सुश्री शांभवी मंगेश जोशी
पुस्तकावर बोलू काही
☆ मोरपीस… – लेखक : प्रा. रमेश कोटस्थाने ☆ परिचय – सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
ज्येष्ठ लेखक, प्राचार्य रमेश कोटस्थाने यांचं ‘मोरपीस ‘हे पुस्तक हातात मिळालं. थोडसं चाळलं, वाचलं आणि मी गुंतत गेले. वाचतच राहिले. अलगद मनातून मोरपीस फिरावं असं काहीसं वाटत राहिलं. मुलायम तेवढीच मौलिक भाषा. सहज तेवढीच प्रभावी. भाषे मध्ये लालित्य तेवढाच मधाळ मिष्कील गोडवा. लिखाणात रंजकताही तेवढीच. ज्या ज्या लेखकांचे लिखाण वाचून, लिखाणाची प्रेरणा मिळाली, त्यांच्याबद्दल ऋणमोचन करण्यासाठी, हे पुस्तक लिहिलेलं आहे. हा सद्हेतूच फार हृद्य आहे. लेखकांची सरांशी कधीच भेट झाली नाही. तरी त्यांच्या शब्दांमधून अक्षर नाती जुळली. ती नाती पुन्हा उलगडून वाचकांच्या मनात लेखक जागते ठेवले आहेत. हा ही पुस्तक लिखाणाचा तेवढाच महान उद्देश.
बहिणाबाई पासून बर्नार्ड शॉ, पर्यंत आणि वि. आ. बुवांपासून वुड हाऊस पर्यंत. मराठी आणि इंग्रजी मधील थोर साहित्यिकांबद्दल लेख, मोरपीस या पुस्तकामध्ये कोटस्थाने सरांनी लिहिले आहेत. सार्यांच्या समग्र साहित्याचा लेखाजोखा एकाच लेखात मांडण्याचा आवाका अफाट आहे. मोठेच आव्हान आहे.
ते कुठेही बोजड, न वाटता, मोर पिसासारखे मुलायम, तेवढेच विविध रंगी चित्ताकर्षक झाले आहे. एकेक लेखा मागे केवढे अफाट वाचन आहे हे समजून आपण आवाक् होतो.
‘पुस्तक घेऊन भविष्यातल्या कित्येक तासांचा सुखाचा विमा उतरवायचा ‘ हे वाक्य वाचून मी सुखावले. यावरून लेखकाच्या दृष्टीने आयुष्यात पुस्तकांचं सुखाच्या दृष्टीने किती मोल आहे हे कळतं. बाल वयातलं झुंजार कथा वाचनाचे वेड अजूनही लेखकाच्या डोक्यात आहे. ते तेवढ्याच वेडेपणानं सहज लेखात उतरलेलं आहे. त्या वेडात शहाणपणा एवढा, की आजही बाबुरावांची परिस्थिती काय आहे, ते कुठे राहतात, त्यांच्या लिखाणातली पात्र कोण, हे सर्व तपशील अत्यंत नेमकेपणाने आलेले आहेत. बाबुरावांच्या लेखनात साधेपणा इतकच रंजनमूल्य किती आहे हे बाबूरावांचे वांङमय न वाचता सरांच्या लेखातून समजत.
सोरायन
या लेखकाचे नावही माहित नाही.. मला तरी. तसं ते सरांनाही माहीत नव्हतं. पण रस्त्यावर या लेखकाचे पुस्तक मिळालं. अवघ्या दोन रुपयात मिळाल्यामुळे आनंदाने ते घेतले. त्यावर लेखक म्हणतात इतक्या मोठ्या संपत्तीचा सौदा रस्त्यावर झाला याची खबर न विक्रेत्याला होती ना वाचकाला. त्यानंतर लेखकाने, लायब्ररीत जाऊन सोरायनच्या इतर पुस्तकांचा शोध घेतला. ती पुस्तकं वाचून सोरायनकडून सरांना अत्यंतिक समृद्धी आणि संपन्नता मिळाली. महत्त्वाचं असं की सोरायनमुळे सरांना आपण लेखक आहोत याचा अभिमान वाटला.
राम गणेश गडकरी
देवाघरची दौलत असं शीर्षक देऊन गडकरीं बद्दल प्रगाढ श्रद्धा आणि त्यांची उत्तुंग प्रतिमा सर निर्माण करतात. त्याच वेळेस त्यांचे अक्षर साहित्य दुर्लक्षित राहीले अशी खंत व्यक्त करतात. त्यामुळे नवी पिढी काहीतरी अमोलीक श्रेय हरवून बसली आहे यासाठी हळहळत राहतात. सर म्हणतात, गडकर्यांनी जे जे लिहिले ते,
उलगडती पीळ हृदयाचे, सुटती बंध देहाचे की जीव देहभर नाचे अशा ऊन्मनी अवस्थेत लिहिले.
गडकर्यांच्या विनोदाच्या अनुकरणावर कित्येक लेखकांनी गुजराण केली. तरीही त्यांच्या विनोदाची खुमारी ओसरत नाही.
आर. के. नारायण.
आपल्या सगळ्यांना मालगुडी डेज ही मालिका आठवत असेल. आजी आजोबा नातवंड आणि आपण. सगळ्यांना एकत्र आनंद देणारी. मालगुडी गावातला निखळ, नितळ, स्वच्छ सुंदर अनुभव देणारी. ही आर के नारायण यांची लेखन कलाकृती. आर के नारायण दक्षिणेतले असल्यामुळे, लेखक म्हणतात, प्रादेशिकता जोवर प्राणशक्तीच्या अविष्करणाला कारक आणि साहाय्यकारक आहे तोवर ती कवचा सारखी संरक्षक असते. तिचा कोप झाला की आतल्या आत घुस्मटून टाकते. नारायण यांची प्रवृत्ती आणि प्रकृती पिंडी ते ब्रह्मांडी बघण्याची असल्याने त्यांच्या प्रादेशिकतेने वैश्विक आशयाला सहज सुंदर रित्या अंकित केले आहे, अलंकृत केले आहे. दक्षिणेच्या घाटात उत्तरेचे गंगाजल ठेवले, आणि त्यात चंद्रबिंब बघितले तर भारतीय मनाला काय दिसेल काय दिसावे? नारायण यांच्या नजरेला ते ‘ऐश्वर्य’ दिसते. मालगुडीचे दाक्षिण्य साऱ्यांनाच आवडणारे. लेखक म्हणतात आर के म्हणजे अंतर बाह्य अस्सल आणि मिश्किल आप्त. नारायण आणि लक्ष्मण (व्यंगचित्रकार) दोघेही भाऊ हसवतात. कळ उठवतात. लेखक त्यांच्या बद्दल लिहिताना भक्ती भावाने लिहितात. पण त्यांचे न पटणारे मत ही तेवढेच स्पष्टपणे मांडतात. उदा: इंग्रजी भाषा ही भारतीय आहे असे आर के चे मत मला अजिबात मान्य नाही.
बहिणाबाई –
बहिणाबाई बद्दल लिहिताना लेखकांनी काळजाला हात घातलेला आहे. लेखक म्हणतात, बहिणाबाईंनी गाणी लिहिली नाहीत. त्यांना ती ऐकू आली, दिसली. देवानं आदिकालापासून लिहिलेली, गायलेली, चितारलेली. निसर्गात इथे तिथे विखुरलेली. कडे कपारीतून उसळत, घुसळत, फेसाळत जाणारा झरा, भुईतून वर येणारी पानं, रोजचे चंद्र सूर्य तारे, त्या सार्यात रहणारं, त्यातून वाहणारं जीवन गाणं त्यांना दिसलं. ऐकू आलं. त्यामुळे घट पटादी खटाटोप न करतात त्यांची गाणी जणु केवळ प्रतिध्वनीत झाली. इतकी सहजता, अभिजात सुंदरता त्यांच्या गाण्यात आहे. बहिणाबाईंच्या सुंदर काव्याचं, गाण्यांचं, असं लोभस नेमकं वर्णन क्वचितच कोणी केलं असेल. लेखक म्हणतात, बहिणाबाईंनी जे काय सोसलं, भोगलं, ते त्यांच्यासोबत काळात विलीन झालं. आपल्यासाठी मात्र ही हंड्या झुंबर लखलखलतच राहतील असं लेखक म्हणतात,
पु. लं.
म्हणजे अंतरीचा दिवा तेवत असणारे उजळ व्यक्तिमत्व. असे उजळ व्यक्तिमत्व मला तरी अख्ख्या भारतात दिसले नाही. लेखाला तीर्थरूप नाव देऊन वडिलांसारखेच ते मला वाटतात असं म्हणतात. पुलंच्या लेखणीतून एक आनंदाची धार स्त्रवत राहिली. आणि जिथे जिथे मराठी मनोवस्ती आहे तिथे तिथे ती वाहत गेली. मराठी इतिहासातली ही सर्वात मोठी पवित्र नदी, प्रत्येक गावाला आपली वाटते तिच्या दोन्ही काठावर, प्रायोजित उपयोजित कलांचे किती मळे भरले. पुणेरी धरणासह किती घाट बांधले गेले. तिच्या पाण्यावर किती पाणपोया चालतायेत, किती दक्ष, लक्ष भाविकांना हिच्या प्रवाहात डुंबत पारोसेपणातून मुक्त होण्याचा आनंद मिळाला याची गणतीच नाही. असं पु. लं बद्दल नेमके पणाने व्यक्त होतात अनेक थोर मराठी साहित्यिकांंबद्दल लिहिताना, तेवढ्याच थोर इंग्रजी लेखकांबद्दलही भरभरून लिहिलेलं आहे.
* * सोरायन, र्बर्ट्रान्ड रसेल, बर्नार्ड शाॅ पर्ल बक, पी. जी. वूड हाऊस हे ते इंग्रजी लेखक. पण जी. ए. कुलकर्णी, लेखकाची दुखरी नस. हळवी जागा. अंतरीचा दिवा. म्हणूनच त्यांच्याबद्दलच्या लेखाला, काळोखातील क्ष किरण असं समर्पक नाव दिलेलं आहे. जी. ए. न्चे साहित्य म्हणजे गूढ गहन ऐश्वर्याचे गारुड ! ऐश्वर्याचे आभाळच!
अर्थातच कोटस्थाने सरांनी हे आभाळ लीलया पेललेलं आहे. जी ए यांची कथा अथ पासून इती पर्यंत मंत्रावून गेलेली आहे. माणसाच्या जगण्याच्या विरुपिके चे असंख्य मासले दाखवून, ते या गारूडाचे विस्मय जनक भावदर्शन देतात. अंतिम ज्ञानाचा अंगठा दक्षिणा म्हणून गुरुने हिरावून घेतल्यावरही एकाग्र शरसंधान करणार्या एकलव्याचे अमोघ सामर्थ्य जी एं च्या लेखणीत आहे. मात्र हे शरसंधान विध्वंसक नाही. विकृत तर नाहीच नाही. मला जीए वाचता आले. माझे मन जी एन् च्या कथा वाचल्याच्या आनंदाने ओथंबून गेले आहे. आर्द्र झाले आहे.
ते म्हणतात एकांताचे आत्म शोधाला जे साह्य, रेडियमच्या लकाकीला अंधाराचे जे साह्य, तेच नियतीच्या अथांगतेचे जी एन् च्या कथेतील सत्य शिव सुंदरतेच्या ध्यासाला साह्य.
जी एन् च्या कथा साहित्या एवढेच, आत्मीयतेने इतरही अनेक लेखकांबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. तेवढेच अभ्यासपूर्वक. काळजाच्या शाईने. त्यातील काही लेखांबद्दल मी उच्च हेप्रातिनिधिक स्वरूपात लिहिले आहे. ते वाचायला आपल्याला नक्कीच आवडेल. कोटस्थाने सरांच्या शब्दात सांगायचं तर, हे पुस्तक घेऊन आपण आयुष्यातील काही तासांचा आनंदाचा विमा उतरवू शकतो… हे निश्चित. मोरपिसाने या लेखकांचं लिखाण निश्चित औक्षवंत होईल.
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈