श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची ” – लेखिका: सुश्री संगीता पी मेनन मल्हन – अनुवाद : श्री प्रा. संजय विष्णू तांबट ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : कहाणी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ ची
लेखिका: संगीता पी मेनन मल्हन
अनुवाद: प्रा. संजय विष्णू तांबट
पृष्ठे: ३१०
मूल्य: ३५०₹
एका सामान्य वृत्तपत्रापासून एका नामांकित वृत्तपत्रापर्यंतचा प्रवास. प्रत्येक उद्योजकाने नक्की वाचावे असे सुंदर पुस्तक. ब्रँड कसा बनतो? व्यवसाय म्हणजे नक्की काय? निर्णय कसे घ्यावेत? कल्पना, संकल्पना कशा राबवाव्यात? अशा नाना प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतील.
समीर जैन यांच्या नेतृत्वाखाली टाईम्स घेतलेली भरारी थक्क करते. आज टाईम्स ग्रुप देशातीलच नव्हे तर जगातील आघाडीच्या वृत्तपत्र समूहात गणला जातोय तो जैन यांच्या नेतृत्वकौशल्यामुळे, व्यवसायिक दृष्टिकोनामुळे…
लेखिका संगीता पी. मेनन मल्हन यांनी अतिशय छान शब्दात टाईमस ची कहाणी चितारली आहे. पुस्तकातील एक एक टप्पे पार करताना टाईम्स बद्दल तुमच्या मनात आदर निर्माण होतोच. एका भव्य ब्रँड चा प्रवास प्रत्येकाने अनुभवावा असाच आहे
भारतातील वृत्तपत्र व्यवसाय अनेक वर्षे अलिखित; पण काहीशा कठोर, साचेबद्ध नियमांनी बांधलेला होता. एकोणिसशे ऐंशीच्या दशकात हे चित्र बदलले. टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्स आणि इतर प्रकाशनांची मालकी असलेल्या बेनेट, कोलमन आणि कंपनीने (बीसीसीएल) या उद्योगाचे नियमच जणू नव्याने लिहिण्यास प्रारंभ केला. मग ते नियम वृत्तपत्राच्या किमतीसंबंधीचे असतील, किंवा जाहिरात आणि संपादकीय स्वातंत्र्याबद्दलचे ! त्यामुळे पुढच्या दोन दशकांत भारतातील वृत्तपत्र सृष्टीचा चेहरामोहराच बदलला.
टाइम्स ऑफ इंडिया च्या १९८५ मध्ये केवळ तीन आवृत्त्या होत्या आणि एकूण खप साधारण ५.६ लाख प्रती इतका होता. मात्र, मार्च २०१२ पर्यंत ते भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक खपाचे इंग्रजी दैनिक बनले. देशभरात १४ आवृत्त्या आणि ४५ लाखांवर खपाची मजल त्याने गाठली. या वृत्तपत्राने स्वतः वाढत असताना बातमीदारी, संपादकीय धोरण, विपणनाच्या नव्या पद्धती शोधल्या आणि माध्यम विश्वातील खेळाचे नियमच पालटले.
तरीही, भारतातील माध्यम व्यवसायाचे रंगरूप पालटणाऱ्या टाइम्स समूहाविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. टाइम्स ऑफ इंडियात काही काळ पत्रकारिता केलेल्या संगीता मल्हन यांनी ही उणीव दूर केली आहे. या वृत्तपत्राचे स्वरूप बदलण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली, अशा काही पत्रकार आणि कॉर्पोरेट नेत्यांच्या मुलाखतींनी या लेखनाची सुरुवात झाली. त्यात जाणवलेल्या व्यक्ती व्यक्तींमधल्या अहंभावाच्या लढाया, भूमिका-दृष्टिकोनांमधील फरक, बदलत गेलेला व्यवसायाचा चेहरा यांच्या मेळातून एक रंजक कथा पुढे आली. ही कहाणी माध्यम क्षेत्राशी संबंधितांनी तर वाचलीच पाहिजे; पण बातमी कशी घडते, कशी रिचवली जाते यात रस असलेल्या इतर सर्वांसाठीही ती नवे भान देणारी ठरू शकते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈