सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
विविधा
☆ मकरसंक्रमण ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
– मकरसंक्रांत आली कि आपण पंचांग, कॅलेंडर पाहतो त्यावर बरच काही लिहिलेलं असतं मकर संक्रांति वर! म्हणजे त्या दिवशी संक्रांतीचा शुभकाळ, पर्वकाळ, पुण्यकाळ दान करायच्या गोष्टी कोणतं वस्त्र नेसायचं. याची शास्त्रशुद्ध माहिती असते. मकर संक्रांतीच्या आधी आपण धुंधुरमास साजरा करतो त्याचं महत्त्व मुलांना समजावून द्यावं लागत. नव्या मुगाची डाळ घालून केलेली खिचडी वांग्याची भाजी मटकीची उसळ असं चटकदार थंडीला पोषक जेवणं असत. आणि सूर्योदयाच्या आत हे भोजन करायचं. जणूं येणाऱ्या मकर संक्रमणात सूर्याचं स्वागतच. ते खरंच सुग्रास आणि चवदार काहीतरी वेगळं केल्याचं मनाला समाधान देणार असायचं. आता फारसं कोणी पहाटे उठून वगैरे करत नाही. त्या भोजनाचा आनंद सगळेच घेतात. त्यानंतर भोगी !. शक्ती म्हणजे देवी आणि कृषी म्हणजे शेती या दोन्हीचा समन्वय म्हणजे भोगीचा दिवस. भोग म्हणजे नैवेद्य त्याचा प्रसाद म्हणजे प्रसन्नता. ही प्रसन्नता घेऊनच भोगी येते या दिवसांत सगळीकडे नवधान्यं, भाज्या सगळं नवीन आलेलं असतं त्याचा आनंद प्रसन्नता ही संक्रांतीपूर्वीच आलेली असते म्हणून भोगी प्रथम येते नंतर मकरसंक्रांत!. भोगीला, तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्याच्यावर लोण्याचा गोळा, खिचडी, तीळाची चटणी, आणि नवीन आलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, यांची मिळून केलेली भोगीची खास अशी चवदार भाजी. ! याचा नैवेद्य आणि भोजनही! संध्याकाळी दिवे लागणीनंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम असायचा. तेव्हा नवीन वस्त्र परिधान करून हळदी कुंकू लावून विड्यांच्चा पानांवर, सुपारी, बदाम, खारका, सुकं खोबरं, लेकुरवाळ हळकुंड हातात देऊन नंतर सुवासिनी एकमेकींची हळद कुंकू लावून ओटी भरायच्या. याला विडा देणं- घेणं असं म्हणतात. आरसा कंगवा घेऊन त्यांच्या केसावरून फिरवायची एक रीत आहे. तिळाचा लाडू द्यायचा. वर पानांचा गोविंद विडा करून द्यायचा. संध्याकाळच्या वेळी हा कार्यक्रम असायचा. कांरण. पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी घरातील स्त्रिया आरशांत पहात वेणी- फणी असं काही करतच नसत. त्यामुळे स्त्रियांना हा दिवस फार महत्त्वाचा वाटायचा. आता हे फारसं कुणी करतांना दिसत नाहीत. आता परिस्थितिही बदलली. आहे. यानंतर येणारा दिवस म्हणजे मकर संक्रांत!
या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो शुभकाळ म्हणजे पुण्यकाळ पर्वकाळ सूर्याचं हे संक्रमण म्हणजे मकर संक्रांत!. तीळ वाटून हळदीसह अंगाला लावून अभ्यंग स्नान करून या दिवसाची छान सुरुवात होते. दारात, देवापुढे सूर्य मंडल रेखून त्याची पूजा करायची पद्धत आहे. ‘सूर्यपूजन’ यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तसेच मातीच्या सुगडांची पूजाही! मातीच सुगड हे आपल्या देहाचं प्रतीक आहे या सगळ्यात म्हणजे देहात पंचमहाभूतांच प्रतिक म्हणून नव्या धान्यांची ऊंस, गाजर, नव्या शेंगभाज्या, तीळ गुळ, आणि हळदीकुंकू घालून कापसाचे गेजा वस्त्र वाहून व दोऱ्यांनी म्हणजे सुताने बांधून सुवासिनी पूजा करतात पूजा करताना या सुगडाला हळदी कुंकवाने रंगवलेली बोटं उठवलेली असतात. अशी सुगडाची पूजा म्हणजे आपल्यातील देवत्वाची पूजाच. !पुरण, तिळगुळ पोळी-लाडूचा नैवेद्य दाखवून’ ज्ञान, आरोग्य, वस्त्र, धनसंपदा, निवारा ‘, मिळावा यासाठी प्रार्थना करून देवीला सौभाग्याचं दान मागतात. शस्त्र शास्त्र यांच्या उपासनेमुळे शक्ती, कृषी, ज्ञान यांच्या साधनेत येणाऱ्या, विघ्नांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे. हळदी कुंकू म्हणजे पवित्र भावना किंवा विधी. या दिवशी हळदीकुंकू हलवा तिळगुळ आणि वस्तू लुटायच्या. आयुष्यात चांगल्या गोष्टी तिळा-तिळा न येतात वाईट गोष्टी मात्र पटकन येतात आपल्या शरीराची मनाची तिळा-तिळान वाढ होते कोणतीही गोष्ट थोडी थोडी म्हणजे तिळा-तिळाने वाटून घेतली की त्यातलं दुःख कमी होतं पण सुख तिळातिळानं वाढतं यासाठी आपलं सुख आनंद आपल्या जाणिवा आपल्या दुःखासह तिळासारख्या सर्वांना वाटाव्यात दुसऱ्याच्याही घ्याव्यात या भावना यामागे आहेत. हाच खरा मकर संक्रमणाचा म्हणजे आपल्याही मनाच्या स्थित्यंतराचा खरा सणं म्हणूयात! तिळगुळ हे स्नेहाची नात्याची, मैत्रीची गोडी, कायम राहावी यासाठी देतात घेतात. तिळासारखं स्वच्छ स्नेहलमनं आणि त्याबरोबरच गुळाची गोडीही वाढते. काटेरी हलवा काट्यांबरोबर संसारात गोडीही असते हे सांगतो काळ वस्त्र म्हणजे अंधाराचं प्रतीक असलं तरी त्यावरील बुंदके ठिपके असणं म्हणजे नक्षत्रांना आवाहन करण्यासारखंच असतं. असं वस्त्र नेसून हळदीकुंकू एका व्रताप्रमाणे करून वस्तू हा एक सामाजिक वसाही म्हणता येईल. एखादी वस्तू मुक्तपणे दुसऱ्यांना दान करणे लुटणं यात सात्विक आनंद असतोच याबरोबरच या दिवशी आपल्याला जीवन देणाऱ्या सूर्यनारायणाची प्रार्थना करावी ” हे सूर्य नारायणा तुझ्या प्रकाशाबरोबर तू पृथ्वीवर ये अन आमच्या तनां मनातल्या अंधारावर छान सुंदर स्वप्नांचं पांघरून घाल. तुझी आग नको प्रकाश दे. निरामय व आरोग्यमय जीवन दे. आमच्या ज्ञानाची, नात्यांची, स्नेहांची, कक्षा वाढव. “
मग काय.. “आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला………..
मकरसंक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा..!💐
© शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈