श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “डोंगराला आग लागली पळा रे पळा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“रे बाबल्या खयं असा तू?… रे मेल्या घरात असा कि खयं बाहेरच खपलसं!… आणि मंदा वहिनी घरात असात का रे. ?.. “
” व्हयं ता आम्ही दोघेवं बी या टायमाक घरात असा नाय तर काय शांता दुर्गेच्या राउळात झांज वाजवूक बसतत!… काय तरी इचारतस!… ता जाऊ दे.. तू फोन कित्येक केलसं ता सांग आधी?… एकाच वाडीतले शेजारी असां तरी तुका घराक येऊन बोलू झाला असताना… घराक आग लागल्याची वार्ता अर्जंट देयाला फोन केलसं काय मरे!… वश्या !काय झाला ता आधी इस्कटून सांग?… शिरा पडली तुझ्या तोंडावर ती!… “
” रे बाबल्या आग माझ्या घराक नाय तर तुझ्या घराक लवकरच लागतली समजला!… मी तुका आधीच सावध करान राहिलो… तू येळेलाच शाना झालसं तर तुझो घरदार आबाद रव्हता… मंगे तू आनी तुझा नशीब!… “
“वश्या! आज जरा जादाच घेतलसं काय?… अजून बी तू कोड्यात बोलून रव्हलसं!… रे मी मंत्रालयातला पट्टेवालो असा तुझ्या सारखो पिऊन नाही.. तेवा माझ्या खोबडीला समजेल असा बोल ना रे… काय तुका बोनस मिळालो!, का महागाईभत्याचा डिफरन्स गावलो!.. का तुका चायपानीची लाटरी लागली!… काय असेल ते सांगून टाक ना लवकर…”
“रे बाबल्या!… काय सांगू तुका? अरे तू म्हणतसं ता सगळा माका कालच हाती मिळाला… अरे ता हिन्दी पिक्चर मधे नाय का बोलत भगवान जब भी देता है तो छप्पर फाडके देता है… साला माझा नशिब बघ तसाच फळफळला… घरी बाईल एव्हढी खूश झाली म्हनुन सांगू… तिने माका तसाच बाजारात घेवोन गेला… आनि बाबल्या तुका सांगतय तिने डझनावारी साड्या, ड्रेसेस, बेडशीटा, चादरी.. काय नि काय इतकी खरेदी केलीन कि सगळो भरलेलो खिसो सुफडा साफ झाल्यावरच घराकडे परत इली… एक तांबडो पैसौ देखील त्यातला तिने शिल्लक तर ठेवलो नाय.. ना माका एक चड्डी बनियन घेतल्यान… वर माका नाकाचा मुरका मारून बोलला लगीन झाल्या पासून आज माझी होसमौज काय ता पुरी झाली… जल्माचा दळिंदर ता गेला… आता ह्या घेतलेल्या सगळ्या साड्या, ड्रेसेस, समंधा आधी त्या मंदेक दाऊन आल्याशिवाय माझो जीव शांत व्हायचो नाय… नाकझाडी मेली.. दर महिन्याला साडी ड्रेस आणल्यावर मला दाखवायला घेऊन येऊन मला जळवायची… आमच्या ह्यांका पट्टेवाले असले तरी रोजचो खुर्द्याने खिसो भरान घरी येततं… भावजी पिऊन असतले तरी त्यांका एक दमडीची चायपानी कसा मिळना नाय… असा महणून माका चिडवून जाता काय… आता तिका इतकी गाडाभर खरेदी घरी जाऊन दावतयं नि तिची अशी जिरवतयं कि त्येचा नावं ते… पुन्हा म्हणून या विमलाच्या नादी लागू नको असा तिका धडा शिकवूनच येतेयं… बघाच तुम्ही… असा माका टेचात बोलून सगळी खरेदी कमरेला धरून तुझ्या घरा कडे निघाली असा… माका इचारशील तर तू आनि मंदा वहिनी जसे असाल तसे घराबाहेर पडान खरा खराच शांता दुर्गाच्या राउळात जा… तुम्ही घरी नाय बघून विमला घरी रागे रागे परत येतली.. नि मगे तिचो राग शांत झाल्यावर मीच तुमका घरी बोलवेन… तसा तुका जमना नसेल तर माका माफ कर… नि घे मंगे घराक आग लावून… एक इमानदार दोस्ताचो सल्लो असा… बघ तुका किती पटता ता…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈