प्रा. भरत खैरकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ डेट्स… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
रात्री साडेबाराच्या सुमारास, एक खोली अंधाराने भरलेली.. टेबलावर चहा आणि काही टिशू पेपर.. त्यावर लिहिलेली स्क्रिप्ट ..पसरलेली होती. दिग्दर्शक शशांक त्या खोलीत एकटा बसलेला होता. त्याला माहित होतं की, त्याच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला शेवटचा स्पर्श देणारा अभिनेता आर्यन, साडेबाराच्या सुमारास येणार आहे .त्याच्या मनात अनेक विचार होते. शशांकने ती स्क्रिप्ट पुन्हा एकदा वाचली, त्यातील प्रत्येक ओळ व संवाद त्याच्या मनावर ठसलेला.. ठरलेला.. होता.
आर्यन येण्याआधी, शशांकच्या मनात विचारांचं वादळ माजलं होतं. त्याचे बालपण आणि संघर्ष त्याला चांगल्या प्रकारे माहित होता. त्याची शाळा मिल मजुरांच्या वस्तीमध्ये असलेल्या चाळीमध्ये होती. शशांक अजूनही त्या श्रमिकांच्या जगातच त्याचे जीवन घालायचा .. त्याचा श्रमिकांप्रतीचा जिव्हाळा बालपणापासून तसाच आताही कायम होता.त्याच आठवणी त्याला परत परत येत होत्या.
तो विचार करत होता, स्क्रिप्ट मधील हाच तो मॉल आहे, जिथे एकेकाळी आपल्या जीवनातील अनमोल क्षण आपण इथे घालवले. पण आता, या मॉलमध्ये आल्यावर आपल्याला कब्रस्तानात आलोय असं वाटतं. ही जागा आपल्यासाठी आणि आपल्या कलेसाठी स्मशान आहे.. कारण हा मॉल गिरणी कामगारांच्या चाळींवर बुलडोजर चालवून बांधलेला आहे.. त्याची कहाणी जगासमोर आलीच पाहिजे.. असं त्याला वाटायचं..
मुंबईचा एक प्रसिद्ध अभिनेता, आर्यन, आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला होता. त्याच्या नावावर अनेक हिट चित्रपट होते. त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा अनेक दिग्दर्शकाची होती. परंतु, आर्यनच्या यशाच्या मागे एक मोठा संघर्ष होता तो म्हणजे त्याच्या डेट्स ! त्याचे वेळापत्रक !!
आर्यनचा मॅनेजर होता समीर ! तो नेहमीच त्याच्याकडून खूप कष्ट करवून घेत होता.
“आर्यन सरांकडून .. आपल्याकडून एक हिट चित्रपट मिळवायचा आहे. त्यासाठी आपल्याला डेट्स लागतील,” अशी विचारणा दिग्दर्शक शशांकने समीर कडे केली..
” तुम्हांला तर माहित आहे ना, आर्यनसर खूप व्यस्त असतात.एक महिन्यापेक्षा जास्त पुढच्या डेट्स मी देऊ शकत नाही,” समीर उत्तरला.
तरीही आर्यनच्या वेळापत्रकाचा अभ्यास व विचार केला तर, त्याला एखादा दिवस ह्याच महिन्यात उपलब्ध होता ..तोही दोन आठवड्यांनंतर. शशांक आणि समीर यांच्यात चर्चा झाली. तरी पण शशांकने आर्यनच्या डेट्स मिळवायला काहीतरी वेगळे करावे, म्हणजे दुसऱ्या एका अभिनेत्याशी संपर्क करावा.” असे समीरने शशांकला सुचविले.
शशांकने आपल्या शोधात दुसऱ्या एका अभिनेत्याला आदित्यला संपर्क केला. आदित्य, जो एक उत्तम कलाकार होता, त्याला नुकताच ‘राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार मिळाला होता.पण आर्यनच्या ‘पंढरी’च्या यशापेक्षा त्याला कमी प्रसिद्धी मिळाली होती. त्याच्याकडे डेट्स होत्या.तो लगेचच शूटिंगसाठीही तयार होता.
आदित्यला भेटल्यानंतर शशांकने त्याला सांगितले, “तुझ्या माध्यमातून, आम्ही आर्यनला एका दिवसात शूटिंग पूर्ण करायला सांगू.”
आदित्य ज्याला अधिक प्रसिद्धीची आवश्यकता होती, त्याने त्वरित होकार भरला. एका दिवसात शूटिंग पूर्ण होईल, अशा आशेने आदित्यने दिलेल्या डेट्सवर काम सुरू झाले. आर्यनचा मॅनेजर समीर आणि दिग्दर्शक शशांक यांना मात्र एका गोष्टीचा अंदाज आला नाही की आदित्यला त्या एका दिवसाच्या शूटिंगनंतर डबिंगसाठी वेळ नाही !
“डबिंग कॅन्सल करा,” आदित्यने एक दिवस फोन करून सांगितलं. शशांक आणि समीर दोघेही आश्चर्यचकित झाले. दिग्दर्शक शशांकला असं वाटायला लागलं होतं की त्याच्या कामामुळे.. नावामुळे.. एक मोठा निर्णय घेतला होता, पण आता त्याच्या कलेला कमी महत्त्व मिळतं की काय असं वाटून तो नाराज होता..तसा तो आदित्यच्या कामावर समाधानी नव्हता.आणि आर्यनच्या कामाचं ..डेट्सच त्याला सन्मानपूर्वक नियोजन करायचं होतं.
दरम्यान आर्यन समीरला सांगतो, “आता मी त्या चित्रपटाच्या डेट्सचा विचार करतोय. पण माझ्या इतर कामामुळे मला आणखी काही वेळाची गरज आहे.” तात्काळ निर्णय घेणं शशांक आणि समीरसाठी आवश्यक होतं.
चित्रपटाला हिट होण्यासाठी .. करण्यासाठी..कधी कधी मेहनत, समजूतदारपणा आणि योग्य निर्णयांची आवश्यकता असते. डेट्स आणि वेळांच्या धकाधकीत, सिनेमा आणि कलाकारांची मेहनत हरवून जाते, पण त्यात कलेचा आदर व सन्मान हाही सांभाळला पाहिजे.. वर्क स्पिरिट नेहमीच टिकून राहिलं पाहिजे.
शूटिंगच्या आधी आर्यन मॉलमध्ये फिरून आला. त्याने.. दिग्दर्शकाच्या नजरेतून मॉल खाली दडलेलं स्मशान बघितलं.. त्यातून येणाऱ्या गोरगरिबांचे आवाज ऐकले.. आणि ते सर्व आपल्या अभिनयातून … मिळालेल्या स्क्रिप्ट मधून कसं उभं करता येईल याचा विचार करत शशांककडे तो आपल्या मर्सिडीज मधून निघाला होता.
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈