श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 266
☆ वैभवशाली नक्षी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
मोर पिसावर कुठून सुंदर आली नक्षी
मोर नाचतो दिसते नखरेवाली नक्षी
*
डोंगर माथी विशाल मंदिर कसे बांधले
छान वारसा येथे वैभवशाली नक्षी
*
ती ओठांना लावुन आली होती लाली
तिने काढली होती माझ्या गाली नक्षी
*
असेल अबला म्हणून त्याने छेड काढली
तिने काढली त्याच्या कानाखाली नक्षी
*
हातावरती हिरवी मेंदी तिने काढली
रातभरातच लाल कशीही झाली नक्षी
*
वेणी गजरा तिला आवडे सुगंध त्याचा
फुला फुलांची डोक्यावरती ल्याली नक्षी
*
अडव्या-तिडव्या फांद्यांचे तो रूप बदलतो
त्या झाडावर करतो तो वनमाली नक्षी
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈