श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “जुने जाऊ द्या मरणालागुनी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
खरे तर इतिहासकाळात आपल्या देशावर अनेकवार आक्रमणे का झाली आणि वारंवार हा देश आक्रमकांपुढे का नमला याची कारणे अज्ञात नाहीत. त्या त्या काळातला समाज एकसंध नव्हता. जातीभेदांनी चिरफळ्या उडालेला होता आणि तो काळाबरोबर ‘बदलत नव्हता. तो ‘स्टॅटिक’ होता. ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ या चक्रात अडकलेला होता. कोण आला, कोणी राज्य केलं याच्याशी इथल्या समाजाला काही देणंघेणं नव्हतं.
आक्रमक नवे विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन आले. घोड्यांच्या रिकिबीचा शोध ज्यांना लागला, ज्यांना माहीत झाला, त्या टोळ्या रणांगणावर प्रबळ ठरल्या आणि मग गझनीचा महंमद आणि चेंगीजखान धाडी घालून आपल्याला लुटून गेले. त्यानंतर आलेले आक्रमक बंदुका घेऊन आले, तोफा घेऊन आले, वाफेची शक्ती घेऊन आले आणि दरवेळी आपल्याला हरवत राहिले. कोणतेही नवीन तंत्रज्ञान निर्माण न करणारा, भविष्यकाळाचा विचार न करणारा आणि ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ पद्धतीने भूतकाळात रमणारा आपला. समाज सतत हरत राहिला.
दुर्दैवाने आज अशा विचारसरणीला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. हे पुच्छप्रगतीचे लक्षण आहे. ज्या दोषांमुळे आपल्या इतिहासात अंधारयुग येऊन गेले त्याच दोषांच्या आपण परत आहारी जात आहोत याचे ते लक्षण आहे. ‘श्रुती-स्मृती-पुराणोक्त’ ही भावना आणि पूर्वजांचे गुणगान करण्यात धन्यता मानण्याची भावना या दोन्ही भावना परत बळकट होत असल्याचे हे लक्षण आहे.
युरोपात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याच्या काळात गॅलिलिओला ख्रिश्चन धर्माच्या संघटनेशी–चर्चशी संघर्ष करावा लागला. आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तर इतिहासात जगण्याच्या आपल्या या प्रवृत्तीशी संघर्ष करावा लागेल. अशा प्रवृत्तीला प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे खतपाणी घालणाऱ्या विचारधारांविरुद्ध संघर्ष करावा लागेल. जरूर पडली तर केशवसुतांसारखा निर्भीडपणे पुकारा करावा लागेल :
‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळूनी किंवा पुरुनि टाका !
सडत न एक्या ठायी ठाका, सावध ऐका पुढल्या हाका !’
हे काम सोपे नाही. हा संघर्ष सोपा नाही. पण ज्यांना हा देश, हा समाज एकविसाव्या शतकात खऱ्या अर्थाने समर्थ व्हावा असे वाटत असेल, तर त्यांना या संघर्षासाठी सिद्ध व्हावेच लागेल. असा संघर्ष उभा राहतो की नाही आणि तो कोण जिंकतो यावरच ‘भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणार की नाही’ या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
© जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈