सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 254
☆ त्या वाटेवर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
गतकाळाचा जन्म जिव्हाळा
आठवणींचा फक्त पाचोळा
त्या वाटेवर ……
हुंदडणारे मुग्ध बालपण
नात्यांची गहिरी गुंफण
त्या वाटेवर …….
खळखळणारा अवखळ ओढा
सोनपिवळ्या तरवडाची गर्दी
पाण्या मधली दाट लव्हाळी
इथेच होती एकेकाळी …….
पाहते आता ठक्क कोरडी
फुफाटलेली ओढ्याची जागा
त्या वाटेवर ……
बुजलेल्या ढव-याची खूण,
पाषाणाची जुनी शुष्क डोण
त्या वाटेवर …….
दगडी वाड्याच्या जागी आता
बोरी ,बाभळी आणि सराटा ,
परी वास्तुचे रक्षण करतो ,
भुजंग काळाचा निरंतर …..
त्या वाटेवर ………..
☆
© प्रभा सोनवणे
१४ नोव्हेंबर २०२४
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈