श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “गंधर्वांचे देणे” – लेखक : श्री अजिंक्य कुलकर्णी – संपादन : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : गंधर्वांचे देणे
लेखक : अजिंक्य कुलकर्णी
संपादन – अतुल देऊळगावकर
मूल्य – ८००₹
पं. कुमार गंधर्व, सत्यजीत राय आणि लाॅरी बेकर यांचा तसा एकमेकांशी काही संबंध नाही. कारण या तिघांची क्षेत्रं वेगवेगळी. तरीही या तिघांत साम्य जर काही असेल तर ते म्हणजे या तिघांनाही निसर्गबदल समजला. पं. कुमार गंधर्वांनी तो आपल्या गाण्यातून, गायकीतून मांडला. पं. कुमार गंधर्व हे केवळ शास्त्रीय गायक नव्हते तर ते एक तत्वज्ञ होते. मी कोणीतरी आहे हे विसरण्यासाठी संगीत असतं अशी त्यांची धारणा होती. आपल्या चिंतन आणि मननामुळे परंपरेतून आलेल्या रागाला ते एक वेगळा आयाम द्यायचे. रागाचं अमूर्त स्वरूप दिसण्याइतकी सिद्धी त्यांना प्राप्त होती. संगीत, राग, विविध गायकी, सांगीतिक घराणे, सुर, ताल, लय, बंदिशी, तराणे, ख्याल, लोकसंगीत या आणि अशा अनेक विषयांवर पं. कुमार गंधर्वांची मुलाखत ग्रंथाली प्रकाशनाने १९८५ साली आयोजित केली होती. त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये होते मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शरच्चंद्र चिरमुले, श्रीराम पुजारी. तर प्रश्नावली तयार केली होती पं. सत्यशील देशपांडे यांनी. हा मुलाखतीचा अमोल ठेवा काही वर्षांपूर्वी सापडला आणि आता तो ग्रंथ रुपाने सर्वांसाठी खुला आहे. अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकाचे संपादन केलं आहे तर ग्रंथालीने याचं प्रकाशन.
कुमार गंधर्व हे कुणाकडूनही, कधीही, काहीही शिकायला तयार असत. जसं एका गारुड्याचं पुंगीवादन ऐकून त्यांनी ‘अहिमोहिनी’ या रागाची निर्मिती केली तर एका भिकाऱ्याकडून ऐकलेल्या भजनातून प्रेरणा घेत कुमारजींचा निर्गुणी भजनाच्या जगात प्रवेश झाला. आपली संस्कृती उदात्त होत जावी यासाठी त्यांनी आपल्या संस्कृतीच्या आधारस्तंभांचे कसून संशोधन केले. कुमारजींचं गाणं ही सतत चाललेली साधना किंवा कशाचातरी सतत चाललेला शोध वाटतो. आपल्याला आताच्यापेक्षाही जास्त चांगलं गाता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे असं त्यांना वाटत असे. या पुस्तकात शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यामधील फरकही कुमार फार चांगल्या प्रकारे समजावतात.
बंदिशींबद्दल कुमार म्हणतात की, “कोणतीही बंदिश त्या लयीमध्ये म्हटली तरच फार छान लागते. बंदिशीला खूप अक्षरं नको असतात. कारण तिच्यातून रागाला व्यक्त करायचं आहे. रागाकडे स्वतःला व्यक्त करण्याची खूप मोठी क्षमता असते. कोणालाही रागाचं नाव काय आहे, हे सहज कळावं यासाठी ती बंदिश असते. बंदिशीला बंधनयुक्त स्वैरपणा हवा असतो!”
शास्त्रीय संगीताबद्दल बहुतेक समाज हा उदासीन असतो कारण शास्त्रीय संगीतासाठी आमचा कानच तयार नसतो. संगीत ही जरी ऐकण्याची गोष्ट असली तरी आम्ही संगीत समजून घेण्यासाठी संगीतावरील पुस्तके वाचत नाही. उत्तम गाणारे गायक यांना ऐकणं व त्यांच्या गायकीची इतरांना ओळख करुन देणं यात कुठेतरी आपण कमी पडतो. बंदिश कशाला म्हणतात? ताल कशाला म्हणतात ? द्रुत आणि विलंबित म्हणजे काय? मुरकी, तान, ठेका, टप्पा, राग याची प्राथमिक माहिती तरी आपण गोळा करण्याचा प्रयत्न करतो का? संगीत हे व्यक्तींना, समाजाला जोडण्याचे काम करते. संगीत ही मानवी भाव-भावना व्यक्त करण्याची एक वैश्विक भाषा आहे. गरज आहे ती भाषा समजण्यासाठी कान तयार करण्याची.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈