श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ भिडू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
जोमात फार आहे बाजार भामट्यांचा
सौदे करून खोटे आयुष्य लाटण्याचा
*
कोणी तरी म्हणाले वाटा चुकू नका रे
चकवा बसेल बरका गोत्यात गुंतण्याचा
*
अंधार सांडणारी काळोख रात आहे
होईल खेळ चालू चंद्रास झाकण्याचा
*
दाटून मळभ आले वारा सुसाट झाला
अंदाज आज आहे आभाळ फाटण्याचा
*
स्वप्ने विकावयाला आल्या अनेक टोळ्या
त्यांचा विचार नाही जनता सुधारण्याचा
*
स्वातंत्र्य भोगण्याचे अधिकार द्या जरासे
हळवा पुकार आहे भाऊक चांदण्यांचा
*
सामान्य माणसेही होवून दंग गेली
ऐकून रोज खोटा वर्षाव देणग्यांचा
*
डोळे मिटून बोका खातोय दूध लोणी
शोधू उपाय त्याला जाळ्यात बांधण्याचा
*
एकी करून आता साधेच डाव खेळू
खोट्या भिडूस येथे शोधून काढण्याचा
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈