श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
☆ 🤣😲वा द !😢😂 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“सुईच्या अग्रावर राहील इतकीसुद्धा जमीन मिळणार नाही तुम्हांला !”
बघा, म्हणजे जमिनीच्या मालकीवरून आजच्या कलियुगीच वाद होतात असं नाही, तर महाभारत काळापासून हा रोग तमाम मानवजातीला जडला आहे असं म्हटलं तर यात वाद व्हायचं कारणच नाही. पण सुईच्या अग्रापेक्षासुद्धा या पृथ्वीतलावर आणखी कमी क्षेत्रफळाची जागा असते, हे तेव्हाच्या लोकांना माहित नव्हतं. त्यामुळे तेंव्हाच विज्ञान आजच्या इतकं खाचितच प्रगत नव्हतं हेच यातून सिद्ध होतं. मंडळी थांबा थांबा, हे काही माझं मत नाही बरं, नाहीतर तुम्ही माझ्याशी या विषयावर उगाचच वाद घालायला लागाल, काय सांगावं ! तर ते एखाद्या जन्माने मुळच्या “पेठेत” राहणाऱ्या पण सध्या सिलिकॉन व्हॅलीमधे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेल्या भारतीयाच मत असू शकतं, हे मात्र माझं मत.
महाभारतकाळी इतक्या कौरवांचे आणि पांडवांचे जन्म झाले त्यावरून चांगल्या “सुईणी” तेंव्हा होत्या का नव्हत्या हा वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही मंडळी, पण महाभारतकाळात “सुई” अस्तित्वात होती का नव्हती, असा वादाचा मुद्दा कोणी उपस्थित केला तर ? त्यामुळे तिच्या अग्रावर राहील इतकी जमीन हे परिमाण, महाभारताचे नाटकीकरण करतांना त्या पात्राच्या तोंडी घालण्याची त्याच्या लेखकांने त्याकाळी घेतलेली ती रायटर्स लिबर्टी म्हणायची का ? आणि ती तशी घेतली असेल तर त्याला तो अधिकार कोणी, कधी दिला ? लेखी दिला का तोंडी दिला ? आणि जे असे परिमाण अस्तित्वातच नाही त्याला जन्माला घालून लेखकांने काय साधले ? दुसरं असं की त्यामुळे रायटर्स लिबर्टीचा जन्म महाभारत कालीन मानायचा का ? असे नानाविध वादाचे मुद्दे या अनुषंगाने उभे राहतात. त्याची उत्तरे कोण देणार आणि तशी उत्तरे देण्याइतका त्याचा किंवा तिचा या बाबतीत अधिकार आहे का ? आणि तो तसा असेल, तर तो त्याला किंवा तिला कोणी बहाल केला ? असे अनेक वादाचे पोट-मुद्दे सुद्धा सुज्ञ वाचकांच्या पोटात खड्डा पाडू शकतात मंडळी !
तर थोडक्यात काय, तर कुठल्याही गोष्टीतून कोणाला वादच उकरून काढायचा असेल, तर तो त्याला कसाही उकरून काढता येतो, इतकंच मला वाचकांच्या मनावर ठसवायचं होतं ! आता ते तसं ठसवण्यात मी यशस्वी झालोय का नाही, हा पुन्हा वादाचा मुद्दा ! पण बहुतेक सु्बुद्ध वाचकांना माझं म्हणणं पटावं आणि ज्यांना ते पटणार नाही त्यांनी नवीन मुद्दे मांडून नवीन वाद, मी सोडून, कुणाशीही घालायला माझी काहीच हरकत नाही, या बद्दल मात्र नक्की वादच नाही !
वाद ! ह्याच खतपाणी मुलांच्या मनांत बहुतेक त्यांच्या वयात यायच्या वयात, म्हणजे साधारण आठवी नववीमधे शाळेतूनच घातलं जात. मी असं म्हणतोय म्हणून तुम्ही या विषयावर माझ्याशी वाद घालायच्या आधीच, मी असं का म्हणतोय ते सांगतो. आठवा ती शाळेत होणारी “वाद विवाद स्पर्धा. ” ज्यात भाग घेण्यासाठी (भांडखोर ?) शिक्षक आपापल्या वर्गातून मुलं तयार करायचे. नंतर नंतर तर “आंतर शालेय वाद विवाद स्पर्धेत” एखाद्या शाळेला ढाल मिळाल्यावर, (तेंव्हा चषकाची आयडिया रूढ व्हायची होती) तर काय विचारूच नका. ज्या मुलांनी शाळेला “ढाल” मिळवून दिली त्यांचा सत्कार शाळेतर्फे केला जायचा ! वाचकांपैकी माझ्या पिढीतील काही लोकांनी अशी “ढाल” आपल्या शाळेला मिळवून देण्यात, स्वतःच्या “जिभेची तलवार” तेंव्हा चालवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी. मी मुळातच मवाळ स्वभावाचा असल्यामुळे अशा स्पर्धेपासून कायम चार हात दूरच रहायचो. त्यामुळे मला काही मुलं तेंव्हा, माझ्या अपरोक्ष मुखदुर्बळ म्हणायचे, असं मला नंतर समजलं. पण अशा वाद विवादस्पर्धा फक्त ऐकून त्यातून आपल्या ज्ञानात काही भर पडत्ये का बघावं ह्या एकाच विचाराने मी अशा स्पर्धेत भाग घेण्यापासून दूर राहिलो ते आज पर्यंत ! असो !
पुढे कॉलेजमधेसुद्धा “आंतर महाविद्यालयीन वाद विवाद” स्पर्धेतून, आता चारबुक जास्त शिकलेल्या आणि मिसरूड फुटलेल्या तरुणांना, तेंव्हा नाकातोंडातून निकोटीनचा धूर काढायचं प्रमाण फारस वाढलं नव्हतं म्हणून असेल, पण आपल्या डोक्यातली गरम विचारांची वाफ, अशा स्पर्धेतून आपल्या तोंडातून काढायची संधी मिळत असे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग काही तरुण त्याकाळी करत असतं. त्यातील काही जणांचा यामागे आपल्या आवडत्या कॉलेज क्वीनवर इंप्रेशन मारायचा छुपा अजेंडा असायचा. अशापैकी काही तरुण आपल्या छुप्या अजेंड्यात नंतर यशस्वी होऊन आपल्या क्वीनबरोबर यथावकाश लग्न करून मोकळे सुद्धा झाले ! पण आपल्या क्वीन बरोबरच्या लग्नानंतर आता झालेल्या बायकोबरोबर अगदी कुठल्याही क्षुल्लक विषयावरचा झडलेला वाद सुद्धा, त्यांना आजतागायत कधीच जिंकता आलेला नाही, हे मला नंतर कळलं ! आता त्या दोघांच्या वाद विवादात जास्त खोलात न शिरता पुढे सरकतो, नाहीतर असा एखादा स्वतःच्या बायकोबरोबर घरच्या वादात कायम हरलेला नवरा, त्या रागापोटी माझ्याशी उगाचच नवीन वाद उकरून काढायचा !
“वादे वादे जायते तत्वबोध:” हे आपल्या देशात अर्वाचिन काळापासून चालत आलेले तत्व होते. पण आजकाल कुठल्याही वादाचे स्वरूप निकोप न राहिल्यामुळे त्याचे वितंड वादात रूपांतर व्हायला लागले आहे. जगात असा कुठलाही वाद नाही की ज्याचे उत्तर सुसंवादातून मिळणार नाही. पण मी म्हणतो तेच खरे असा आग्रह धरून कोणी वाद विवाद करत असेल तर त्यातून कुठलाही वाद हा विकोपालाच जाणार आणि त्याच पर्यवसान कधी कधी दोघांच्याही अंताला सुद्धा कारणीभूत ठरू शकत. याची काही उदाहरणं आपण इतिहासात वाचली असतीलच. पण त्यातून धडा घेण्याऐवजी लोकं आपला हेका न सोडता वाद विकोपाला जाईपर्यंत ताणतात हे ही तितकंच खरं.
शेवटी इतकंच म्हणावंस वाटत की, कुठल्याही वादावर पडदा पाडायची “दवा” “वाद” हा शब्द आपण उलटा वाचलात तर त्या उलट्या शब्दातच आहे, हे आपल्या लक्षात येईल ! पण त्यासाठी वाद विवाद करणाऱ्या लोकांनी आपापलं डोकं शांत ठेवून, समोपचाराने कुठलाही वाद, प्रसंगी दोघांनी दोन दोन पावलं मागे जाऊन, तो वाद सोडवायचा प्रयत्न मनापासून करणं गरजेचे आहे, हे लक्षात ठेवायला हवे !
आपल्या सर्वांचा माझ्या सकट दुसऱ्याशी, कायम सुसंवादच घडो हीच सदिच्छा !
शुभं भवतु !
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) ४०० ६१०
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈