सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
आपली मुलं आपली नसतात. एकनाथांचं वचन आहे, ‘पक्षी अंगणात आले, अपुला चारा चरून गेले. ’ हा जगाचा नियम आहे. पैशाचं परावलंबित्व नको, तसं भावनांचं परावलंबित्व असता कामा नये’… स्वातीताईंनी उमाकांतना जगण्याचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि आयुष्य नव्याने जगायला ते बाहेर पडले..
कॅलेंडरचं पान उलटताना उमाकांत विशेष आनंदात होते, चंद्रनील जर्मनीहून येण्यासाठी आता फक्त पंधरा दिवस राहिले होते. लगबगीनं त्यांनी, संगणकावर त्याचा मेल आहे का पाहिलं आणि त्यांनी खूश होऊन स्वातीताईंना हाक मारली.
‘‘लौकर ये, आपला चंदा चार दिवसांतच येतो आहे. हा मेल पाहा! घरातले पडदे उद्याच बदलून टाक, घरासाठी कार्पेटची देखील ऑर्डर दिली आहे. आज चौकशी करायलाच पाहिजे आणि पुरणपोळीची ऑर्डर देणार आहेस ना… ?’’
आपल्या नवऱ्याचा उत्साह पाहून ताईंना गंमत वाटली. त्यांच्या मनात आलं, ‘‘परदेशातील समृद्धी, मोठी जागा, चैन सोडून चंदा कायम इथे येणं शक्य नाही. यांना मनोराज्य करू दे. आपलं काय जातं? परवा मालूताई सांगत होत्या, समृद्धी आली की मुलांना आई-वडिलांजवळ राहायला आवडत नाही. मुलींनादेखील माहेरची ओढ वाटत नाही.
मुलगा दोन दिवस येणार, त्यासाठी एवढा खर्च कशासाठी?’’
‘‘कार्पेट कशासाठी? उगीच नस्ता खर्च नको. दोन दिवस पाहुण्यासारखा तो बायको-मुलाला आणणार.
माझी कामं वाढवू नका. तो परत गेल्यावर तुम्ही कार्पेट साफ करणार का? ‘‘अगं! तो आता इथेच राहील ना? त्यानं सांगितलं होतं की, हे तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट झालं की तो पुन्हा जाणार नाही. त्यानं पाठवलेले सर्व पैसे मी ठिकठिकाणी गुंतवले. व्याजासकट चांगली रक्कम हातात आली की तो त्याचा व्यवसाय सुरू करील. माझी खात्री आहे, तू नसत्या शंका काढू नको. ’’
ताई हसून म्हणाल्या, ‘‘ती घरावरची कविता ठाऊक आहे ना?
घरातून उडून गेलेल्या पिलांना, घरच्या उंबरठय़ाची ओढ असावी,
एवढंच माझं मागणं आहे. ठीक आहे, परदेशात असतानाही आई-वडिलांना पाहावं, एवढं तरी त्याला वाटत आहे, हे काय कमी आहे?’’
ताईंचं हे बोलणं उमाकांत यांना फारसं आवडलं नाही. ‘निळ्याभोर आकाशात जसा चंद्र, तसा आपल्या घरात हा बाळ. म्हणून त्याचं नाव चंद्रनील. मित्रांमध्ये मात्र त्यानं आपलं नाव नील सांगितलं. चंदा नाव काय वाईट आहे? मेलही नील नावानं करतो, जाऊ दे नावात काय आहे म्हणा. ’ उमाकांत स्वत:शीच म्हणाले.
मुलगा येण्याचा दिवस जसा जवळ येऊ लागला, तशी मात्र स्वातीताईंची धांदल सुरू झाली. चकल्यांची भाजणी दळायला दिली होती. भडंग, चुरमुऱ्याचा चिवडा झाला होता, पण शंकरपाळे राहिले होते. ते आज झाले असते. चकल्या गरम चांगल्या लागतील. तेव्हा तो आल्यावर चकल्या करू. शिवाय पुरणपोळीची ऑर्डर देण्यापेक्षा घरीच कराव्यात. बाहेरच्या पोळीत वेलची-जायफळ फार कमी असतं. मैदा जास्त असतो, नकोच ते. काय करू न काय नको असं त्यांना झालं होतं.
ताईंनी चण्याची डाळ भिजत घातली, साजूक तूप कढवलं. आणखी काय करता येईल याचा विचार करू लागल्या. चार खोल्यांचं घर उत्साहानं भरून गेलं. घराच्या भिंतीदेखील सजीव झाल्यासारख्या वाटू लागल्या. भिंतीवर उमाकांत यांनी सुंदर निसर्गचित्रं लावली होती. हिरव्यागार झाडांच्या आडून इवली पांढरी फुलं मन प्रसन्न करीत होती. नुसती निसर्गचित्रंदेखील मनाला प्रसन्नता देतात.
हा अनुभव ताईंना वेगळाच वाटत होता की चंद्या येणार म्हणून ती चित्रं अधिक सुंदर वाटत होती? त्यांचं त्यांना कळत नव्हतं. मन मात्र प्रफुल्लित झालं होतं.
चंद्रनील येण्याच्या आदल्या दिवशी उमाकांत शांत झोपूच शकले नाहीत. पहाटे चार वाजता, खासगी गाडी करून एअरपोर्टवर आले. चंदाला पाहून त्याला घट्ट मिठी मारली. आनंदात सून, मुलगा, नातू घरी आले. दोन दिवस धमाल चालली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी निवांत चहा घेताना चंदानं आपलं प्रोजेक्ट अजून तीन र्वष चालू राहणार आहे हे जाहीर केलं. त्या वेळी उमाकांत आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवू शकले नाहीत. ताई मात्र हे असंच होणार हे जाणून होत्या. त्यामुळे त्यांना फारसं दु:खं झालं नाही.
आल्या आल्या सून आणि नातू सुनेच्या माहेरी गेले. त्यामुळे घरात आता हे तिघेच होते.
‘‘चंदा, आला आहेस तर इथेच चांगली नोकरी पाहा. स्वतंत्र राहायचे असेल तरी आमची हरकत नाही, ’’ उमाकांत म्हणाले.
‘‘बाबा, आपली चार खोल्यांची जागा असताना स्वतंत्र राहण्याचा विचार तरी मनात येईल का? परंतु पुढील तीन वर्षांत तरी नोकरी सोडता येणार नाही, तुम्ही पैशांची चिंता करू नका. मी दर महिन्याला पुरेसे पैसे पाठवीन, ’’ चंदा म्हणाला.
उमाकांत कपाटाजवळ गेले. बँकेचे पासबुक त्याच्या पुढय़ात ठेवून म्हणाले, ‘‘चंदा! तू आत्तापर्यंत पाठवलेले सर्व पैसे मी बँकेत जमा केले
आहेत. मला तुझे पैसे नकोत. मला तू भारतात यायला हवा आहेस. ’’
‘‘बाबा! प्लीज, या ट्रिपमध्ये मला खरंच जास्त राहता येत नाही. आणखी तीन वर्षांनी मी नक्की भारतात येईन. ’’ चंद्रनीलनं विषय संपवला आणि घाईघाईनं तो पत्नीच्या माहेरी गेला.
पाहता पाहता महिना कुठे निघून गेला ते समजलं नाही.
चंद्रनीलचा जाण्याचा दिवस उजाडला. या वेळी स्वातीताईंनी त्याला बरोबर देण्यासाठी कुठलेही जिन्नस तयार केले नाहीत. आपली बॅग भरताना काहीच तयारी नाही हे पाहून चंदाला राहवलं नाही.
‘‘आई! लसणीची, तिळाची चटणी, मेतकूट, भाजणी दे लौकर. सामानात कुठे ठेवायची ते पाहतो. फार जिन्नस देऊ नकोस. ’’
लेकाची हाक ऐकून किचनमधून ताई बाहेर आल्या. ‘‘चंदा! या वेळी तुझ्यासाठी काहीही करता आलं नाही रे. वेळच झाला नाही. असं कर, नाक्यावर आपटे गृहोद्योग दुकान आहे. तिथून तुला काय हवं ते आण.
चंद्रनीलला नवल वाटलं. आईला काय झालं? मागच्या ट्रिपला तिने केवढे पदार्थ दिले होते. आत्ता मी आल्या आल्यादेखील केवढे पदार्थ केले होते. हिला वेळ नसायला काय झालं? जास्त विचार न करता त्यानं बॅग बंद केली.
या वेळी निरोप देण्यासाठी रात्री झोपमोड करून एअरपोर्टवर जायचं नाही, असं ताईंनी आपल्या पतीला- उमाकांत यांना अगदी निक्षून सांगितलं. अगदी गोड बोलून दोघांनी मुलाला आणि सुनेला घरातूनच निरोप दिला.
दुसरा दिवस उजाडला त्या वेळी ताई वृत्तपत्रात काही तरी शोधत असल्याचं उमाकांत यांनी पाहिलं. ताई खुशीत कशा राहू शकतात, याचं उमाकांत यांना नवल वाटत होतं.
‘‘पुढच्या महिन्यात आपण युरोप टूरला जाणार आहोत. आधीच बुकिंगला उशीर झाला आहे. आजच पैसे भरून या. ही जाहिरात!’’ ताईंनी नवऱ्याला जाहिरात दाखवली. उमाकांत काही बोलले नाहीत. उदास चेहरा करून बसून राहिले आणि म्हणाले, ‘‘निदान एअरपोर्टवर तरी निरोप द्यायला गेलो असतो. घर अगदी रिकामं वाटत आहे. ’’
आता मात्र ताई थोडय़ा वैतागल्या. ‘‘तुम्हाला यायचं नसेल तर मी एकटी जाईन. संसाराच्या खस्ता खात जबाबदारी पेलताना थकून गेले. चंदा पहिल्यांदा जर्मनीला गेला त्या वेळी रोज रात्री त्याच्या आठवणीनं डोळ्यातल्या पाण्यानं उशी भिजून जायची. हळूहळू समजलं, प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये. आपली मुलं आपली नसतात.
एकनाथांचं वचन आहे-
“‘पक्षी अंगणात आले, अपुला चारा चरून गेले’.
हा जगाचा नियम आहे. मुलं, त्यांना गरज आहे तोपर्यंत आपल्या जवळ राहणार. नंतर पक्ष्यांप्रमाणे दूर उडून जाणार. हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे.’’
उमाकांत ताईंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. ताई बोलत होत्या, ‘‘पैशाचं परावलंबित्व नको म्हणून आपण काळजी घेतो. तसंच भावनांचं परावलंबित्व असता कामा नये. किती तरी दिवसांत मुक्त निसर्ग पाहिला नाही, तुम्ही कधी माझ्या कविता ऐकल्या नाहीत, संगीताचा आनंद घेतला नाही. उमाकांत ! प्रयत्नपूर्वक या ‘एम्टी नेस्ट सिन्ड्रोम’ मधून बाहेर या.’’
‘‘कसं बाहेर येऊ ? तूच सांग ना.. ’’ उमाकांत म्हणाले. ‘‘उमाकांत, मागच्या वेळी चंदा राहिला नाही. त्या वेळी मी माझ्या मनाची कशी समजूत घातली, ते मी ‘एकटी’ या कवितेत लिहिलं आहे. ऐकाल?’’
शून्यात पाहत उमाकांत यांनी होकार दिला.
ताई कविता वाचू लागल्या….
कळून चुकलंय तिला,
वयाची येताना साठी
आहे ती एकटी,
अगदीच ती एकटी
मुलंबाळं, प्रेमळ नवरा,
संसारही तो कसा साजिरा
प्रेमळ होती सगळी नाती,
तरीही ती एकटी
कष्टातही त्यात, होती मजा,
खुशीत होते राणी राजा
लुटुपुटीचा खेळ पसारा,
कळले हो शेवटी, आहे ती एकटी
सुंदर तेव्हा होती सृष्टी,
सुंदर जग ते अवती भवती
काळ कुठे तो निघून गेला,
आता वाटते भीती, आहे ती एकटी
कुणीतरी मग साद घातली,
तुझ्या आवडी कशा विसरली?
आठव संगीत अक्षर वाङ्मय,
कोण म्हणे तू एकटी?
मंजुळ गाणी पक्षी गाती,
आकाशी बघ रंग किती
बहर मनाला तुझ्या येऊ दे,
निसर्ग राणी तुझ्या संगती
जगन्नियंता निसर्गातुनी साथ तुला देईल
हाक मारूनी पहा गडे तू,
हात तुला देईल
तोच तुझ्या गे अवती भवती,
कशी मग तू एकटी?
वेडे, नाहीस तू एकटी..
कविता ऐकल्यावर उमाकांत आवेगाने उठले. ताईंचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘स्वाती,
युरोप टूरचं बुकिंग करायला तूही चल ना. येताना नवीन कपडे घेऊ. बाहेरच जेवण करू, कालच
चंदा गेला, दमली असशील. खूप केलंस महिनाभर त्यांच्यासाठी.’’
‘‘छे! मुळीच दमले नाही. माझं रिकामं घर मला किती ऊर्जा देऊन गेलं म्हणून सांगू? तुम्हाला आनंदात पाहून घराच्या भिंतीदेखील हसू लागल्या. बघा, आता चित्रातला नाही, तर खरा निसर्ग पाहायचा. ’’ आणि उत्साहानं ताई बाहेर जाण्यासाठी तयारी करू लागल्या.
☆☆☆☆☆
लेखक : अनामिक
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈