डाॅ. मीना श्रीवास्तव
इंद्रधनुष्य
☆ ‘रामरसाची महती…’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव
नमस्कार मंडळी !
सर्वप्रथम आपण सर्वांना नववर्षाच्या आरोग्यवर्धिनी शुभेच्छा!
सरत्या वर्षाच्या निरोपाचे आणि नववर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत ! तेव्हां मी देखील आपल्या दवा-खान्याच्या मार्गावर असतांनाच आडमार्गावरील एक वेगळी मार्गिका शोधायचं ठरवलं. नवविचारांची नौका दोलायमान स्थितीत असतांनाच केबीसीचा एक भाग अचानक नजरेसमोर आला. बालकदिनानिमित्य बालकांतीलच (यांची अचाट बुद्धी बघतांना ‘बाळबुद्धी’ हा शब्द अगदीच ‘आऊट ऑफ सिल्याबस’ वाटत होता!) एका बाळराजाचे किचनमधील कवतिक बघतांना त्याच्या इच्छेखातर त्याचे दैवत असलेले साक्षात रसोईकिंग संजीव कपूर त्याच्या भेटीस ऑनलाईन स्क्रीनवर अवतरले. या बाळाने त्यांना जो प्रश्न विचारला तो किचनमध्ये प्रथम प्रवेश करणाऱ्या तमाम नुकत्याच लगीन झालेल्या नवख्या महाराण्यांना पडत असतो. त्याने कपूर महाशयांना विचारले, “एखाद्या पदार्थात स्वादानुसार मीठ घालणे म्हणजे नेमके किती?” हा यक्षप्रश्न मला माझ्या किचनच्या प्रारंभिक कारकिर्दीत हैराण करीत असे. ‘चमचा’ नामक वस्तूचे परिमाण (पदार्थ खारट होण्याचे परिणाम भोगल्यानंतर) या बाबतीत कुचकामी आहे हे लक्षात आले. याचे विश्लेषण करतांना मला एक विनोद म्हणून कुणीतरी छापलेला सिरीयस मुद्दा आठवला.
….. मैत्रांनो, डॉक्टर पेशंटला एका गोळीचा डोस समजावून सांगतोय. “एक एक गोळी दिवसाला दोन वेळा अशी १० दिवस घ्यायची. ”
हा संदेश ऐकल्यावर वेगवेगळ्या पेशंटची तीन प्रकारची प्रतिक्रिया (मन की बातच्या रूपात) असते.
नंबर एक- “आता हे असे १० दिवस गुंतून राहण्यापेक्षा एक गोळी दिवसाला ४ वेळा घेऊन ५ दिवसात ही कटकट संपवतो”
नंबर दोन- “याला माझ्या शरीराचे प्रॉब्लेम काय कळणार? या गोळ्या लय गरम असतात. मी आपला दिवसाला एकच गोळी घेणार. “
नंबर तीन- “डॉक्टरांनी सांगितलंय ते लक्षात ठेवणे माझे काम आहे. पूर्ण डोज व्यवस्थित घेईन तेव्हांच पूर्णपणे वेळेत बरा होईन”
(आपणच ठरवा, आपण कुठल्या क्रमांकावर असावे! हे उदाहरण औषधांच्या बाबतीत दिले. मला औषधे सोडून इतर कांही दिसत नाही हे माझ्या व्यवसायाचे हे साईड इफेक्ट समजा मंडळी!)
आता सांगा, दोन वेळचे मीठ (रामरस) एकाच वेळच्या भाजीत घातले तर? किंवा एक चिमूटभर टाकायचे ते अर्धी चिमूट टाकले तर? एक वेळ भाजी अळणी असेल तर वरून मीठ घ्यायची सोय आहे, पण खारट भाजी असेल तर? अथवा गॅसच्या दोन शेगड्यांवर दोन जणांच्या फर्माईशनुसार वेगवेगळ्या भाज्या शिजवतांना एका भाजीत डबल मीठ अन दुसऱ्या भाजीत कांहीच नाही असे झाले तर? (हे अनुभव गाठीशी आहेत म्हणून तर उदाहरण देतेय!) मंडळी, ‘अळणी भाजी’ रांधणारी दुसरी तिसरी कुणी नसून अजरामर झालेली ‘शामची आई’ आठवतेय कां? बरं, इंग्रजीत देखील उदाहरण आहे ते प्रसिद्ध साहित्यिक शेक्सपियर यांच्या जगप्रसिद्ध नाटकातील किंग लियरच्या धाकट्या कन्येचे. बापाला अळणी जेवण खायला देत ती “बाबा, माझे तुमच्यावर मिठाइतकेच प्रेम आहे!” असे सांगत स्वतःचे अनन्यसाधारण प्रेम पटवून देते.
आपण दर नववर्षी कांही संकल्पना मनाशी ठरवतो. (कांही मंडळी त्याच संकल्पना दर वर्षी राबवतात!) वरील मॅटर वाचून आपल्याला याची जाणीव झाली असेलच की प्रमाणबद्ध शरीरासारखेच प्रमाणशीर मीठ आपल्या आरोग्यासाठी अतिशय मोलाचे आहे. त्यासाठी ‘एक चुटकीभर नमक की कीमत’ आपण नव्याने करावी असे नाही. स्वातंत्र्यलढ्याचा मानबिंदू असलेला जाज्वल्य ‘मीठ सत्याग्रह’ आपल्याला माहीत आहेच. मिठाचा अतिरेक उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, आम्ल-आम्लारि असमतोल, शरीरावरील सूज इत्यादी विकारांना जन्म देतो. मैत्रांनो, आपल्या रोजच्या भाजीतील मिठाव्यतिरिक्त लोणची, पापड, चटण्या, विविध जंक फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादीत मिठाचे प्रमाण जास्त असते, कारण इथे ते पदार्थाचे संरक्षक कवच म्हणून उपयोगात आणल्या जाते. याखेरीज पानाच्या डाव्या बाजूला शुद्ध मीठ वाढण्याची परंपरा आहे. या सर्वांतील मिठाचे प्रमाण कमी करता येईल कां? याचा विचार नव्या वर्षाच्या संकल्पनेत जोडावा असे मी आपण सर्वांना आवाहन करते.
घरच्या गृहिणीच्या हातात पाळण्याची दोरी असतेच, पण त्याशिवाय घरच्या मंडळींकरता सकस आणि पौष्टिक अन्न रांधायची देखील महत्वाची जबाबदारी असते. तिने मनांत आणले तर अतिरिक्त मीठ सेवन करण्याला बऱ्याच अंशी आळा बसू शकतो. मिठाचे प्रमाण ‘उलीसे’ कमी झाल्यावर घरची मंडळी प्रारंभी कुरकुरत पण नंतर त्याचीच सवय लागून कमी मिठाचे जेवण खायला लागतील. पानाच्या डावीकडील अधिक मीठ असणारे पदार्थ देखील कमीत कमी खावेत. मिठाचा संपूर्ण त्याग करण्याचे कुणीही मनांत आणू नये. त्याचे देखील वाईट परिणाम होतात. कारण शरीरातील पेशींच्या कार्यात मिठाचे कार्य मोलाचे आहे. म्हणूनच या मिठाला संतमंडळी ‘रामरस’ असे संबोधतात. किती सुंदर कल्पना आहे ही! जसे रामरसाशिवाय जेवण रसहीन आहे तसेच रामनामाविना जीवन देखील रसहीन आहे हा त्यातील संदेश आहे.
निर्जलीकरण (डिहायड्रेशन) करता ओ. आर. एस अत्यंत उपयोगी आहे, परंतु ते लगेच उपलब्ध नसेल तर जागतिक आरोग्य संघटनेने सोपा फॉर्म्युला दिला आहे. घरगुती मीठ ३/४ चमचा, खाण्याचा सोडा १ चमचा, एका संत्र्याचा रस (नसल्यास कोणतेही लिंबूवर्गीय फळ) हे सर्व एक लिटर (उकळून घेऊन थंड केलेल्या) पाण्यात मिसळून बाधित व्यक्तीला द्यावे. प्राकृतिकरित्या आपल्याला क्षार आणि आम्ल पुरवणारे नारळ पाणी तर खरेखुरे अमृततुल्य ऊर्जावर्धक द्रव. आमच्या लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नागपूरला घरापासून जवळपास १. ५ मैल दूर अशा निसर्गरम्य अंबाझरी तलावाच्या काठच्या बागेत फिरायला पहाटे पहाटे जात असू. परत येतांना रस्त्याच्या किनारी माठात संचय केलेली अगदी स्वस्त अशी थंडगार ‘नीरा’ विकणारी माणसे भेटायची. आमच्यासारख्या कित्येक थकल्या भागल्या जीवांसाठी ती कूल कूल नीरा पिण्याचे परमसुख कांही वेगळेच असायचे. (‘नीर’ आणि ‘नीरा’ या शब्दांत किंचितच फरक असला तरी त्यांचे घटक वेगळे आहेत. ) ही ‘नीरा’ पहाटेच प्यावी कारण सूर्यप्रकाशाद्वारे नीरेचे रूपांतर ताडीत होते. कुठल्याशा प्रक्रियेद्वारे असा बदल टाळल्या जाऊ शकतो असे वाचल्याचे स्मरते. हे मात्र नक्की की आरोग्यदायी घटकांचा विचार केल्यास बहुगुणी नीरा नारळ पाण्यापेक्षा उजवी आहे.
नीरेसंबंधी आपल्याला अभिमानास्पद अशी माहिती देते. आपल्या देशातील प्रथम स्त्री जीवरसायनशास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी (१८ जून १९११ – २८ जून १९९८) या भारतातील पहिल्या विद्यावाचस्पती (पीएच. डी. ) पदवीधारक शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध पावल्या. त्यांनी १९३७ साली मुंबई येथून एम. एससी आणि इंग्लंडच्या प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठातून १९३९ साली पीएच. डी केले. त्यांच्या संशोधनाचा आवाका खूप मोठा आहे. आपल्या देशातील कित्येक अन्नघटकांच्या विस्तृत संशोधनासोबतच त्यांनी ‘नीरा या उत्कृष्ट पेयातील उपयुक्त घटक आणि त्यांचे माणसांवर परिणाम’ याचे संशोधन केले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेवरून कमला यांनी ‘नीरा’ (ताडीच्या विविध प्रजातींच्या फुलांपासून काढलेला रस) या पेयावर काम सुरू केले. त्यांना या पेयामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लोहाचे लक्षणीय प्रमाण आढळले. यानंतर याच संशोधन क्षेत्र पुढे जाऊन केलेल्या विस्तृत अभ्यासातून त्यांना असे दिसून आले की कुपोषित किशोरवयीन मुले आणि आदिवासी भागातील गर्भवती महिलांच्या आहारात नीराचा समावेश स्वस्त पूरक आहार म्हणून केल्याने त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. याकरता त्यांना त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पारितोषिक मिळाले. अशा या ‘नीरेची’ मला कधी तरी सय येते. पण आजकाल ती सहजासहजी दिसत नाही. मात्र त्यासाठी सूर्योदयापूर्वीचे फिरस्ते असणे आवश्यक!
प्रिय मैत्रांनो, मी मागील वर्षाच्या डायरीतील पूर्वीच्या संकल्पांची पाने ओलांडून नवे ऊर्जावर्धक संकल्प लिहिण्यास प्रारंभ केलाय, अन तुम्ही?
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈