सौ. सुनीता जोशी 

🌸 मी प्रवासी 🌸

हिमालयः शरणं गच्छति !! लेखक : श्री अवधूत जोशी ☆ प्रस्तुती : सौ. सुनीता अवधूत जोशी 

साधारण दुपारचे चार वाजले होते. मुंबई एअरपोर्टवर ब-यापैकी गर्दी होती. काही कारणास्तव फ्लाईट थोडी लेट झाली. चंदिगढला पोहोचलो तेंव्हा संध्याकाळचे साडेसात झाले होते. नोव्हेंबरचा गारठा हुडहुडी भरत होता. सिमला-मनाली टुर पॅकेजचा टॅक्सी ड्रायव्हर मात्र अशा थंडीतही वेळेवर विमानतळावर गाडी घेऊन हजर होता. फ्लाईट लेट असलेल्याचा थोडासा ताण त्याला तिथे पाहून काहीसा कमी झाला. नव्याने एकमेकांची ओळख करून घेत, गप्पा मारत आम्ही सुमारे तीन तासात १२० किमी अंतर पार करून सिमल्याला पोहोचलो. रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या द-याखो-यांचा अंदाज येत नव्हता. वळणावळणाचे गल्ली बोळ पार करत आम्ही खाली उतरत होतो. दुचाकी जाणेही अवघड इतक्या अरुंद म्हणजे पुण्याच्या मंडईत जायचा भाऊ महाराज बोळदेखील प्रशस्त म्हणावा लागेल अशा उतरत्या वाटेवरून ड्रायव्हर शिताफीने आम्हाला घेऊन एका तीन मजली हॉटेलजवळ पोहोचला. ‘हॉटेल विवा इन’ ही खरं तर प्रत्येक मजल्यावर ३ ते ४ रुम्स असणारी तीन मजली बिल्डिंग होती. रात्री साडेअकरा वाजताही त्यांनी आम्हाला गरम जेवण व गरम पाणी दिले, की ज्याची त्यावेळी सर्वात जास्त आवश्यकता होती. जेवण करून आम्ही थंडीने गारठलेल्या त्या रुममधील बेडवरील रजईला आपल्या अंगावर न ओढता, आपणहून त्याच्या आत गेलो आणि क्षणात झोपीही गेलो.

सकाळी गरमागरम पराठा आणि दही व मोठा कपभरून वाफाळता चहा! हॉटेलच्या एका भिंतीला पूर्ण काच होती. त्यातून दूरवर पसरलेली सिमला व्हॅली दिसत होती. सगळीकडे दरी, झाडे, त्यातच काठा-काठावर उभी असलेली घरे, हॉटेल्स. खूपच विलोभनीय दृश्य होते ते.

आम्ही नऊ वाजता खाली आलो. टॅक्सी तयार होती. कोवळे ऊन पडले असले तरी हवेत बोचरा गारठा भरून राहिला होता. मुंबईत जसे बाहेर पाऊस कोसळत असला तरी आतमध्ये घामाच्या धारा येतच राहतात तसे स्वेटर, टोपी घालूनही थंडी वाजतच होती. कुफ्रीला जाऊन फनफेअरच्या गेम खेळणं हा पहिला कार्यक्रम. हे गेम्स म्हणजे धाडसाचे काम. शरिर आणि मन मजबूत व थोडसं वेडंपणही हवं. बी. पी. च्या गोळ्या असल्याने मी आपलं बायको आणि मुलगा यांना पुढे करून ‘तुम लढो !’ चा सल्ला देऊन ढिगभर केस अंगावर घेऊन शांतपणे उभ्या असलेल्या भल्या मोठ्या ‘याक’वर बसून फोटो काढण्यात धन्यता मानली.

त्यानंतर बरेचसे गेम्स खेळून व काही नुसते खेळलेले बघूनच आम्ही तेथून बाहेर पडलो. सफरचंद हे मुख्य आकर्षण असलेल्या बागा तिथे होत्या पण सफरचंदा शिवाय. ती उघडी बोडकी झाडे उगाचच सफरचंदांनी लगडलेल्या झाडांशी तुलना करत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आणले. एकसारख्या आकारात कापून ठेवलेल्या गोड, रसाळ सफरचंदावर मीठ, तिखट, चाट मसाला घालून दिलेली प्लेट आम्ही एका फटक्यात आस्वाद घेत रिकामी केली.

अलिकडेच लोकांसाठी खुला केलेला ‘राष्ट्रपती निवास’ ही ब्रिटीशांनी बांधलेली वास्तू खरंच बघण्याजोगी आहे. पूर्ण सिक्युरिटी असलेल्या त्या ठिकाणी चेकींग करून प्रत्येकाला आत सोडले जात होते. संपूर्ण दुमजली बांधकाम काळ्या शिसवी लाकडात केलेले. ब्रिटिशांकडून आपण हे न शिकता सिमेंट, कॉंक्रिटचा हव्यास का धरतो कुणास ठाऊक? एक महिन्यासाठी आपले राष्ट्रपती या ठिकाणी निवासास येतात. अतिशय जुना ठेवा असूनही आजही चांगल्या पध्दतीने जतन करून ठेवला आहे.

सकाळचा नाश्ता हा जेवणासारखाच भरपेट झाला असल्याने दुपारी थोडा व्हेज फ्राईड राईस आणि चॉमिन नूडल्स यावर क्षुधा शांती केली आणि आम्ही जख्खूचे मारूती मंदिर पाहण्यास सज्ज झालो. ऊंच टेकडीवर रोप-वे ने जाण्यात गंमत होतीच पण वर गेल्यावर हनुमानाची प्रचंड उंच, गगनचुंबी मुर्ती पाहताना समर्थांनी वर्णिल्याप्रमाणे पुराणात हनुमान हा ‘अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा’ होत असला पाहिजे याची खात्री पटली. रोप-वे चा अनुभव खूपच सुखद होता. काचेच्या पेटीत आपण खोल दरीतून चाललो आहोत, मनात एक भीती पण आणि एका नविन अनुभवाची उत्स्कुकताही असा वेगळाच अनुभव आला.

तिन्हीसांज कधी झाली कळलेच नाही. आम्ही जख्खू येथून खाली उतरलो होतो. चर्चजवळील चौक अर्थात् उंचावरचा सनसेट पॉईंट पर्यटकांनी गजबजून गेला होता. हिंदी चित्रपटांतील ब-याचशा चित्रपटांचा हा शूटींग पॉईंट होता. गाजलेल्या थ्री ईडियट्स पिक्चर मधील दृश्ये ज्या ठिकाणी चित्रीत झाली होती त्या ठिकाणी आम्ही तीन वेड्यांनीही आपले फोटो काढले. मोठ्या थर्मासमधून चहा विकणारे, व्यावसायिक फोटोग्राफर हे सगळीकडे फिरत होतेच पण चक्क व्यवसाय कशाचाही करू शकतो हे पटवून देण्यासाठी बाबागाडी घेऊन फिरणारे गरजू व्यावसायिकही या ठिकाणी दिसत होते. पर्यटन हाच इथला मुख्य वय्वसाय असल्याने त्या अनुषंगाने येणारे नवनवीन उद्योग जन्मास येत होते.

बाकी मॉल रोडवर फिरणे म्हणजे पुण्याच्या लक्ष्मीरोडवर फिरण्यासारखेच होते. पण महत्त्वाचा फरक इतकाच होता कि एकीकडे प्रचंड ट्रॅफिक, तर दुसरीकडे वाहनांसाठी No Entry!! बाकी माणसांची गर्दी आणि खरेदीतली घासाघीस हा भारतीयांचा हक्क दोन्हीकडे अबाधितच दिसत होता.

खूप सुंदर असे शिमला हे शहर पाहून दुस-या दिवशी सकाळी मनालीकडे प्रयाण केले. वाटेत आपल्या बरोबरीने दरी खो-यातून मनाली येईपर्यंत सोबतीने खूप सारे लहान मोठे दगड-गोटे आणि मध्यातून वाहणारे गार असे पाणी घेऊन बियास म्हणजे व्यास नदी वहात होती. दुपारी जेवण्यासाठी थांबलेल्या एका हॉटेलच्या बाजूने वाहणा-या त्या नदीत माझ्या बायकोने जाऊन आपले पाय त्या थंडगार पाण्यात बुडवून येण्याचे धाडसी काम हळूच उरकून घेतले होते. तिला त्या नदीचे वेड लागले होते.

नंतर वाटेत कुल्लू हे शहर लागले. त्या ठिकाणी शाल, स्वेटर्स यांच्या फॅक्टरींचे आऊटलेटस् होते. आणि ओळीने गजबजलेली ड्रायफ्रुटसची दुकानेही होती. रस्त्यांवर सगळीकडे हातात छोट्या डबीतून कमी किमतीत शिलाजीत आणि केशर विकणारे विक्रेते जागोजागी होते. पण आम्ही तो मोह टाळला. नंतर स्थानिक लोकांकडून समजले की ते डुप्लिकेट माल विकतात. थोडक्यात ‘कुल्लूला’ येऊन आपण ‘उल्लू’ न बनल्याचे समाधान वाटले. मनालीला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली व हवेत गारठा -२ डिग्री तापमान दाखवत होता.

दोन दिवस होऊनही अजून बर्फ पहायला न मिळाल्याची खंत लागून राहिली होती. थंडीत जास्त बर्फ असेल हा माझा तर्क चुकीचा ठरला होता. एक विशिष्ट पहाडी, पंजाबी स्टाईलने ‘हॉंजी, हॉंजी’ असे दोनदा उच्चारण्याची सवय असलेला आमचा तरूण ड्रायव्हर आमच्या मदतीला धावून आला. ‘‘सर आप ऊपर रोहतांगपास चलिये। आपको बर्फ देखने को मिलेगा।” आमच्या पॅकेजमध्ये ते ठिकाण नसल्याने आम्ही एक्स्ट्रा चार्जेस देऊन सकाळीच रोहतांगकडे निघालो. दोन तासाचा उंचावरचा तो प्रवास अवर्णनीय होता. वळणा वळणाच्या रस्त्याने वर वर जात आम्ही १३००० फूट उंचीवर पोहोचलो होतो आणि समोर सगळीकडे पांढरे शुभ्र बर्फ आमच्या स्वागताला हजर होते. आनंदात उघड्या हातांनी बर्फाचा चुरा उचलल्यावर आलेल्या थंड झिणझिण्या गौण ठरल्या. बर्फात मनसोक्त खेळून आम्ही जगातील सर्वात लांब सुमारे ९ कि. मी. लांबीच्या ‘अटल टनेल’ या बोगद्यातून मनालीकडे परत आलो. सोलांग व्हॅली बघितली. हिडिंबा टेंपल पाहिले. मात्र तिथे बोर्डवर लिहिलेले घटोत्कच मंदिर लवकर सापडले नाही. कदाचित् मायावी घटोत्कचचे मंदिर देखील मायावी असावे. रामायण, महाभारताचे नव्हे तर प्राचीन आध्यात्माचे अनेक संदर्भ या परिसरात सापडतात. इतक्या उंचावर वसिष्ठ मंदिरात कमालीच्या थंड प्रदेशात चक्क गरम पाण्याचे कुंड पहायला मिळतात आणि निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो.

मनालीचा मॉल रोड बघितला. सिमला आणि मनालीच्या मॉल रोडमध्ये फारसा फरक नाही. पुण्याच्या लक्ष्मी रोड आणि सारसबाग रोड इतकाच बहुधा असावा. वाफाळणारे मोमोज, मोहजाळात ओढणारे नूडल्स, पिवळे धमक ब्रेड पॅटीस, चपटी आलू टिक्की, गरमागरम जिलेबी, सिडू, मसाला दूध यांची रेलचेल होती.

ट्रीपचा शेवटचा दिवस उजाडला व आम्ही चंदिगढला पोहोचलो. वाटेत एका ठिकाणी अस्सल पंजाबी जेवणाची माझी इच्छा एका पंजाबी माणसाच्या दिलदार स्वभावाप्रमाणे आलिशान असणा-या अशा ढाब्यावर पूर्ण झाली. मक्के की रोटी, पनीर टिक्का, पापड, पुलाव आणि मोठा पाणी प्यायचा जगभरून दिलेली लस्सी. वाह!!

फ्लाईटला वेळ असल्याने आम्ही तोपर्यंत चंदिगढ शहर देखील थोडेसे पाहून घेतले. नेहरूंनी नियोजनबद्द वसवलेला हा केंद्रशासित प्रदेश! उत्तम रचना असलेले भव्य आणि प्रशस्त शहर म्हणून भारतात प्रथम क्रमांकावर चंदिगढ आहे. रॉक गार्डन, रोझ गार्डन, सुखना लेक सारेच भव्य आहे. लोकसंख्या जास्त असूनही मुंबई-पुण्याप्रमाणे वाहनाला वाहने घासून जात नाहीत. सारे कसे मोकळे आणि प्रशस्त व शिस्तबध्द.

थोडक्यात काय, वातावरणाप्रमाणे आपला खिसा देखील थंड पडत असला तरी हिमालयाची शान असणारी सिमला कुलू मनालीची ही ट्रीप आयुष्यात आपल्याला एक वेगळेच समाधान देऊन जाते हे नक्की आणि मग सहजच नतमस्तक होवून मनात आले की ‘‘हिमालयः शरणं गच्छति!!”

लेखक : श्री अवधूत जोशी

मोबाईल : ९८२२४५६८६३

प्रस्तुती : सौ. सुनीता अवधूत जोशी. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments