श्रीमती उज्ज्वला केळकर

? आत्मसाक्षात्कार ?

☆ मी… तारा… भाग – २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वत:शीच केलेलं हितगुज किंवा आपणच घेतलेली आपली मुलाखतच म्हणा ना!

डॉ. तारा भावाळकर या लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासक समीक्षक आणि संशोधक. या व्यतिरिक्त नाट्य, समाज, शिक्षण इ. अन्य क्षेत्रातही त्यांच्या लेखणीने करामत गाजवली आहे. त्यांनी आपला लेखन प्रवास, कार्यकर्तृत्व, आपले विचार, धारणा याबद्दल जो आत्मसंवाद साधला आहे… चला, वाचकहो… आपण त्याचे साक्षीदार होऊ या. वस्तूत: ही मुलाखत १३ एप्रील १९२१ पासून क्रमश: ई-अभिव्यक्तीवर ५ भागात प्रसारित झाली होती. आज डॉ. : तारा भावाळकर विशेषांकाच्या निमित्ताने ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रकाशित करत आहोत.. उज्ज्वला केळकर )

तारा –म्हणजे काय ताराबाई, जरा उलगडून सांगा ना!

ताराबाईरूढार्थाने शिक्षित माणसं म्हणजे लिहिता-वाचता येणारी माणसं, असं म्हंटलं जातं. थोडक्यात काय, तर साक्षरता म्हणजे शिक्षण असा अनेकांच्या गैरसमज असतो आणि शिक्षणाने शहाणपण येतं, असंही बर्‍याच जणांना वाटतं. अनक्षरांना ही माणसं आडाणी समजतात. ताराबाई त्यांना आडाणी म्हणत नाहीत. त्या त्यांना अनक्षर म्हणतात. त्यांना अक्षर ओळख नसली, तरी शहाणपण असतं. म्हणूनच त्यांना आडाणी म्हणणं ताराबाईंना कधीच मंजूर नव्हतं. त्यांनी लहानपणापासून ज्या अनक्षर बायका पाहिल्या, ग्रामीण भागातल्या पाहिल्या, आस-पासच्या पाहिल्या, कुटुंबातल्या पाहिल्या, त्या सगळ्यांकडे, तुम्ही ज्याला आत्मभान म्हणता ते होतेच. आत्मजाणीव होती, आहे आणि असणार आहे. ज्याला तुम्ही आज-काल अस्मिता म्हणता तीही लोकपरंपरेमध्ये आहे आणि त्याचे पुरावे म्हणून लोकपरंपरेतील कथा, गीते, उखाणे-आहाणे, ओव्या, अगदी शिव्यासुद्धा…. याच्यामध्ये दिसतात. अन्यायाची जाणीव आणि प्रतिकार करण्याची इच्छा, विद्रोह, हे सगळे, जे स्त्रीवादामध्ये अपेक्षित आहे, ते लोकसाहित्यात ताराबाईंना सुरुवातीपासूनच जाणवत आले आहे. कारण व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होणं, हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे, असं ताराबाईंचं मत आहे. पदव्यांची शेपटं मिळवणं म्हणजे शिक्षण नव्हे, असं बर्‍याचशा पदव्या मिळवल्यानंतर ताराबाईंना वाटतं. शिक्षण क्षेत्रात -४५-४७ वर्षं काम केल्यानंतर त्यांचं हे मत ठाम झालं आहे. लोकपरंपरा ही शहाण्यांची परंपरा आहे. त्या अनक्षर स्त्रियांना, व्यवस्थेबद्दलचे प्रश्न निर्माण होत होते. त्याची उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते साक्षर नसतील, पण शहाणे आहेत. ताराबाई हेच लिहीत आल्या. तुम्ही त्याला स्त्रीवादी म्हणा, किंवा काहीही म्हणा. नाटकाबद्दल लिहायचं, तरी त्यातनं त्यांना स्त्रीच दिसायला लागली. लोकसाहित्यातील स्त्री तर त्यांनी अनेक प्रकारांनी पाहिली. कथा-गीतातूनच नाही, तर चाली-रिती, व्रत-वैकल्ये, परंपरा या सगळ्यामध्ये स्त्रीला काय म्हणायचे आहे, याचा शोध ताराबाई सातत्याने घेत आलेल्या आहेत.

स्त्रीचे चित्रण करत असताना संस्कृतीमधून, कुठल्याही संस्कृतीमधून, सामान्यपणे मोठमोठ्या महान ग्रंथात कुणी काय म्हंटलय, याबद्दल लोक बोलतात. वेद, रामायण, महाभारत यात काय म्हंटलय, याबद्दल लोक बोलतात. पण हे ग्रंथ लिहिणारे कोण? पुरुषच. म्हणजे पुरूषांना स्त्री जशी असावी, असं वाटत होतं, तशी त्यांनी ती चित्रित केली आणि ती तशीच आहे, असं गृहीत धरून पिढ्या न पिढ्या, ती गोष्ट बायकांच्या डोक्यावर मारत आले. परिणाम असा झाला की शिकल्या सवरलेल्या साक्षर बायकासुद्धा असंच समजायला लागल्या. वेदात असं म्हंटलयं, रामायणात तसं म्हंटलय, असंच त्याही बोलू लागल्या.

बाईला स्वत:बद्दल काय म्हणायचय हे ताराबाईंना फक्त लोकसाहित्यातच दिसतं. तिथे ती स्वत:च्या मुखाने बोलते. स्वत:चा विचार मांडते. स्वत:च्या भावना व्यक्त करते. ती दुसर्‍याचं काही उसनं घेत नाही. म्हणूनच बाईला कुणी विचारलं नाही की ‘बाई ग तुला काय वाटतं? पुरुषांनी परस्पर ठरवून टाकलं, बाईला असं… असं… वाटतं आणि रामायण, महाभारतात लिहून टाकलं. त्यामुळे ज्याला आपण स्त्रियांबद्दल एकाकारलेला विचार म्हणतो, तो आलेला आहे. ताराबाईंना हे सगळं नामंजूर होतं. त्यामुळे त्या पद्धतीने त्या लिहीत आल्या. लोकसंस्कृतीमधली अशी जी स्त्री आहे, सर्वसामान्य स्त्री…. तिच्याबद्दल त्या लिहीत आल्या.

ताराआता लोकसंस्कृतीत, ज्या स्त्रियांच्या ओव्या, उखाणे वगैरे आहेत, त्याच्यामध्ये पुरुष नातेवाईकांचं, म्हणजे बाप, भाऊ, नवरा, मुलगा यांचं कौतुक केलेलं दिसतंच ना?

ताराबाईहो ते दिसतंच! पण ज्यावेळी बाप, भाऊ, नवरा, मुलगा अपमानास्पद वागणूक देतो, पुरुषी वर्चस्व दाखवतो, तेव्हा तेव्हा तिने त्याचा निषेध केला आहे. विशेषत: ओव्यांमधून केला आहे. उखाण्यांमधून, म्हणीतून केला आहे.

आमचे लोकसाहित्याचे पुरुष संशोधकही असे लबाड आहेत, की या बाईची ही दुसरी बाजू, तिने केलेला निषेध, ते काही लिहीत नाहीत. शिक्षित लोकांचा असा समज आहे की बाईला सासरचेच तेवढे त्रास देतात. नवराच त्रास देतो पण प्रत्यक्षात त्यांच्या ओव्यातून असं दिसतं की बापही त्रास देतो. भाऊही त्रास देतो. मुलगाही त्रास देतो. जुन्या काळात सवतीवर मुलगी दिली जायची. आता ती मुलगी काय स्वत: उठून गेली असेल का? बापच देणार. अशा बापाचा निषेध करत ती म्हणते, ’बाप विकून झाला वाणी. ’ ताराबाईंना वाटतं, नणंद – भावजय यांच्यात वीष कालवणारी पुरुषप्रधान व्यवस्था आहे, हे त्या आमच्या आडाणी म्हंटल्या जाणार्‍या बाईला कळलेलं होतं.

सांगायचं तात्पर्य असं की ताराबाई एकातून दुसर्‍यात वगैरे गेल्या नाहीत. ही सगळी व्यामिश्रता आहे. ही व्यामिश्रता जगण्यात असते आणि लोकसाहित्य हे जगण्यातून येतं. जसं जगणं, तसं ते साहित्य असतं. त्यात कृत्रिमता नसते. प्रत्यक्ष जे अनुभवलं आहे, ते त्या स्त्रिया, ओव्यातून, कथातून, म्हणी-उखाण्यातून बोलत आलेल्या आहेत.

तारा – याशिवाय ताराबाईंनी आणखी काही लिहिलय की नाही?

ताराबाईलिहिलय.

क्रमश: भाग २ 

डॉ. ताराबाई भावाळकर

संपर्क – ३, ’ स्नेहदीप’, डॉ. आंबेडकर रास्ता, सांगली, ४१६४१६ मो. ९८८१०६३०९९

 प्रस्तुती – सौ उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments