श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ जनजागृतीच्या मार्गावर – भाग – २  ☆ श्री सुनील देशपांडे

 (परिवर्तनाची ही दिशा देण्यासाठी मग इतर समाज घटकांनीही आपापले योगदान देणे आवश्यक आहे.)  इथून पुढे —- 

ज्यांच्याकडे वय नाही पण वेळ आहे, संचार नाही पण विचार आहे, कष्ट होत नाहीत पण दृष्टी आहे. आचारांची तळमळ आहे, कार्याची कळकळ आहे आणि दुसऱ्याला समजून घेऊन विचार मांडता येतील अशा कार्याची जळजळ मनामध्ये धगधगत आहे असे ज्येष्ठ शोधले पाहिजेत. तरूणांचं भले बापाशी पटत नसेल पण आजोबांशी गट्टी जमते. असे तरुणांशी गट्टी जमवणारे आजोबा शोधले पाहिजेत. त्यांना कार्यरत केलं पाहिजे. कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे परंतु दिशा निश्र्चित असेल व योग्य साथ असेल तर व्याप्ती वाढवता येते. भरकटलेल्या दिशांना योग्य मार्ग मिळू शकत नाही आणि म्हणूनच निश्‍चित दिशा ठरवून पावले टाकल्यास समाजपरिवर्तन हळूहळू का होईना पण नक्की होऊ शकते. हा मोठ मोठ्या समाजसुधारकांनी दिलेला मंत्र आहे. त्यांच्या चरित्रां मधून आणि कृती मधून त्यांनी समाजाला हा मंत्र दिला आहे. पण तो मंत्र समजून घेण्याची पात्रता आणि इच्छा किती जणांच्यात असते हाच तोप्रश्न आहे. स्वत:चं जीवन जगून झाल्यानंतर तरी, स्वार्थापलिकडे जाऊन विचार करण्याची तयारी किती जणांमध्ये असते ? समाज परिवर्तनाची क्रिया सातत्याने चालू राहणे आवश्यक असते. पिढ्यानपिढ्या मधून ती झिरपत जाणे आवश्यक असते आणि मग अनेक पिढयांनंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा निश्चितच या परिवर्तनाचा अभिमान वाटू शकतो. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या कार्याला त्यांच्या तिस-या पिढीने कुठल्या कुठे नेऊन ठेवले आहे हे पाहिलं की या विधानाचा प्रत्यय येतो. आजच्या पिढीला दाखवण्यासारखं हे जिवंत उदाहरण अभिमानास्पद ठरतं. अवयवदानाच्या क्षेत्रात आपल्यालाही पिढ्यानपिढ्या चालू राहील असे कार्य उभे करायचे आहे. तरूणांना घडवण्यासाठी ज्येष्ठांची फळी उभी करायची आहे. असे अनेक प्रश्न उभे राहतील. यापूर्वी आपण विचार केला होता तो असा की …. कॉलेज तरुण, शालेय विद्यार्थी यांच्या स्पर्धा आयोजित करणे.

 हा जसा एक भाग असावा, त्याचप्रमाणे या विषयासंबंधी ज्येष्ठ नागरिक संघ आणि वृद्धाश्रम या ठिकाणी जर स्पर्धा आयोजित केल्या आणि चांगल्यापैकी बक्षीस ठेवलं, तर या विषयांमध्ये रस असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक शोधणं तसं फार अवघड होणार नाही. अनेक ज्येष्ठ खरं म्हणजे साठी ओलांडली म्हणून निष्क्रिय होत नाहीत. निरुपयोगी तर अजिबातच नाही, कधीच नाही. परंतु कार्याची दिशा न मिळाल्याने भरकटलेले, आयुष्यात खूप काही केलं आता विश्रांती घ्यावी असे म्हणणारे आणि काही दिवसांनंतर त्या विश्रांतीचा कंटाळाही आलेले असे असणारच. पण समाज ज्येष्ठ नागरिक संघ आणि विशेषतः वृद्धाश्रम या निष्क्रिय लोकांच्या जागा असे समजतो. त्यांना सक्रिय करण्याचा कुणी प्रयत्नच करीत नाही. अर्थात स्वतःहून सक्रीय होणारे सन्माननीय अपवाद सोडून. या सर्व मंडळींना विविध विषयात रस असतोच. कुणी कवी असतात, कुणी विचारवंत असतात, कुणी कलावंत असतात, कुणी अभिनेते असतात. यातील काहीजणांना आयुष्यात पोटामागे धावताना आपल्या कलांना विकसित करण्याची संधी मिळालेली नसते. अशांना अशा काही संधी उपलब्ध करून दिल्या तर त्यांना ते आवडेलही. त्यांना शोधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ व वृद्धाश्रम यांच्या मधून अशा स्पर्धांच्या माध्यमातून अशा व्यक्तींपर्यंत पोहोचता येणे शक्य आहे. त्यातून तरूण पिढीला घडवणारे मार्गदर्शक कार्यकर्ते, वक्ते, कलावंत, विचारवंत हे आपल्या कार्याशी जोडून घेता येणे शक्य आहे. असा प्रयत्न का करू नये ? खरं म्हणजे वृद्धाश्रमांकडे लोक अति भावनिक दृष्टिकोनातून बघतात. काहीजण तर अडगळीची माणसे टाकण्याची जागा अशा भावनेतून त्याकडे बघतात. मी तर म्हणतो वृद्धाश्रमांमध्ये राहणं चुकीचं किंवा वाईट असं काहीच नाही. खरं म्हणजे तेच जास्त सोयीचं आणि ज्येष्ठांच्या दृष्टीने उपकारक. तसेच उपक्रम कारकही आहे. ज्येष्ठांना एकमेकांच्या संगतीमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमातून चांगल्या पद्धतीने सहजीवन करता येईल. मुलांच्या घरात अडगळ म्हणून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमांमध्ये आनंदी जीवन जगणे हे केव्हाही चांगले. ज्या घरांमध्ये मुलांना अडगळ होत नसेल परंतु तेथे निष्क्रिय पणे बसून राहण्यापेक्षा वृद्धाश्रमांमध्ये समवयस्कांच्या संगतीत आनंदात दिवस काढणे आणि सक्रीय रहाणे व अधून मधून मुलांच्या संसाराची खबरबात घेण्यासाठी त्यांचेकडे जाऊन येणे हे सगळ्यात सुखाचे आणि आनंदाचे आहे असे मला वाटते. आम्ही सुद्धा आता आमच्या फ्लॅटमध्ये दोघेच रहातो. पण आमच्याकडे सामाजिक उपक्रम आहेत. त्यामुळे आम्ही सक्रिय आहोतच. परंतु आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही वृद्धाश्रमा प्रमाणेच राहतो. व्यवसाय व इतर उपक्रम नसते तर मग वृद्धाश्रमांमध्ये रहाता आलं असतं तर तेच जास्त सुखावह वाटलं असतं. आत्तापर्यंत केलेल्या पदयात्रां मुळे सामाजिक उपक्रमांसाठी जे काही मिळवलं तो भाग सोडला तरी, वैयक्तिक आयुष्यामध्ये बरंच काही शिकता आलं. पहिलं म्हणजे आपल्या गरजा आपण कमीत कमी ठेवू शकलो तर आपण जास्तीत जास्त उपक्रमशील राहू शकतो. दुसरी गोष्ट, आयुष्यात तडजोड केल्यास जे चांगले क्षण अनुभवता येऊ शकतात ते अडून राहण्यात किंवा अनावश्यक मतांमध्ये ठाम राहण्यामध्ये मिळू शकत नाहीत. सामाजिक उपक्रमांमधून आपण समाजाच्या काही उपयोगी पडू शकतो या भावनेतून जे मानसिक समाधान मिळतं त्यामुळे शारीरिक आरोग्यही चांगलं राहू शकतं. या पदयात्रेमध्ये खरोखरच आश्चर्य करण्यासारखं घडलं. पदयात्रेच्या आदल्या दिवशीपर्यंत मी सर्दी खोकल्याने बेजार होतो. घरचे काळजीतच होते. परंतु पदयात्रेच्या सुरुवातीपासून पदयात्रा संपेपर्यंत किंबहुना परत येईपर्यंत एकदासुद्धा खोकला आला नाही. सर्दीने त्रास दिला नाही. पण परत आल्यानंतर पुन्हा थोडासा सर्दी-खोकला सुरू झाला आणि त्यात कोरोनाच्या बातम्या सुरु झाल्या त्यामुळे फारसा कुठे बाहेर पडलो नाही. आणि त्यानंतर लॉकडाऊन मध्येच अडकून पडलो. त्यामुळे पदयात्रा झाल्यानंतर कुठल्या कार्यक्रमाला जाणे नाही कुणाला भेटणे नाही. म्हणजेच आपण जर खरोखरच ध्येयवादी कामाने पछाडलेले असू तर शरीरही त्याला साथ देते. म्हणून उतारवयामध्ये सतत कार्यरत असावं, कार्याने पछाडलं गेल्यास उत्तमच. गरजा कमीतकमी ठेवाव्यात परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेता आलं पाहिजे. हे सर्व धडे नुसते शिकलो नाही तर आयुष्यात अंगीकारायला ही शिकलो. हा पदयात्रेने मला वैयक्तिक झालेला सगळ्यात मोठा फायदा आहे. ज्या गोष्टी आपल्या आवडीच्या असतात त्या करण्यात आनंद असतो. करण्यापासून त्रास आणि श्रम वाटत नाहीत आणि शरीरही साथ देतं. हा धडा जर प्रत्येकाला समजावून सांगून लागू करायचं ठरवलं तर, ज्येष्ठांकडून खूप मोठं समाजकार्य होऊ शकेल. त्यासाठी विविध उपक्रमांमधून सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. करूया काही प्रयत्न, करून बघूया.

बघूया ना ? देणार साथ ?

कृपया सहकार्य करा. आवाज द्या श्रोती जमा करा, आम्ही आपल्याकडे येऊ.

संपर्क करा. फोन करण्यापेक्षा व्हाट्सअप मेसेज करा अथवा ई मेल करा. आपले नाव पत्ता कळवा मी आपल्याशी संपर्क करेन.

– समाप्त – 

© श्री सुनील देशपांडे 

 उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन.

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल. : – organdonationfed@gmail. com;  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments