श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “शह आणि काटशह” – लेखक : डॉ. राजीव जोशी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : शह आणि काटशह (वैद्यकीय व्यवसायातील चुरस)
लेखक : डॉ. राजीव जोशी
पृष्ठे : २४४
मूल्य: ४००₹
या पुस्तकातील एकूण ३१ प्रकरणांतून वैद्यकीय व्यवसायातील चांगल्या-वाईट घटनांची चिरफाड करण्यात आली आहे. आणि शह आणि काटशह या स्वरूपात लिहिलेली आहे, जी वाचनीय आहे. त्यातील काही भाग-
व्यवसायातील चुरस
या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. सुहास नेने यांनी लिहिली आहे …. ‘कोणतीही गोष्ट अर्थार्जन करण्यासाठी करायची म्हटली की, त्यात नफ्याचा आणि तोट्याचा विचार आलाच. कोणीही जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा आणि तोही कमीत कमी तोटा सोसून असाच विचार करणार. अगदी वैद्यकीय व्यवसायातही ही गोष्ट ओघानेच आली. किंबहुना क्वचितप्रसंगी चार गुना अधिकच ! चार पैसे दुसऱ्यापेक्षा जास्त मिळवायचे म्हणजे त्यात चुरस, ईर्षाही आलीच. चुरस आली की त्यात डाव, प्रतिडाव, शह-काटशह हे पण येणे क्रमप्राप्त झाले. ‘Everything is fair in love and war. ‘ …. असे त्यात त्यांनी म्हटले आहे. शह-काटशहदेखील चुकीच्या मार्गाने द्यायचे, का नीतीच्या मानदंडांचा विचार करायचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न राहतो. रुग्णाच्या हितासाठी राबवलेली चुरस रुग्णाच्या नक्कीच कायम फायद्याची यात कणभरही शंका नाही.
डॉक्टर राजीव जोशी अशाच निर्हेतुक चुरशीचे स्वागत करतात आणि त्याप्रमाणे वागतात आणि म्हणून अगदी निःसंकोचपणे लिहूनही जातात……
… चुरशीच्या डावाची सुरुवात प्रतिष्ठित, आधीपासूनच एस्टॅब्लिश्ड असलेल्या डॉक्टरांच्या रुग्णालयाच्या जवळ स्वतःचे रुग्णालय सुरू करण्यापासून होते आणि एका गोष्टीतून दुसऱ्या तितक्याच उत्कंठावर्धक गोष्टीचा जन्म होतो. हा सिलसिला सुरूच राहतो आणि त्यातून वैद्यकीय विश्वातील अनेक सुरस, चमत्कारिक कथा विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने उलगडत जातात. सत्यकथा असल्याने त्यात पुण्यातील प्रतिष्ठित, नामांकित डॉक्टरांची नावेही प्रत्यक्षपणे, कधी कधी अप्रत्यक्षपणे येऊन जातात. घासाघीस करून पदरात पाडून घेणाऱ्या तडजोडी, बहाद्दर व्यावसायिकांची कहाणीपण येते. येनकेन प्रकाराने स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारे अगदी सीनियर सुद्धा त्यातून सुटत नाहीत. गरज नसताना आपण ज्या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेले नाही; त्याची औषधे बिचाऱ्या अगतिक, अडाणी रुग्णांना देण्याचा अधिकार आहे का, हा सवाल आपोआपच येतो. बऱ्याच वेळी लोकांना साधे हवामानात बदल झाल्यामुळे होणारे व्हायरल इन्फेक्शन असते; की जे आपले आपणच औषधाविना काही दिवसांत जाणारच असते, त्यासाठी भारी भारी अँटिबायोटिकची आवश्यकता नसते. जे काम टाचणीने होणार आहे; त्यासाठी अॅटमबॉम्बचा उपयोग करणे चूकच आहे, परंतु याविषयी माहीत नसल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे केले जाते. अलंकारिक नसली, तरी ओघवत्या भाषेत असल्यामुळे प्रत्येक घटना अतिशय स्वच्छपणे डोळ्यांसमोर येते.
नुसता प्रॉब्लेम सांगून डॉक्टर राजीव थांबत नाहीत; तर त्यासाठी काय करावे, काय करू नये असा टेक-होम मेसेजही देतात. ही या लिखाणाची खासियत मी समजतो. ‘तुम लढो मैं कपडे संभालता हूँ’ सारखी बोटचेपी वृत्ती त्यांची नाही. इन्शुरन्स कंपन्यांच्या वाढत्या, गोंडस, फसव्या कारभाराबद्दल बोलताना ते परखडपणे आपली मते मांडतातच आणि ‘पती-पत्नी और वो’ यांच्यातील ‘वो’ कडेपण आता खूप लक्ष द्यायला लागणार आहे, असा संकेत देतात. कट किंवा कमिशन आणि डॉक्टर यांचा चोली दामन का साथ असतो, असे समीकरण काही लोकांच्या डोक्यात अतिशय फिट बसलेले आहे. त्यातल्या स्वतःला आलेल्या अनुभवाबद्दलही ते बोलतात; पण या वेळी डॉक्टरांची लेखणी अडखळत नाही, कारण ‘कर नाही तर डर कोणाला !’ कटची कटकट ठेवली नाही, तर डोक्याला त्रास होणारच नाही! (कट घेणारे फक्त फॅमिली डॉक्टरच असतात, असा गोड गैरसमज डॉक्टर जोशींनी करून घेतला असावा; असा माझा समज आहे ! कट घेणाऱ्याचा एक डीएनएच असतो, तो डिग्री किंवा पॅथीमध्ये नसतो !!) आयुर्वेदातील एमडी किंवा एमएससारख्या डिग्ग्रांनी रुग्णांची फसगत करणाऱ्या महाभागांना पण जाता जाता ते सहज फटकारतात. त्यांच्या डिग्रीतला फोलपणा सिद्ध करायला कचरत नाहीत. अप्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या, औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या ज्ञानावर अवलंबून, त्यांच्या इशाऱ्यावर नाचून औषधे देणाऱ्यांना चिमटा काढायला सोडत नाहीत.
साठा उत्तरांची ही कहाणी सुफल संपूर्ण होताना डॉक्टर राजीवची लेखणी दुसऱ्या भागासाठी सरसावलेली दिसते. ते प्रवेश प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात शिरतात आणि न सुधारलेल्या किंवा सुधारायचेच नाही, अशा मनोवृत्तीत राहिलेल्या न्याययंत्रणेचे वाभाडे काढतात. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात रोजनिशी लिहावी, अशा पद्धतीने उत्कंठावर्धक शैलीत मांडलेल्या या कडू सत्य घटनेत स्वतःसाठी नाही, तर वैद्यकीय प्रवेशातील अन्यायाविरुद्ध ‘जनहित याचिका’ (PIL) दाखल करून घेतानाचे स्वानुभव अतिशय रंगतदारपणे रेखाटले आहेत. सहाध्यायी, मित्र- मैत्रिणी, शिक्षक, नातेवाईक, वृत्तपत्रे, प्रशासन आणि न्यायव्यवस्था या साऱ्यांची प्रतिबिंबे या गढूळ पाण्यात आपापल्या कर्माप्रमाणे स्वच्छ पडलेली दिसतात! लाल फितीचा आब, डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेचा रुबाब, नियमांप्रमाणे चाललेल्या शिक्षणार्थीचा आक्रोश कसा दाबून टाकतो, ‘Justice delayed is Justice denied’ हेच पुनःपुन्हा कसे अधोरेखित करतो आणि रास्त हक्कासाठी सामान्यांना किती झगडावे लागते आणि हातात सत्ता असली की, मी म्हणेन तीच पूर्व दिशा असे राबवणारे कसे भेटतात, हे पटवून देतो.
प्रस्थापित न्यायव्यवस्थेविरुद्ध स्वतःसाठी नव्हे, तर अयोग्य पद्धतीने येऊ पाहिलेल्या पण चुकीच्या राजमार्गाला (!) विरोध करण्यासाठी पदरमोड करून, लष्करच्या भाकरी भाजताना करावा लागणारा मनस्ताप, घालवलेली मनःशांती या साऱ्यांचाही आढावा या दुसऱ्या भागात येतो.
चुरस, शह-काटशह यांना दृश्य स्वरूपात दाखवण्यासाठी वापरलेला बुद्धिबळाचा पट शीर्षकाची यथार्थता नक्की दाखवतो.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈