श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ तुम्ही म्हणाल तसं… – भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
गंगाधर पदवीधर झाले. मूळ गावापासून दूर, जिल्ह्याच्या सरकारी कचेरीत कारकून म्हणून रुजू झाले.
मुळात गंगाधर यांचं बालपण कडक शिस्तीत गेलं होतं. त्यांचे वडील म्हणजे जमदग्नीचा अवतारच होते. नोकरीचं निमित्त झालं आणि एका अर्थाने गंगाधर वडिलांच्या दडपणातून मुक्त झाले. यथावकाश लग्न उरकलं. पत्नी म्हणून सुस्वरूप, संस्कारी सुलोचना लाभली. राजाराणीचा संसार होता. गंगाधर ‘सुलु, सुलु’ करत तिच्या मागे मागे असायचे. तिच्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही. हे जरी खरं असलं तरी पित्याकडून मिळालेला एकमेव वारसा, ‘एकाधिकारशाही’ ते कसे विसरणार? त्यांच्या शब्दाला नाही म्हटलेलं त्यांना अजिबात खपायचं नाही.
सुलोचना मात्र एकत्र कुटुंबातील आणि चारचौघात वावरलेली व्यवहारी कन्या होती. तिने गंगाधरांच्या कलानेच घ्यायचं असं ठरवलं. गंगाधराच्या प्रत्येक निर्णयाला ‘पंत, तुम्ही म्हणाल तसं.. ’ ह्या नमनानेच ती सुरुवात करायची. ‘पंत’ म्हटलं की गंगाधर खुलून जायचे. त्यानंतर, ‘पण मी काय म्हणते.. ’ असं म्हणत ती त्यावरचे पर्याय सुचवायची. विविध फायदे सांगून झाल्यावर तिचं शेवटचं पालुपद असायचं, ‘पंत, मी फक्त सुचवायचं काम केलं. माझा आग्रह नाही. अर्थात अंतिम निर्णय तुमचाच. ’ ही मात्रा लागू पडली.
घरातल्या कुकरपासून फ्रीजपर्यंत सगळ्याच वस्तु सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घेतल्या गेल्या. एवढंच काय, तर मुलांच्या अॅडमिशन कुठल्या शाळेत घ्यायच्या, इथपर्यंतचे सगळे निर्णय कसलाही वादविवाद न होता सुलोचनेच्या मनाप्रमाणेच घडत गेले. सुलोचनेची ही शिताफी मात्र गंगाधरांच्या कधीच लक्षात आली नाही.
गंगाधरपंतांना सदासर्वदा साहेबांच्या समोर मान खाली घालून ‘हांजी हांजी’ करत निमूटपणे सगळं ऐकावं लागायचं. त्यामुळे कचेरीत दाबून ठेवलेले मानापमानाचे कढ घरातल्या लोकांच्या समोर उफाळून यायचे.
मुलं मोठं होत गेली तसं त्यांना गंगाधरपंतांचे वागणं खटकत राहायचं. सुलोचना मात्र वडील आणि मुलांच्यामधे एक सुंदर दुवा बनून राहिली. त्या नात्यांत कुठलीच कटुता येऊ नये म्हणून ती काळजी घेत राहिली. ‘हे बघा, बाबा तुम्हाला रागावत असतील, पण तुमच्याविषयी त्यांना खूप कौतुक आहे. प्रसंगी ते स्वत:कडे दुर्लक्ष करतात, पण सदैव तुमच्या भवितव्याचा विचार करत असतात. तुम्हाला ते कधी काही कमी पडू देत नाहीत ना? मग जास्त विचार करू नका. तुम्ही फक्त अभ्यासात लक्ष घाला. ’ असं ती मुलांना सांगत राहायची.
अधूनमधून ती गंगाधरपंताना ऐकू जाईल असं पुटपुटायची, ‘माझं नशीबच थोर म्हणायचं बाई. मुलं ह्यांच्या बुद्धिमत्तेवर गेली म्हणून बरं आहे. उत्तम गुणांनी तर उत्तीर्ण होताहेत. माझ्यावर गेली असती तर… ह्यांनी काय केलं असतं, ते देवच जाणे!’ हे ऐकल्यावर, पंतांचा मुलांवरचा राग थंड व्हायचा.
गंगाधरपंत असंच एकदा मूडमध्ये असताना म्हणाले, ‘बरं का, सुलु. माझे सगळेच मित्र एकजात जोरू के गुलाम आहेत साले. मी त्यांना सांगतो, लेको माझी बायको सुलोचनेकडे बघा. ती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. मी सांगेल त्याला ‘तुम्ही म्हणाल तसं’ म्हणत असते. ’ त्यावेळी सुलोचना गालातल्या गालात हसली. तिला पंतांचा भ्रमाचा भोपळा फोडायचा नव्हता.
बघता बघता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. लेक सुचेता लग्न होऊन सासरी गेली. दिल्या घरी सुखी होती. कारण सुचेताचे सासू सासरे गाव सोडून शहरात यायला अजिबात तयार नव्हते. तीच त्या घरची राणी होती.
यथावकाश मुलगा अमेय उत्कृष्ट गुणांनी इंजिनियर झाला. चांगली नोकरी मिळाली. लवकरच कंपनीतल्या एका स्वरूप सुंदर मुलीशी विवाहाचा त्यांने प्रस्ताव मांडला. त्या स्थळात जागा ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. लग्न यथासांग पार पडले.
त्याच महिन्याभरात गंगाधरपंत हेडक्लार्क म्हणून सेवानिवृत्त झाले.
साहजिकच सुलोचनेचं लक्ष गंगाधरपंतावरून अमेय आणि सून मानसीकडे केंद्रित झालं. ती सकाळी त्यांच्यासाठी न्याहरीच्या तयारीत असायची. अमेय आणि मानसी दुपारचं जेवण कंपनीच्या कॅन्टिनमधेच घेत असत. सदैव केंद्रस्थानी असलेल्या गंगाधरपंताना आपल्याकडे उपेक्षा होत असल्याच जाणवत होतं.
एके दिवशी गंगाधरपंत कुठल्यातरी कारणावरून अमेयला आणि सुलोचनेला डाफरत होते, तेव्हा मानसीने त्या दोघांची बाजू घेऊन त्यांना तिथंच गप्प केलं. गंगाधरपंत संध्याकाळी नुकतेच फिरून येऊन कोचवर बसले. आजूबाजूला कुणीही नसल्याचं पाहून, मानसी त्यांना चहाचा कप देत म्हणाली, “बाबा, सकाळी मी जे काही बोलले होते त्याबद्दल मला माफ करा. ” हे ऐकताच गंगाधरपंतांचा राग निवळला.
मानसी लगेच पुढे म्हणाली, “बाबा, खरं तर त्यात तुमची काहीच चूक नाही. खरी चूक सासूबाईंची आहे. मुळात तुमच्या एकाधिकारशाहीला आणि एककल्ली प्रवृत्तीला त्याच जबाबदार आहेत. तुमच्या प्रत्येक गोष्टीला ‘तुम्ही म्हणाल तसं.. ’ असं म्हणत त्या तुमच्या अहंकाराला वारा घालत गेल्या. त्यामुळे कधीकाळी या घरात वादळ उठेल ह्याची त्यांना कल्पनाही नसावी. सासूबाईंनी इतकी वर्ष तुम्हाला खपवून घेतलं असेल. जर काहीही चूक नसताना, तुम्ही कुणाला काही बोललात तर मी ते खपवून घेणार नाही. आताच सांगून ठेवते, तुम्ही सुखात राहा, आम्हालाही सुखाने राहू द्या. “
सुनेचं असं अनपेक्षित बोलणं ऐकून गंगाधरपंत क्षणभर चक्रावून गेले. त्यांच्या तोंडातून एक ब्र शब्दही फुटला नाही. गार झालेला चहा त्यांनी तसाच घशात ओतला. दाराआडून संभाषण ऐकत उभ्या असलेल्या सुलोचनेला मनस्वी आनंद झाला. गंगाधरपंत खोलीत यायच्या आतच ती कपाळाला बाम चोळून झोपेचं सोंग घेत बेडवर जाऊन पडली.
गंगाधरपंत बेडरूममधे आले. आजवर दिवेलागणीच्या वेळी कधी सुलोचना झोपल्याचं त्यांना आठवत नव्हतं. त्यांनी हळूवारपणे तिच्या कपाळाला हात लावला आणि बराच वेळ तिथल्या खुर्चीत विचार करत बसून राहिले. ‘माझ्यासारख्या एककल्ली माणसाला सुलोचनेनं इतकी वर्षे कसं सहन केलं असेल? स्वत:चं मन मारून ‘तुम्ही म्हणाल तसं’, असं म्हणत, दुसरं कुणी माझ्याशी संसार केला असता का? कसल्याही गोष्टीचा त्रागा नाही. आदळआपट नाही. या उलट ती मला समजून घेत शांत करत आलीय. मुलांच्यावर संस्कार करण्याचं काम आणि त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण धुरा तिनं एकटीने सांभाळली आहे. ती नसती तर.. ?’
– क्रमशः भाग पहिला
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈