींनी लिहिला आहे त्या दगडी खांबाचे देखील नेवासा येथे मंदिर बांधले आहे.
जप तप साधना करणे हे जसे परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे, तसेच सर्वसामान्य भक्तांच्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकाराम किंवा बोलीभाषेत ग्यानबा तुकाराम हा मंत्र म्हणजे देवापर्यंत जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणजे शॉर्टकट आहे असे समजण्यास हरकत नाही. देव हा भावाचा भुकेला आहे. नियत साफ ठेवा, भावना पवित्र ठेवा, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्याजवळ हजर आहे.
आळंदीला बऱ्याच वेळा जाऊन माऊलीचे समाधीचे दर्शन घेतले आहे, तसेच नेवासा येथील त्या पवित्र खांबाचे देखील दर्शन घेतले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पालख्या येत असतात. कोणालाही आमंत्रण नसते, सांगावे लागत नाही, तरी देखील आषाढी वारीसाठी माऊलीच्या पालखी बरोबर दरवर्षी लाखोच्या संख्येने वारकरी वाढतच आहेत.
जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणीजात !
असे फक्त पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच देवाकडे सर्व प्राणीमात्रासाठी प्रार्थना करून मागणी मागू शकतात. असा हा आपला भागवत धर्म जगामध्ये श्रेष्ठ आहे.
ज्ञानेश्वरी मधील प्रत्येक ओवीला शास्त्र आधार आहे.
‘ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर’
अशी संत मंडळी उगीच गोडवे गात नाहीत.
ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ घरी आणून पारायण जरी जमले नाही तरी निदान रोज एक तरी ओवी वाचून पुण्यसंचय करावा, आयुष्याचे सार्थक होईल.
जय हरी माऊली !
लेखक : ॲड. रमेश दिनानाथ जोशी
मंगळवेढा, मो. नं. ८२७५५०६०५०
प्रस्तुती – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈