श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ ‘आभाळाला हात टेकवून जमिनीवर येणारा माणूस !‘ – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(आपल्या सभ्य वागण्याने त्याने त्याच्या सहवासात येणा-या सा-याच महिलांचा आदर कमावला. त्या सा-या जणींना त्याच्या सहवासात सुरक्षित वाटायचे!) – इथून पुढे —
ज्या स्वरूपाचे काम तो करायचा ते काम काही त्याला आधीपासून येत नव्हते. त्याच्या क्षेत्रात आधी शिक्षण मगच नोकरी असा क्रम. याचा मात्र आधी नोकरी, नोकरीतील किचकट पण आव्हानात्मक कामे आणि मग त्याचे औपचारिक शिक्षण असा उलटा क्रम लागला. हे नंतरचे शिक्षण तसे खूप जिकीरीचे असते. पण नोकरीची आव्हाने पेलताना त्याने पदवी आणि नंतर कायद्याची पदवीही पदरात पाडून घेतली…. हे तो शिकला नसता तरी चालले असते, एवढे त्याने नोकरीतील कामावर प्रभुत्व मिळवले होते. अर्थात हे कसब त्याने त्याच्या पहिल्या नोकरीत तेथील अनुभवी लोकांच्याकडूनच प्राप्त केले होते. पाया उत्तम असल्याने त्याला कळस चढवणे काही अंशी सोपे गेले. पण पाया आणि कळस हे अंतर पार करण्यातले कष्ट त्याने अफाट घेतले.
अफाट, अचाट वाटणा-या कृती तर त्याने शेकड्याने केल्या असतील. चारचाकी वाहन घेण्याआधी लोक रीतसर क्लास वगैरे लावतात. याने नवीन कार घेताना फक्त त्या शो रूम मधून ती कार बाहेर रस्त्यावर आणेपर्यंत शोरूम मधील माणसाची मदत घेतली. आणि पूर्वी इतरांना कार चालवताना पाहिलेला हा बाबा थेट कारचक्रधर बनला आणि कुठेही न धडकता अगदी सुरक्षितरीत्या घरी पोहोचला!
पुढे त्याला मालकाने ड्रायवर दिला तेंव्हा त्या ड्रायवरची काळजी घ्यायला हा तत्पर. कधी कधी त्याला मागे बसवून हा गाडी हाकायचा. ड्रायवरला त्याच्या कामाचे पैसे व्यवस्थित मिळतील याकडेही त्याचे बारीक लक्ष असे.
कोरोना काळात रिकामा वेळ असा फुकट कसा घालवेल हा? कापडी मास्क शिवण्याची कल्पना याचीच… हा स्वत: शिलाई मशीनवर मास्क शिवायला शिकला आणि नंतर सोसायटीमधील सर्वांना याने कामाला लावले. पुढे मागणी वाढल्यावर मास्क शिवण्याचा रोजगार गरजूंना मिळवून दिला.
लोकांच्या सुखाच्या समारंभात हा फारसा दिसला नाही पण दु:खाच्या प्रसंगी अगदी हजर. शवागारात जाऊन प्रेत ताब्यात घेण्यात त्याला कधी भीती, किळस नाही वाटली. आपले मानलेल्या माणसांची किंवा त्यांच्या जवळच्या माणसांशी जर इतर कुणाशी अदावत झाली तर मध्यस्थी करायला याच्या सारखा माणूस मिळणे दुरापास्त. जीव लावावा तो कसा हे त्याच्याकडून शिकावं. लहान मुलांमध्ये तो लहान होई तर मोठ्या माणसांत मुद्दाम लहान बनून राही. बच्चे कंपनीचा तो मॅनेजर होई…. स्वत: नोकरीत त्या पदासमकक्ष याचं काम असल्याचा यात अडथळा कधीच येत नसे. तो कधी कुणाला मोठा वाटलाच नाही!
शहरातल्या पाहुण्या पोरांना भाताची शेतं मनोसोक्त अनुभवता यावीत म्हणून सरळ रस्ता सोडून मुद्दाम, चिखलाने माखलेल्या आडवळणी वाटेवर आपली नवी कार कोण घालेल… याच्या शिवाय? म्हणून अनेक मुलांचा तो मामा आणि अनेक बहिणींचा दादा होता!
एकदा मालकाने त्याला त्याच्या विशेष कामगिरीबद्दल त्याला एक ब-यापैकी रक्कम भेट दिली. त्या पाकिटातले काही रुपये सर्वांना मेजवानी देण्यात खर्ची टाकून बाकी रक्कम त्या रुपयांच्या पाकिटासह जसेच्या तसे मित्राच्या हाती देताना त्याने आपण काही वेगळे करतो आहोत, असे किंचितही जाणवू दिले नाही. त्या पैशांची परतफेड लवकर झाली म्हणून तो नाराजही झाला होता!
बाहेरच्या खाण्याच्या पदार्थांना त्याने वेगळी नावे दिली होती… उदा. कच्छी दाबेली… त्याच्यासाठी कच्ची दाभळ होती.
आश्चर्य वाटले, नवल वाटले की… हात तिच्या मारी… हे तो एका विशिष्ट लकबीने म्हणत हसत सुटायचा. त्याला विनोद उत्तम समजत. पु. लं. च्या सगळ्या कथा त्याने पारायण करावे तशा ऐकल्या होत्या… आणि त्यातल्या पात्रांची नावे देण्यासाठी माणसे शोधली होती.
शहरात साहेब असलेला हा गावात जातीवंत शेतकरी बनायचा… स्वत:ची कार चालवणारा… बैलगाडी उत्तम हाकायचा! कामासाठी विमान प्रवास, उत्तम हॉटेलात वास्तव्य करण्याची संधी त्याला खूपदा मिळायची… पण त्यामुळे घरातील अंगणात, पत्र्यावर झोपण्याची, चुलीवरचं अन्न चवीने खाण्याची त्याची सवय काही गेली नाही. त्यामुळे हा शहरात, एका मोठ्या उद्योगात खरंच साहेब आहे का? अशीही शंका त्याच्या गावातल्या सवंगड्यांना यायची.
लहान वयातच पोक्तपणाचे जोखड खांद्यावर घेतल्याने त्याच्या मनावर काहीसे ओझे असावे. पण कुणापाशी व्यक्त करण्याची त्याला सवड आणि आवडही नव्हती. त्यामुळे संधी मिळेल तेंव्हा इतरांशी हास्यविनोद, चेष्टा-मस्करी करण्यामध्ये त्याच्या मनातील ताणाचे तण बहुदा जळून जात असावे…. भाताची खाचरं पेरणीसाठी तयार करण्याआधी त्यांतील गवत जाळावे लागते….. त्याचे हे असे हसून वावरणे त्यातलेच! जवळची माणसं एका पाठोपाठ गमावली त्याने, पण त्या दु:खाचा निचरा होईपर्यंत त्याला काळाने सवलत दिली नाही… आणि जसा तो लपाछपीच्या खेळात कुणाला सहजी सापडू नये अशा अनवट जागी लपायचा… तसाच तो अचानक कुठे तरी लपला… त्यावेळी त्याच्या सोबत कुणीही लपाछपी खेळत नसताना! आणि आता तर तो कुणालाच सापडणार नाही… कितीही शोधलं तरी!
पण आठवणींच्या चौसोपी वाड्याच्या, एखाद्या अंधा-या खोलीत ठेवलेल्या कणग्यांमध्ये शिगोशीग भरून ठेवलेल्या भाताच्या साळींमधून तो गावरान पण चवदार तांदळाचा सुवास बनून राहील, अशी चिन्हे आहेत. त्याचं अकाली जाणं म्हणजे त्याने आणखी एक केलेली थट्टा असावी, अशी आशा करण्याची हिंमत आता नाही. फक्त त्याच्या या मस्करीमुळे आता हसू मात्र येणार नाही!
पण जेंव्हा कधी कुणी पोरगा भाताच्या खाचरात डोक्यावर पोतं पांघरून भाताची रोपणी करताना दिसेल तेंव्हा हा आठवेल… एखादे हेलिकॉप्टर उंच आकाशात उडत जाताना दिसेल तेंव्हा त्याची आठवण मात्र येईल!
(अशी दुर्मिळ माणसं तुमच्याही सहवासात असतील तर त्यांना सांभाळा!)
– समाप्त –
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈