श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 267
☆ घडी मोडली… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
संसाराचा गाडा म्हणजे परवड असते
जबाबदारी खांद्यावरती जोखड असते
*
घडी मोडली तेव्हा नव्हता विचार केला
विस्कटलेली घडी घालणे अवघड असते
*
लाखाचा मी हिशेब करतो बसून येथे
दिवाणजी मी ती दुसऱ्याची रोकड असते
*
काही बाळे श्रावण झाली कलियुगात या
त्या बाळाच्या खांद्यावरती कावड असते
*
रांधा वाढा करते आहे आनंदाने
तिच्याच नशिबी तर उरलेली खरवड असते
*
असून पैसा साथ देइना शरीर माझे
या देहाची तेव्हा चालू तडफड असते
*
लंगोटाने सुरू जाहला प्रवास होता
अखेरीसही सफेद कोरे कापड असते
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈