सौ राधिका भांडारकर
☆ आठवणीतले झाकीर हुसैन ☆ सौ राधिका भांडारकर ☆
कोणत्याही क्षेत्रातील कलाकार असोत त्यांचा आपले जीवन आनंदित करण्यात फार मोठा वाटा असतो आणि असा एखादा कलाकार जेव्हा त्याच्या केवळ स्मृती आणि कला मागे ठेवून आपल्यातून निघून जातो तेव्हा नकळतच आपल्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण होते. मनात उदासीनता दाटून येते. प्रसिद्ध तबलावादक पंडित झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या बातमीने मन असेच सुन्न झाले. कुरळ्या दाट केसांचा झाप उडवत तबल्यावर ताल, लय, शब्द सूर आणि नादाचा जिवंत झरा उसळवत “वाह! ताज” म्हणणारा हा दिव्य कलाकार काळाच्या पडद्याआड गेला हे मान्य करणे खूप कठीण जाते. त्याची कला तर दिव्य होतीच पण माणूस म्हणूनही त्याच्यातले अनेक गुण वाखाणण्यासारखे होते.
उस्ताद झाकीर हुसैनच्या तबला वादनाचे अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम मला ऐकायला मिळाले हे माझे खूपच भाग्य आणि प्रत्येक वेळी एक कलाकार आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन झाले तेही तितकेच अविस्मरणीय.
जळगावला रोटरी क्लब तर्फे “झाकीर हुसैन लाईव्ह” हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. कार्यक्रमापूर्वी त्यांची लोकमत वृत्तपत्र कार्यालयात प्रकट मुलाखत होती. लोकमतची लेखिका म्हणून मला आमंत्रण होते. मुलाखतीत ते अगदी मन मोकळेपणाने, हसत खेळत गप्पाच मारत होते. त्यांच्या गोऱ्यापान कपाळावरचं गंध पाहून आम्ही सारेच काहीसे अचंबित झालो होतो आणि तेवढ्यात मुलाखतकारांनी नेमका तोच प्रश्न त्यांना विचारला. ते अगदी मन मोकळेपणाने हसले आणि म्हणाले. “मुंबईहून जळगावला येत असताना वाटेत चांदवडला देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्याचा योग आला. ये जो माथे पे तिलक है वो देवी का आशीर्वाद है।” अंत:करणापासून ते बोलत होते. पुढे म्हणाले, ” कलाकारासाठी एकच धर्म असतो. तो फक्त आपल्या कलेशी एकनिष्ठ राहण्याचा. अनेक धर्मांच्या भिंती त्याला सतावत नाहीत.. कोंडून ठेवत नाहीत. तो मुक्त असतो. संगीत की भाषा ही अलग होती है। ती हृदयाशी, मनाशी जोडलेली असते. ना कुठल्या जातीशी ना कुठल्या धर्माशी. ” झाकीर हुसैन यांचे हे अंतरीचे बोल श्रोत्यांच्या मनाला भिडले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
उस्ताद झाकीर हुसैन हे असे कलाकार होते की कुठल्याही श्रेष्ठत्वाची भावना त्यांना स्पर्शून गेली नाही. ते जितका त्यांच्यापेक्षा बुजुर्ग कलाकारांचा मान राखत तितकाच मान ते नवोदित कलाकारांनाही देत. त्यांच्या “सोलो” कार्यक्रमात ते त्यांना साथ देणाऱ्या सारंगी, व्हायोलिन वादकालाही तितकेच प्रोत्साहित करत. श्रोत्यांना त्याच्याही कला सादरीकरणाकडे लक्ष द्यायला प्रेरित करत.
एकदा मुंबई येथे षणमुखानंद सभागृहात श्रेष्ठ सतारवादक पंडीत रविशंकर यांचा कार्यक्रम होता. तो त्यांचा शेवटचा कार्यक्रम असे जाहीर केलेले होते. साथीला तबल्यावर झाकीर हुसैन होते. दोघेही दिग्गज, आपापल्या कलेतले किमयागार. त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड मोठा श्रोत्रुसमूह उपस्थित होता. सभागृह गच्च भरले होते. पंडीत रविशंकर यांची पत्नी आणि कन्या उपस्थित होत्या. कन्या अर्थात मंचावर पंडितजींबरोबर वादक म्हणून उपस्थित होती. पत्नी श्रोत्रुवर्गात पहिल्या रांगेत आसनस्थ होत्या. बहारदार कार्यक्रम चालू होता. एकेका टप्प्यावर रंग चढत चालला होता. सतार ऐकावी की झाकीर हुसैन यांचं तबलावादन ऐकावं.. श्रोते बेभान झाले होते. इतक्यात पंडीत रविशंकर यांच्या पत्नीने मोठ्या आवाजात सर्वांना ऐकू जाईल अशा स्वरात साऊंड सिस्टिम वाल्यांना सांगितले, ” तबल्याचा आवाज कमी करावा. पंडितजी की सतार ठीक से सुनाई नही दे रही है?” आणि एका क्षणात झाकीर हुसेन यांनी स्वतःच त्यांच्या समोरचा माईक काढून टाकला. ते उठले आणि पंडितजींच्या चरण्यास स्पर्श करून म्हणाले, ” आपण गुरु आहात. माझ्याकडून आपला अवमान झाला असेल तर मला माफ करावे. ” पंडितजींनी झाकीर हुसेनला मिठीत घेतले. वास्तविक त्यांना झाल्या प्रकाराबद्दल खेद वाटला असावा पण मंचावरचा तो दोन कलाकारांच्या नात्याचा, भक्तीचा एक आगळावेगळा सोहळा पाहून सारेच भारावून गेले होते. त्या दोघांमध्ये खरं म्हणजे कसलीच स्पर्धा नव्हती. ते फक्त आपापल्या महान कलेचे चेले होते आणि भक्त होते. जुगलबंदीत मशगुल होते.
आणखी एक असाच प्रसंग !
रॅलेला (नॉर्थ कॅरोलीना अमेरिका) गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची संगीत मैफल होती आणि त्यांचे साथीदार म्हणून उस्ताद झाकीर हुसैन तबल्यावर होते. गायक सुरेश वाडकर यांची संपूर्ण मैफील सुंदरच झाली. मैफिलीचा समारोपही झाला मात्र श्रोते काही उठायला तयार नव्हते. आयोजकांनी दोन-तीन वेळा जाहीर केले की, ” कार्यक्रम संपला आहे” तरीही लोक परतायला तयारच नव्हते. प्रेक्षागृहातून एकच आवाज घुमला!” आम्हाला झाकीर हुसैन यांचे स्वतंत्र तबलावादन ऐकायचे आहे. ते ऐकल्याशिवाय आम्ही जाणार नाही. ”
थोडक्यात नाईलाजाने म्हणावे लागते की तिथली जी गर्दी होती ती उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासाठी होती, त्यांचे तबल्यावरचे बोल ऐकण्यासाठी होती. झाकीर हुसेन नम्रपणे उठले, त्यांनी संपूर्ण प्रेक्षागृहस वाकून वंदन केले आणि ते म्हणाले, ” आजच्या मैफिलीत माझी कामगिरी साथीदाराची होती आणि ती मी बजावली. आजची मैफल माझे प्रिय मित्र आणि गुरु पंडीत सुरेश वाडकर यांची आहे. आज मी स्वतंत्रपणे माझी कला आपणापुढे सादर करू शकत नाही. मला क्षमा असावी. ” किती हा नम्रपणा आणि केवढी ही महानता आणि तत्त्वनिष्ठता! कृपया इथे बिदागीचा प्रश्न उपस्थित करणे हे संकुचितपणाचे द्योतक ठरेल. खरा कलाकार नेहमी दुसऱ्या कलाकारांना मनापासून दाद कशी देऊ शकतो, त्याचा मान कसा राखू शकतो याचं हे एक सुंदर उदाहरण.
असा हा मनस्वी कलाकार, तालवाद्याचा सरताज आज आपल्यात नाही पण त्याची कला अमर आहे, बोल अमर आहेत. अशा या तबलावादक, संगीतकार, तालवादक संगीत निर्माता आणि अभिनेता म्हणून गाजलेल्या महान भारतीय कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈