सौ. उज्ज्वला केळकर
☆ जे जे आपणासी ठावे… लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
|| जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करून सोडावे सकल जन ||
…. समर्थ रामदासस्वामींच्या आज्ञेनुसार काही दिवसांपूर्वी, मी दिसेल त्याला, भेटेल त्याला शहाणं करून सोडायचं चंग बांधला होता.
तर एक्झॕक्टमधे झालं काय होतं, मला साधारण पंधरा दिवसांपूर्वी प्रचंड खोकल्याने झोडपलं होतं. अन् आमचा खोकला म्हणजे खानदानी, काही झालं तरी महिना भरल्याशिवाय नरडं सोडणार नाही. मी घरातली होती नव्हती तेवढी सगळी औषधं ढसाढसा ढोसली, तरी मेला जाईना. मग मी आमच्या डॉक्टरीणबाईकडं व्हिजिट दिली… एका व्हिजिटीत तो गेला नाही म्हणून आणखी दुसऱ्यांदा दिली. पण दळभद्री खोकला जळूसारखा चिकटूनच राहिला.
मी लागोपाठ तीन रात्री टक्क जागी होते. म्हणून चौथ्या रात्री मी माझ्या उशा-पायथ्याशी खोकल्याशी लढण्याची जंगी तयारी करून ठेवली. पाण्याची बाटली, एका वाटीत चाटण, दुसरीत खडीसाखर, तिसरीत दालचिनी, चौथीत लवंग आणि लागली तर चपटी (इथे औषधाच्या बाटलीस ‘चपटी’ असे उपनाम देण्यात आले आहे, वाचकांनी नसते गैरसमज करून माझे चारित्र्यहनन करण्याची व्यर्थ खटपट करू नये) इतका सगळा जामानिमा तयार ठेऊन मोबाईलवर खोकला पळवण्याचे आणखी बारा घरगुती जालीम उपायही नजरेखालून घालवत बसले होते.
उपाय वाचून दम लागला म्हणून हळूच यू टयूबवर गेले तर त्यांच्या शॉर्ट्स मधे एक बाई समोर आली, अन् तिने अॕक्युप्रेशरद्वारे खोकला बंद करायची क्लृप्ती दाखवली… तळहातावर तेल लावायचे, आणि अंगठ्याच्या खाली मसाज करायचा अन् तळहाताच्या मागचा एक पॉइंट दाबायचा. दोन्ही हातांवर याचा प्रयोग करायचा. मी ते हुबेहूब तसच्या तसं केलं, आणि आडवी झाले.
वाचकहो, मला एकदाही खsक करून सुध्दा खोकला आला नाही. तो गेला तो गेला तो गेलाच !
जन्मात पहिल्यांदा माझा खोकला चुटुकन् गेला होता.
मैं तो सारा दिन खुशी के मारे उडी मार मारके थक गयी भाईशाब !
मग नंतरच्या दिवशी आमच्या ताई खोकल्याने हैराण दिसल्या, मी त्यांना तो उपाय अगदी फुकटात सांगितला. वरून ती बाई देखील पाठवली. त्यांच्या हृदयात आशेचा काजवा लखलखला.
मग दूरच्या जवळच्या समस्त नातेवाईकांना फोनवर कळवून टाकलं. पुस्ती म्हणून त्या बाईलाही त्यांच्याकडे ढकलून दिलं.
मग आम्ही मधे नाही का वणवण भटकत होतो, त्यावेळी ज्या दुकानात साडी घेतली, तिथे मिनिटामिनिटाला खाॕsक खाॕsक करून साडी खरेदीत व्यक्त्यय आणणाऱ्या दुकानदारीण बाईला सुध्दा मी प्रात्यक्षिक दाखवलं अन् त्याबद्दल तिने साडीवर तब्बल तेवीस रुपयांची भरघोस सूट दिली.
वाटेत माझा मित्र त्याच्याच बायकोबरोबर भेटला अन् केवळ खोकल्यासाठी दवाखान्याची पायरी चढणार म्हटल्यावर तिथल्या तिथे मी त्यांची वाट अडवून त्या अॕक्युप्रेशरद्वारे स्पेशालिस्ट बाईला त्यांच्याकडे धाडून टाकलं. मी त्यांचे साधारण रुपये पाचशे खडेखडे वाचवल्याबद्दल त्यांनी पिशवीतलं एक संत्र देऊन माझे ओलेत्या डोळ्यांनी आभार मानले.
दररोज सकाळ-सकाळी मुलाच्या शाळेच्या निमित्ताने आमच्या सोसायटीची साफसफाई करणाऱ्या भैयाभाऊंना माझ्या दर्शनाचा लाभ होतो. मला बघून बरेचदा देखो ना भाभीsss असा सूर लावून ते आमच्या सोसायटीवाल्यांची कुरबुर सांगत असतात. अशाच एका शुभ्र सकाळी भैयाभाऊंना माझ्या समोर खोकल्याची ढास लागली अन् मी तिथल्या तिथे ऐसा तळहात लेनेका और तेल लेके दुसरे हातसे कैसे मळनेका वगैरे शिस्तीत समजावून सांगितलं…..
‘हा हा समज गया भाभीजी! जैसा तंबाखू मे चुना लगाता है वैसाच ना? ‘
किती पटकन त्याला क्लिक झालं अन् तोपर्यंत मी इतरांना घसा फुगेपर्यंत तासभर समजावून सांगत फिरत होते.
त्या कालावधीत मला जो भेटेल आणि खोकेल त्याला मी त्या बाईची थोरवी पटवून देत होते.
शेवटी नवरा वैतागून म्हणाला, बाssई तू नाक्यावर जाऊन उभी रहा भोsपू घेऊन!
मुलगी म्हणाली, मम्मी तू एक भाड्याची रिक्षा करून त्यात स्पीकर लावून गल्लीबोळातून मार्गदर्शन करत का फिरत नाहीस? जास्त टार्गेट अचीव्ह होईल तुझं!
पोरगा म्हणाला, गल्लीबोळात फिरायला पप्पाची बाईकच जास्त बरी पडेल!
परंतु नवऱ्याने स्पष्ट नकार दिल्याने ती योजना तिथल्यातिथे रद्द झाली.
तर समस्त जणांचा खोकला पळवून लावावा, या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मधल्या कालावधीत मी माझ्या तोंडाचा पार किस पडला.
मात्र आता माझ्याच गेलेल्या खोकल्याने परत यू टर्न मारलाय आणि चार दिवसांपासून मी त्या अदृश्य तंबाखूला चुना लावून तळहातावर चोळ चोळ चोळतीये. दोन्ही हातावर रगडून रगडून आणि त्याच्यामागचा पॉइंट दाबून दाबून त्यातून आता कळा मारायला लागल्यात तरी तो खोकला हाय तिथ्थच हाय.
शेवटी काल मीच डॉक्टरांची पायरी चढून आले वाचकहो!
त्यातून ते ‘सकल जन’ आता माझ्या नावाने बोंबटया मारत बसलेत. काहींनी तर त्या बाईला सुध्दा माझ्याकडे परत धाडून दिलं.
डिसअपॉइंटमेंटचा कहर झाला हो अगदी कहर…
लेखिका : सुश्री स्नेहल अखिला अन्वित
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सकळ जनांना शहाणं करून सोडणं मस्त!😆