सुश्री सुजाता पाटील
जीवनरंग
☆ दोन आणि दोन बावीस… – भाग २ – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुजाता पाटील ☆
डॉ हंसा दीप
(अचानक मला जाणीव झाली की हे घर कोणा दुसऱ्याचं आहे, अशा अवस्थेत पाहून मला कोणीतरी ठार वेडी समजतील. माझ्या वजनदार कपड्यांना पाहून कोणीतरी मला चोर किंवा डाकू समजलं तर नवल नाही. मी जरा भानावर आले.) – इथून पुढे —-
जरा बुद्धीने काम केले पाहिजे. नेमकं काय करू, कागदावर फोन नंबर लिहून इथे तो ठेवून जाते. पण माझ्याजवळ ना कागद होता ना पेन. अशा बेचैनीच्या अवस्थेत पाय लटपटत होते. काही हरकत नाही, घरी परत जाऊन कागद आणि पेन घेऊन यायचा होता. कित्येक वेळा बर्फात पडता- पडता, वाचता – वाचता कशीबशी मी घरी परत आले. कागद पेन आणला त्यावर मेसेज लिहिला, कुरिअर कंपनीची चूक सांगितली आणि माझा फोन नंबर दिला. त्यांच्या दरवाजाच्या कडीवर तो कागद फोल्ड करून ठेवून दिला आणि आपल्या घरी परत आले.
घरी आल्यानंतर दर दहा मिनिटांनी फोन चेक करत राहिले, दरवाजा टक जरी वाजला तरी कान टवकारून ऐकत राहिले. संपूर्ण दिवस हयाच गोंधळात गेला. माझ्या त्या चिट्ठीचं उत्तर संध्याकाळपर्यंत देखील मिळालं नाही. ना माझा फोन वाजला ना कोणी दरवाजा वाजवला. डोळे आणि कान पुरते व्याकुळ झाले होते. माहित नाही काय झालं होतं. साधारणतः पाच वाजेपर्यंत प्रत्येकजण कामावरून घरी येतो. त्या घरातील लोकं पण आली असतील. कदाचित जेवण जेवत असतील, जेवण जेवू देत त्यानंतर जाते.
वेळेच मोजमाप करता त्यांच्या जेवणाचा व मेल चेक करण्यापर्यंतचा वेळ जोडल्यानंतर २ एवेन्यू रोडवरची माझी तिसरी चक्कर मारण्यासाठी मी साडेसात वाजता घरातून निघाले. ह्या वेळेस खूप आशेने बेल वाजवली परंतु आता पण काही उत्तर आलं नाही! निराश होऊन परत निघणारच होते तेवढ्यात वरच्या खिडकीत लाईट दिसून आली. ह्याचा अर्थ घरात कोणीतरी आहे. आशेच्या ह्या किरणांनी माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक पसरली.. आता मला माझी पुस्तके मिळूनच जाणार.
पुन्हा बेल वाजवली. काहीच उत्तर नाही. इकडून तिकडून फिरून यायचे.. बेल वाजवायचे आणि जोरात दरवाजा ठोठवायचे. साहजिकच आता माझा धीर सुटत चालला होता. सभ्यपणाचा बुरखा फेकून माझ्या ज्या हरकती चालल्या होत्या त्या आजूबाजूचे दोन शेजारी खिडकीतून पहात होते.
मोठालं जॅकेट आणि कानटोपीमधून कोणीच ओळखू शकत नव्हते की ह्या पेहरावात स्त्री आहे की पुरुष, एक चोर आहे की एक कादंबरीकार (लेखक)! आता मी उड्या मारून मारून वरती घरात कोणी माणूस किंवा माणसाची सावली तरी दिसते का ते पहाण्याचा प्रयत्न करत होते. तीन मिनिटे पण झाली नसतील… पी.. पी… पी.. असा सायरन वाजत पोलिसांची गाडी येऊन थांबली. तेच झालं ज्याची शंका होती. त्या घरातील लोकांनी मला चोर-डाकू समजून पोलिसांना फोन केला होता. ह्या आकस्मिक घडणाऱ्या बदलामुळे मी अजिबात घाबरले नाही, उलट ह्या गोष्टीचा आनंद झाला की आता तरी हे लोक दरवाजा उघडतील आणि मला माझे पॅकेज देतील. हा माझा हक्क होता. त्या पॅकेजमध्ये जी पुस्तके आहेत , त्यांची मी मालकीण आहे, तोच आत्मविश्वास माझ्या चेहऱ्यावर झळकत होता.
पोलिस आॅफीसर माझ्या जवळ आला….” “काय प्रॉब्लेम आहे मॅडम, मी असं ऐकलं आहे की, तुम्ही इथे वारंवार आला आहात. मला सांगाल कशासाठी?”
मी एकदम आरामात…”हॅलो सर ” म्हणून त्यांना घटित घटना सांगू लागले….” सर, मी ह्याच गल्लीत २२ नंबरच्या घरात राहते. माझं एक पॅकेज चुकून यांच्या घरी डिलीवर केलं गेलं आहे. मला फक्त माझं पॅकेज घ्यायच आहे. हे लोक घरात आहेत तरीही दरवाजा उघडत नाहीत. जर यांच्या घरी माझं पॅकेज आलं नसेल तर तसं त्यांनी मला सांगावं. मी लगेच निघून जाईन. “
मी एका दमात माझी दयनीय अवस्था पोलिसांना सांगितली. पोलिस हसायला लागला. त्याचं हास्य खूप बालिश होतं.. जसं की बाॅम्ब फुटण्याची बातमी मिळावी आणि माहित पडावं की छोट्या मोठ्या फटाकड्या पेटवून लोक आपला सण साजरा करत आहेत.
त्याचवेळी आतून एक सभ्य गृहस्थ आले. मी त्याला अशी टवकारून बघू लागले जणू कोणत्या तरी भित्र्या माणसाला चांगलाच धडा शिकवण्याचा प्रयत्न मी केला आहे. एवढा धडधाकट माणूस आतमध्ये होता आणि माझ्याशी बोलायची हिम्मत नाही केली ! घाबरट कुठचा ! विनाकारण पोलिसांना बोलावलं. ह्याच्यापेक्षा तर मी चांगली आहे जी धाडसाने इथे उभी आहे. अचानक माझ्या पायामध्ये स्थिरतेचा आभास होत होता आणि अनायास चेहऱ्यावरचा रुबाब वाढला होता.
पोलिसांनी त्याला विचारलं…” मॅडमचं एखादे पॅकेज तुमच्या घरी आले आहे का जरा बघाल.? “
तो लगेचच आत गेला आणि पाच -सात मिनिटांनी एक पॅकेज घेऊन आला आणि पोलिसांना दिलं. पोलिसाने पॅकेजला मागून -पुढून, खाली – वर पाहून मला विचारलं…” काय ह्या तुम्ही आहात” त्यावर माझ नाव लिहिलं होतं. मी म्हटलं….” हो सर, ही माझी पुस्तके आहेत. हे बघा माझं ड्राईव्हिंग लायन्सेस.”
पोलिसाने ड्राईव्हिंग लायन्सेस आणि पॅकेजवरील नाव चेक केलं आणि माझ्या हाती सोपवलं.
“खुप खुप धन्यवाद सर” असं म्हणत मी त्या पॅकेजला छातीशी कवटाळलं व पोलिसांचे असे काही आभार मानले जसंकाही कुठल्या तरी आईचं हरवलेलं मूल मिळवण्यासाठी त्यांनी मदत करावी. हे असे अचानक पोलिसांच्या येण्याने आजूबाजूच्या घरातील खिडक्यामध्ये हालचाली दिसू लागल्या होत्या.
पोलिस आपली गाडी स्टार्ट करून निघून गेले. मी पण माझी पावलं तेजगतीने चालवत तिथून निघाले. घरात येऊन मी पुस्तके उघडली, त्यांना आलटून पालटून पाहिलं आणि कपाटात रीतसर ठेवून दिली. एक संपूर्ण दिवस एका वेगळ्याच त्रासात निघून गेला होता. तणाव, बेचैनी – घालमेल आणि अविश्वासात.
ह्या घटनेला पूर्ण एक वर्ष झालं. कपाटात ठेवलेल्या त्या दोन्ही पुस्तकांना उघडून पाहण्याची पण वेळ आली नाही. पण ज्या दिवशी ह्या पुस्तकांना प्राप्त करण्यासाठी एवढी प्रयत्नांची शिकस्त केली होती की त्याची आठवण आजही तेवढीच डोळ्यासमोर जिवंत होती. आज पुन्हा त्या दोन्ही पुस्तकांवर सहजच नजर पडली तेव्हा चेहऱ्यावर आपोआप हास्य झळकलं….तेच परिचित हास्य जे त्या दिवशी पोलिसाच्या व माझ्या चेहऱ्यावर आणि आठवणीत कैद होतं.
दोन आणि दोन बावीसच्या मध्ये माझ्या घरापासून ते त्या घरापर्यंत चक्कर मारणं म्हणजे कोणा मोठ्या यात्रेपेक्षा कमी नव्हतं. बावीसच दोन मध्ये रूपांतरित होणं किती सोप्पं होतं.. परंतु दोनाचे बावीस होणं किती कठीण ! साधं – सोप्प गणित, आयुष्यभराचं ज्ञान किंवा एक नवीन कोडं.
पुस्तकांना स्पर्श करताना निरंतर मोजमाप करत ; भाषा आणि अंकामध्ये समाविष्ट असलेल्या जीवनातील एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर, जे मृगजळाप्रमाणे आयुष्यभर पळवत राहतं आणि प्रथमा पासून अंतापर्यंताच्या मध्यावर झुलवत ठेवतं.
– समाप्त –
मूळ हिंदी कथा : दो और दो बाईस
मूळ हिंदी लेखिका : डॉ हंसा दीप, कॅनडा
मराठी अनुवाद : सुश्री सुजाता पाटील
अणुशक्ती नगर मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈