सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१३ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
बोळातला लपंडाव–
‘बाळ’ प्रकरण झालं आता आल ‘बोळ’ प्रकरण ‘ डोंगरे बालामृत ‘ घेऊन त्या काळातली पुण्यातली बाळं बाssळसेदार झाली होती. त्या बाळांची कहाणी झाली, आता आले पुणेरी बोळ, ते बोळ बाळसेदार नव्हते. तर अगदीच रोडावलेले, अरुंद होते. हे बोळांच ‘जाळ’ सर्व दूर पसरलेल होत. बुधवार चौकात माझी प्रिय मैत्रीण उषा भिडे राहयची. तिच्या घरावरून त्या चौकातून निवडुंग्या विठोबा वरून, सरळ जाऊन डावीकडे फडके हौदाकडे, रस्ता जातो ना, तिथे आतल्या बोळात भारत हायस्कूलला लागून एकांत एक असे पांच बोळ होते. ते बोळ थेट एकनाथ मंगल कार्यालयापाशी पोहोचायचे. रविवार पेठेत माझी बाल मैत्रीण कुंदा राहत होती, तिथून निघाल्यावर, खरं म्हणजे जोगेश्वरी कडे जायला एकनाथ कार्यालयावरून, तपकीर गल्लीतून वसंत टॉकीज पाशी पोहोचलेला, अहो! अगदी नाका समोरून जाणारा, चांगला सरळ रस्ता सोडून आम्ही एकदा वाकडी वाट करायची ठरवून, शिरलो कीं हो पहिल्या बोळात. एकच माणूस मावेल इतका तो बोळ अरुंद होता. कम्मालीची सामसूम होती तिथे. ब्रम्हांडच आठवल होत आम्हाला. बरं! कुणी पाहयल म्हणण्यापेक्षा कुणी धरलं तर– या विचारांनी, गर्भगळीत होऊन थरथरणारी आमची पावलं जागच्या जागीच थबकली, कसंबसं अवसान आणून पळायची ॲक्शन घेऊन उसन चंद्रबळ आणल तर, ढोपरचं ( त्या काळचा पेटंट शब्द) खरचटली. धड मागे जाता येईना की पुढे सरकता येईना. मोठ्यांदी ओरडाव तर ऐकायला भिंतीशिवाय तिथ होतच कोण! ‘ राम राम ‘ म्हणत “तु चाल पुढं मी आहे मागं” असं बडबडत पाचावर धारण बसलेल्या आम्ही, त्या पंचबोळातून पंचप्राण मुठीत घेऊन एकदाचे, ‘भारत माता की जय ‘ म्हणत भारत हायस्कूल पाशी पोहोचलो. कसंबस घरी आलो. प्रकरण सांगावं तर चोरीचा मामला, तंगडं मोडून हातात दील असत घरच्यांनी आमच्या. तरीपण खरचटलेली, ढोपरं बोलायचे ते बोललीच. पण बरं का! मंडळी सगळेच बोळ काही, असे घाबरवणारे नव्हते. पण त्यांची नाव मात्र मजेशीर होती हं! हल्लीच्या शगुन चौकातून (म्हणजे पूर्वीचा उंबऱ्या गणपती चौक) पुढे गेल की यायचा, मुंजाबाचा बोळ, त्याच्या समोरचा म्हणजे, तिथे भट कुटुंब राहयचे म्हणून तो भटांचा बोळ, शनिवारात सरदार नातूंच्या वाड्यांचा हा पसारा म्हणून तो नातूंचा, तर ओंकारेश्वर रस्त्यावर लागायचा तो तांबे बोळ, तुळशीबागेच्या दरवाजा समोरचा तो म्हणजे भाऊ महाराज बोळ, आमच्या जोगेश्वरी जवळचा पॅरेमाउंट टॉकीजच्या पुढचा म्हणजे तसल्या वस्तीतला बोळ. “तिथे गेलात तर तंगड मोडून हातात देईन” असा घरच्यांकडून सणसणीत दम भरलेला होता, शालूकरांचा वेश्या वस्तीतला बोळ. हं! तो मात्र ‘असं का बरं’? हा मनांत येणारा प्रश्न विचारण्याची प्राज्ञा नसलेला रहस्यमयीबोळ म्हणून लक्षात राहयला होता. जssरासं मोठ झाल्यावर कुणीतरी दिवे पाजळले, अगं शालूची दुकानं तिथे खूप होती म्हणे, शालू खरेदीला म्हणून त्या ‘तसल्या बायका’ तिथे आल्या असतील आणि शालू बघून तिथेच राहयल्या असतील. ” बायका शालू साठी वेड्या होतात हे ऐकलं होतं म्हणून, आम्ही पण नंदीबैला सारखी “हो रे असंच असेल रे” असं म्हणून मान डोलावली होती. एकंदरीत त्या बायका तिथे कशा?आणि कधी? आल्या असतील? हे तो शालूकर बोळच सांगू शकेल हो ना? जबडे वाड्यांचा जबडे बोळ पण होता. कंटाळलात नां बोळ प्रकरण वाचून! पण खरं सांगू या बोळीतून सुळकांडी मारायला आम्हाला फार आवडायच. आत्ता इथं तर लगेच तिथं, असा शॉर्टकट मारायला मज्जा यायची. “चल ग लवकर पोहोचू आपण” असं म्हणून सगळे पुण्याचे गल्ली बोळ आम्ही पालथे घातले होते. आता मात्र सिमेंटच्या जंगलांनी जबडा पसरून ह्या छोट्या बोळांना गिळंकृत केलय. सुसाट वाहणाऱ्या वाहनांची, माणसांची गर्दी, प्रदूषण मुक्त नव्हे प्रदूषण युक्त लहान मोठ्या रोड वरून जाताना तो रोड आता अंगावर आल्या सारखा वाटतोय, आणि जीव गुदमरतोय. पटकन एखाद्या बोळात आता शिरावस वाटत. पण पुढे रस्ता बंद ही पाटी वाचून आमचा ‘स्टॅच्यू’ होतो. पावसात दुकानांच्या गर्दीमुळे आडोसाच काय उन्हाचा कवडसा पण अंगावर घेता येत नाही. ते अंगण गेलं, ओसरी गेली, वाडे गेले, तो शांततेचा काळ गेला. रस्ता वाहतोच आहे वाहतोच आहे. पुला खालून बरंचस पाणी गेल आहे. जुनं कसबे पुणं आता नवं झाल, कुठेतरी जुन्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. त्या बघितल्या की मन मागे मागे भूतकाळात शिरत, आणि त्या आठवणीत रमत. आणि मग पुण्यनगरीला म्हणावसं वाटतं ‘कालाय तस्मै नमः’
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈