श्री मोहन निमोणकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ “ब्रेकअप…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
“हॅलो… हॅलो… बाबा, मी संजय ! झोपला होतात का?”
लंडनवरून संजयचा आबांना फोन. “नाही, आत्ताच डोळा लागला होता पुस्तक वाचताना. बोल तू. आत्ता कसा काय फोन केलास? तुझ्याकडे रात्र असेल ना?”, आबा मनगटावरील घड्याळात बघत म्हणाले. “आबा, अहो तुम्ही परत विसरलात. मी आता अमेरिकेत नाही, लंडनला आहे. इथे सकाळचे ११. ३० वाजलेत. तुमच्याकडे साधारण चार वाजले असतील बघा”, संजयचं स्पष्टीकरण.
“अरे हो की. बरं बोल, आणि फोन केलास तर जरा थोड्या वेळाने तरी करायचास. तुला माहिती आहे ना की आई रोज तीन ते पाचमध्ये पेटीच्या क्लासला आणि मग भजनाला जाते ते. उगाच डबल डबल फोन कशाला करता? पैसे वाया जातात”…
आबांचा टिपिकल मध्यमवर्गीय कोकणस्थीपणा मध्येमध्ये उचल खायचा. ब्याऐंशी वर्षांच्या आबांना खरंतर पैशाची काही ददात नव्हती. वडिलोपार्जित घराच्या जागी आता एव्हाना मोठी बिल्डिंग झाली होती. त्यात पूर्ण मजलाभर प्रशस्त फ्लॅट त्यांच्याच नावावर होता. त्यातही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यामुळे चांगलं भरभक्कम पेन्शन होतं. पण हे सगळं ज्यांनी उपभोगायचं ती त्यांची मुलं देशाबाहेर. धाकटा कनिष्क कुटुंबासहित ऑस्ट्रेलियात आणि संजय बायको-मुलांसहीत लंडनला. एवढा मोठा फ्लॅट अंगावर यायचा. कधी कधी ते जुनं घरंच बरं वाटायचं. निदान तिथे आजूबाजूला बोलायला भाडेकरू तरी होते. नाही म्हटलं तरी वर्दळ असायची. अगदी कुणाकडेही पाहुणे आले तरी ओटीवर एकत्र बसून गप्पागोष्टी होत. आता त्यातलं काही राहिलं नाही. भाडेकरूंनाही स्वतःचे फ्लॅट मिळाल्यामुळे त्यांच्या घरांची दारं पण आताशा बंद राहू लागली होती…
“आबा, अहो पैशांचं काय घेऊन बसलात? आणि मी तुमचीच चौकशी करायला फोन केलाय. कशी तब्येत आहे?”, संजयने विचारलं.
“मला काय धाड भरली आहे? मी ठणठणीत. रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जातो. मालतीच्या प्रकृतीची जरा कुरकुर चालू असते. पण ऐकणार कोण नव-याचं? फिरायला चल म्हंटलं तर येत नाही. जाऊ दे, चालायचंच. बरं तू कधी येतो आहेस?”, आबांचा प्रश्न.
“आबा, अहो आत्ताच सहा महिन्यांपूर्वी नाही का येऊन गेलो? विसरलात? आता लगेच सुट्टी नाही मिळायची”, संजयचं उत्तर.
“बरं, बरं. बघा जमलं तर यायला. कनिष्कलाही दोन वर्षं झाली येऊन. मालती फार आठवण काढते त्याची… “, आबांचा स्वर जडावला होता. “बरं, संजया, बेल वाजते आहे. तू मालती आली की फोन कर रात्री. ठेवतो आत्ता फोन”,
आबांनी घाईघाईत निरोप घेतला आणि दार उघडायला उठले. की-होल मधून त्यांनी पाहिले, मधुकररावांचा नातू अक्षय दार वाजवत होता. मधुकरराव हे पूर्वीच्या भाडेकरूंपैकीच, आता कुटुंबासह वरच्या मजल्यावर रहायला गेले होते. त्यांचा मुलगा, अक्षयचे वडील इन्शुरन्स कंपनीत होते. आबांनी दार उघडलं… “बोला अक्षयकुमार! आज आमची आठवण कशी काय आली?”, आबांनी हसत हसत विचारलं.
“काही नाही, मालती आजींच्या काही एफ. डी. मॅच्युअर होताहेत, तर बाबांनी त्याची आणि इन्शुरन्सच्या कामाची कागदपत्रं.. “, त्याचं वाक्य अर्धवट ऐकतच आबा वळून आत गेले. त्याला घरात जाणं भाग होतं आता. जराश्या नाखुषीनंच तो आत शिरला.
“अरे ये ये. जरा बसून बोल. दारात उभं राहून बोलणं आवडत नाही मला”, आबांनी त्याला जरा बळंच बसायला लावलं होतं. तो परत काही बोलणार इतक्यात आबाच म्हणाले, “बरं अक्षयकुमार तू चहा घेणार का ? मालतीआजी आता येईलच थोड्या वेळात. आमच्यासाठी करणारच आहे, तू घेणार असशील तर तुझ्यासाठी पण टाकतो. थांबच ! माझ्या हातचा चहा पिऊनच जा कसा?”, अक्षयला जराही बोलण्याची संधी न देता आबा चहा करायला उठले.
अक्षयचा नाईलाज झाला. काही न बोलता तो टेबलाजवळ खुर्ची ओढून बसला. अक्षय इंजिनिअरींगच्या तिस-या वर्षाला होता. गेले काही दिवस तो जरा अस्वस्थ होता. त्याचा आणि मयुरीचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. अक्षय फार दुखावला होता त्यामुळे. या सेमिस्टरची परिक्षा पण त्याने दिली नव्हती. राहून राहून त्याला मयुरीची आठवण यायची की मग तो असा घुम्यासारखा वागायचा.
“अक्षयकुमार, अहो कसल्या विचारात गढला आहात? होईल सर्व ठीक. प्रेमभंगाचा विचार जितका जास्त कराल तितकं दुःख जास्ती होतं”, आबा बोलून गेले.
‘आयला, म्हातारा बेरकी आहे. एरवी या म्हाता-याला काल काय घडलं आठवत नाही.. माझं प्रेमप्रकरण बरं लक्षात राहिलं’.. अक्षय या विचाराने सटपटला. “नाही आबा, तसं काही नाही. मी ठीक आहे”, अक्षयने मनातले विचार लपवत म्हंटले.
आबा धूर्तपणे हसले. “कसं आहे ना अक्षय की काही काही गोष्टी माझ्या नेमक्या स्मरणात राहतात. आणि मी तिला पाहिलंय तुझ्याबरोबर अनेक वेळा. अरे आमचा पेन्शनर कट्टयाचा मार्ग तुमच्या त्या अड्डयावरूनच तर पुढे जातो. प्रेमात पडलेले सगळेजण मांजरासारखे असतात बघ. डोळे मिटून दूध पिणारे. त्यांना वाटतं त्यांना कुणी बघतच नाही”, आबा बोलत होते. अक्षयला तिथून कधी एकदा सुटतोय असं झालं होतं. “आणि बरं का अक्षयराव, प्रेमात असं हरायचं नसतं. एकदा फेल झालं तर परत परत प्रयत्न करायचा. आणि त्यातून प्रेभभंग झालाच तरी त्यापायी आपलं आयुष्य वाया नसतं घालवायचं”, आबा समजावणीच्या सुरात म्हणाले.
खूप दिवसांनी अक्षयशी बोलताना कुणीतरी थेट विषयाला हात घातला होता. त्याला न ओरडता, आकांडतांडव न करता कुणीतरी मित्रासारखं त्याच्याशी बोलत होतं. आबांनी त्याच्या समोर चहाचा कप ठेवला. “अरे कधी कधी काही वाईट गोष्टी घडतात ना आपल्या आयुष्यात त्या तेव्हा जरी क्लेशकारक वाटल्या तरी पुढे जाऊन अनेकवेळा फायदेशीर ठरल्याचा अनुभव येतो. तुझा बाप एवढा इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटमधला, तुझ्याशी काही बोलत नाही वाटतं?”, आबांनी जरा खोचकपणे विचारलं.
अक्षय गडबडला या प्रश्नाने. “म्हणजे? मला समजलं नाही आबा”, अक्षय.
“अरे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट नेहमी अशा माणसांत आणि नात्यांत करावी जी पुढे जाऊन तुमचा इन्शुरन्स बनतील. अशी माणसं आणि नाती काय उपयोगाची की जी मॅच्युरिटीच्या आधीच भांडवल काढून घेतील? मान्य की माणसांची पारख एकदम नाही करता येत. पण म्हणून सहा महिन्यांचं प्रेम सर्वस्व मानून त्यापायी आपल्या आयुष्याची, जवळच्या लोकांची आणि मुख्य म्हणजे करिअरची फरफट करायची नसते. आयुष्य हे या चहासारखं आहे बघ ! अति गोड कराल तरी बेचव, अगोड तरी बेचवच ! चहावरून आठवलं, रिटायर झाल्यादिवशीच मी सांगितलं मालतीला की आता सकाळ, संध्याकाळचा चहा मी करणार. गेली जवळपास चोवीस वर्षं हा नेम मोडला नाहीये, आहेस कुठे? आता मालती येत असेल. आली की लगेच गरमागरम चाय समोर हजर! बरं ते तू कागदपत्रांचं काय बाबा म्हणत होतास? गप्पा झाल्या, चहा झाला तरी मुख्य काम विसरायला नको”, आबा हसत हसत म्हणाले.
चहाचा कप ठेवत अक्षय उठला. “आबा, खूप दिवसांनी कुणीतरी छान बोललंय माझ्याशी. थँक यू! मी लक्षात ठेवीन तुमचा सल्ला… इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स… माणसं… नाती… आणि हो कागदपत्रांचं बाबा संजय दादाशी बोलतील नंतर. आता येतो”, म्हणून अक्षय उठला आणि दाराबाहेर पडला.
…. मालती आजी सहा महिन्यांपूर्वीच वारली, ती कधीच परत येणार नाही हे फिरून आबांना सांगावं वाटलं त्याला. ज्या आभासी, कल्पित जगाच्या भिंती त्यांनी उभ्या केल्या होत्या, त्या पाडून त्यातून त्यांना बाहेर काढावं असं देखील वाटून गेलं क्षणभर… पण पुढच्याच क्षणी विचार आला की सहा-आठ महिन्यांच्या अफेअरचं ब्रेकअप झालं तर एवढा त्रास होतोय आपल्याला… साठ वर्षांचं सहजीवन जिथे अचानक संपलं तो धक्का पचवायला वेळ लागेलच ना… आपल्या पाठीमागे दरवाजा ओढून अक्षय निघून गेला, एक नवी उमेद घेऊन!
की-होल मधून अक्षयला गेलेलं पाहून आबा मागे वळले…
बेडरूममध्ये जाऊन उशीखालचा मालती आजींचा फोटो समोर ठेवला आणि स्वतःशीच बोलू लागले, “मालती… आपली इन्व्हेस्टमेंट चुकली का गं पोरांमधली ? पैशाचा इन्शुरन्स नको आहे या वयात… माणसांचा हवाय… आपल्याशी बोलणारी माणसं, आपली विचारपूस करणारी माणसं, प्रत्यक्षात भेटून काय हवं नको विचारणारी माणसं… लोकांना वाटतं म्हातारा वेडा झालायं… बायकोच्या जाण्याचा धक्का सहन न होऊन ती आहे असं मानून जगतोय… जाता येता एकटाच बडबड करतोय… पण तसं करतो म्हणून तरी चार लोक चौकशी करतात. बाप विसरभोळा झालायं… न जाणो, उद्या पोरं आहेत हेच विसरला तर इस्टेटीमध्ये वाटा मिळणार नाही या भावनेतून का होईना रोज फोन करून चौकशी करतात. असो, त्यांना काय कळणार म्हणा या वयात एकटं पडण्याचं दुःख? चल, मी चहा ओततो… आज गॅलरीत झोपाळ्यावर बसून सूर्यास्त पाहत चहा पिऊ…
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈