सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चाकं – भाग 2 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ. हंसा दीप
(त्याने व्हील चेअरच्या चारी बाजुंनी टीनचे दरवाजे बनवून घेतले, त्यामुळे ती कितीही हलली, डुलली तरी संतुलन बिघडून ती खाली पडणार नाही. कोणत्याही तर्हेची दुर्घटना घडू नये, म्हणून सुरक्षिततेसाठी तिथे कुलूपही लावले ) — इथून पुढे —
‘तू माझ्यासाठी एक पिंजराच बनवलास हेनरी’ कैमी म्हणाली. हे ऐकल्यानंतर तो हसला. तेव्हापासून उन्हाळातल्या प्रत्येक संध्याकाळी तो पिंजराच तिचा साथीदार असतो.
आज कुलूप लावल्यानंतर कैमीच्या खांद्यावर हात ठेवत, हेनरी म्हणाला, ‘केवळ आजचाच दियास फक्त… उद्या या वेळेला तुझी सर्जरी होईल. मग रिकव्हरीचे काही दिवस. मग तू स्वतंत्र होशील. नंतर, ना पिंजरा राहील, न चाकाची खुर्ची. ’
कैमिलाच्या डोळ्यातही चमक आली. कोविदमुळे, इतर आजार आणि गैरजरूरी सर्जरी इस्पितळातले लोक पुढे पुढेच ढकलत होते. करोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, तारखा पुढे पुढेच जात चालल्या. शेवटी आता कुठे सर्जरीचा दिवस उगवला. इस्पितळात जाण्यासाठी बॅग तयार केली. हेनरी अतिशत खुश होता. कैमिलाला बाहेर सोडून कुलूपाची चावी खिशात ठेवून फिरत होता. कधी आत यायचा. कधी बाहेर जायचा.
कैमिलाला बाहेर बसून खूप वेळ झाला. नवी पाझलवाली गेम खेळता खेळता ती थकून गेली. तिने हाक मारली, ‘हेनरी, मला तहान लागलीय. ‘
सामान्यत: हेनरी एकदा हाक मारली की लगेच ऐकायचा. आज जरा वेळ लागला. कैमिला वाटलं, कदाचित बाथरूममध्ये गेला असेल. सध्या त्याला जरा जास्तच वेळ लागतो. आजा-काल त्याला ऐकायलाही कमी येऊ लागलय. हियरिंग एड्सही बदलायला हवीय. कसं बोलवायचं त्याला? कितिदा म्हंटलं त्याला, एक मोबाईल तरी घेऊयात. पण त्याचं म्हणणंही खरं होतं. तो म्हायचा, ‘उगाच खर्च कशाला वाढवायचा?’
आपल्या जवळ असलेली काठी ठोकून ठोकून कैमिने आवाज केला. जवळ असलेलं वर्तमानपत्र खुर्चीवर वाजवण्याचा प्रयत्न केला. हॅलो, हाय सारखे तर्हे-तर्हेचे आवाज तोडाने काढले, पण हेनरी आला नाही.
समोरच्या रस्त्यावरून एक दंपत्य फिरत फिरत चाललं होतं. कैमिने त्यांना जवळ यायची खूण केली. प्रथम ते घाबरले, पण नंतर समस्या समजताच ते आनंदाने दरवाजाजवळ उभे राहिले. बेल वाजवली. कडी खटखटवली. कैमि उत्सुक नजरेने हेनरीची प्रतीक्षा करत राहिली. पण, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग तिने मदत करणार्या दांपत्याला सांगितले, ‘प्लीज, आपण मागच्या दरवाज्याने आत जा. आत कम्प्यूटरजवळ चावी ठेवलेली असेल. ती घेऊन या. ’
ते आत जाऊ शकले नाहीत. दरवाजा आतून बंद होता. ते दार खटखटू लागले, पण दार उघडलं नाही. येता-जाता आणखी काही लोक जमा झाले. अर्ध्या आसाच्या अथक प्रयत्नांनंतर कैमिलाला विचारून त्यांनी पोलिसांना कळवलं॰
कैमि हैराण झाली. तिला कळतच नव्हतं की अखेर हेनरीला झालय तरी काय? तिला वाटलं, रात्री नीट झोप लागली नसेल. त्यामुळे कदाचित डुलकी लागली असेल. अनेकदा त्याला रात्री नीट झोप लागत नसे. पण आता तर खूप वेळ झाला. इतका गाढ झोपला असेल, तर पोलीस तरी त्याला कसे उठवणार?
पोलीस आले. थोड्याशा प्रयत्नांनंतर त्यांनी कुलुप तोडले. समोर खुर्चीवर हेनरी बसला होता.
‘मिस्टर हेनरी.. ’ काहीच उत्तर मिळालं नाही.
ऑफिसरने हेनरीच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला, तशी तो खाली पडला. जसा काही कुठल्या तरी स्पर्शाची वाट बघतोय. काही क्षण त्याच्या श्वासोच्छवासाची चाहूल घेतल्यावर ऑफिसरने मान हलवली आणि अॅम्ब्युलंस बोलावली. या गोष्टी इतक्या झटकन झाल्या, की समोरचं दांपत्य आवाक झालं. सगळ्यांची हलणारी डोकी काही सांगत होती. बाहेर जाऊन कैमिलाला कसं सांगायचं?
पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. ‘मिसेस कैमिला आपल्याला काही सांगायचं आहे.
कैमिलाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ती समोर रस्त्याकडे बघत होती.
‘सॉरी, आपले पती हेनरी… ’
तरीही ती काही बोलली नाही. लोकांना वाटलं, ती आक्रोश करेल. पण, तिथे केवळ शांतता होती. कदाचित एका विशिष्ट वयानंतर मन आशा गोष्टींसाठी तयार होत असेल. या धावपळीनंतरही आणि अॅम्ब्युलन्सची पींपीं ऐकूनही ती गप्पच होती, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. तिला तिच्या पिंजर्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीसांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा तीही त्याच्यासारखीच लुढकली. दैवयोगाने तिचा श्वास मात्र चालू होता. तिला ताबडतोब हॉस्पिटलमधे नेण्यात आलं. घरातून दोन अॅम्ब्युलन्स निघाल्या. एकात हेनरीचे शव होते. दुसरी कैमिलाला इमरजन्सी विभागात पोचवत होती.
थोड्या वेळातच कैमिला धोक्याच्या बाहेर आली. अजूनही ती बेशुद्धच होती. सात दिवस ती शुद्धीवर आलीच नाही. तेव्हा सगळ्या कायद्याचं, नियमांचं पालन करत हेनरीचे अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या शेजार्यांना सांगितलं गेलं. फोनच्या डायरीतून नंबर घेऊन, मिळालेल्या एक-दोन नातेवाईकांनाही कळवलं गेलं. काही आले. काहींनी शोकसंदेश पाठवून श्रद्धांजली वाहीली.
पूर्णपणे शुद्धीवर येऊन सर्जरीयोग्य बनण्यासाठी कैमिलाला एक महिना लागला. त्यानंतर जिथे तिचं ऑपरेशन होणार होतं, त्या हॉस्पिटल मधे तिला पोचवलं गेलं. ऑपरेशन कुठे आहे, हेनरी का नाही आला, याबद्दल तिने काहीच विचारलं नाही. कदाचित तिला कळलं असावं.
डॉक्टरांच्या दृष्टीने यावेळी सर्जरी करणं महत्वाचं होतं. त्याप्रमाणे सर्जरी झाली. पाच दिवसांनंतर जेव्हा तिला घरी पाठवायचं ठरलं, जेव्हा तिला हेनरीबद्दल सांगण्यात आलं. तेव्हा, ती तटस्थपणे म्हणाली, ‘मला माहीत आहे. ’ आणि पुहा गप्प झाली.
हॉस्पिटलमधून एक नर्स तिच्याबरोबर आली होती. कैमि काही सेकंदांसाठी उभी राहयाची आणि पुन्हा खाली बसायची. काही दिवसांच्या, नर्सच्या आणि फिजिओथेरपीस्टच्या अनवरत प्रयत्नांनंतर, तिच्या पायांनी तिच्या शरिराचा भार सहन करणं मान्य केलं.
हळू हळू आपल्या पायांनी घराच्या प्रत्येक खोलीत, ती चांगल्या तर्हेने फिरू लागली. एके दिवशी एका कोपर्यात उभ्या केलेल्या व्हील चेअरकडे तिचं लक्ष गेलं, तिकडे लक्ष जाताच, तिला व्हील चेअरच्या मागे हेनरी उभा असलेला दिसला. ती त्यावर बसली. तिला वाटलं, त्यामुळे ती हेनरीच्या हातांचा स्पर्श अनुभवू शकेल.
अनेकदा, जेव्हा उशीर व्हायचा, तेव्हा ती रागावायची. तो सॉरी म्हणत घाई करू लागे, तर त्यात आणखीनच उशीर व्हायचा. तो सॉरी सॉरी म्हणत, मान हलवायचा आणि हसायचा. ती तीच व्हील चेअर होती. हेनरी तिला ढकलायचा आणि तिला मागे असलल्या त्याच्या उपस्थितीची जाणीव व्हायची. व्हील चेअरवर बसलेली ती कधी आपल्या पायांकडे बघायची, तर कधी हेनरीच्या हाताच्या स्पर्शाचा अनुभव घ्यायची.
एकदा तिचे लक्ष टेबलावर ठेवलेल्या ब्राऊन लिफाफ्याकडे गेलं. ते हेनरीचं पत्र होतं. पत्र कसलं, मृत्यूपत्रच होतं जसं काही. एक वाक्य मोठ्या मोठ्या अक्षरात पुन्हा पुन्हा लिहिलं होतं, ‘जर देणं शक्य असेल, तर माझे पाय माझ्या पत्नीला द्या. ’ एक एक अक्षर तिच्या डोळ्यांवर समुद्राच्या लाटांप्रमाणे थपडा मारत होतं.
‘हेनरी, तू जर मला विचारलं असतंस, विकल्प दिला असतास, तर मी व्हील चेअरचीच निवड केली असती. ’
ती कधी स्वत:च्या पायाकडे बघायची, कधी व्हील चेअरकडे, ज्या पिंजर्यात ती आत्तापर्यंत कैद होऊन राहिली होती. आज घराचा काना-कोपरा बघत होती. तिथे चालण्यासाठी इतके दिवस तिचे पाय बेचैन झाले होते. आता ती गतिमान झाली होती आणि हेनरी स्थिर. हेनरीचे पाय माझे होते, आता मी त्याचे पाय बनेन. तिने लगेचच हेनरीचा फोटो उचलून व्हील चेअरवर ठेवला आणि त्याच्या स्थिरतेला गती देऊ लागली. अनेक वर्षांचं कर्ज होतं. मरेपर्यंत चुकवलं, तरी उऋण नाही होऊ शकणार. आत्ता आत्तापर्यंत हेनरी तिची सेवा करत होता. आता कैमिलाला संधी मिळाली, तर तो गप्प झाला.
व्हील चेअरवर ठेवलेल्या फोटोतील हेनरीचा चेहरा बघणंही तिला असह्य झालं. जर खरोखरच हेनरी व्हील चेअरवर असता, तर कसं वाटलं असतं? कदाचित ते सत्य कैमिला किती वेदनादायी झालं असतं. हा विचार मनात येताच तिला वाटलं, इतकी वर्षे तिचा भार चाकं उचलत होती. पण हेनरीचं मन, रोज किती भार उचलत होतं, त्याला गणतीच नाही. कैमिलाजवळ चाकं होती. हेनरीजवळ तर ना पाय होते, ना चाकं. आपले पाय तर त्याने पहिल्या दिवसापासून कैमिला देऊन टाकले होते.
“ओ हेनरी!”
हाहाकारी मौनामधे तिचे ओठ अस्पष्टसे पुटपुटले. तिने त्वरेने हेनरीचा फोटो व्हील चेअरवरून उचलला.
कैमिच्या पायांना जशी चाकं लागली होती. इतके दिवस स्थिर असलेल्या पायांनी आता पुन्हा गती घेतली होती.
– समाप्त –
मूळ हिन्दी कथा – “पहिए“
हिन्दी लेखिका : डॉ. हंसा दीप, कॅनडा
संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada
दूरभाष – 001 + 647 213 1817 ईमेल – hansadeep8@gmail.com
मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈