सुश्री शोभा जोशी
इंद्रधनुष्य
☆ “’शिवगंगा’ आली हो अंगणी…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆
— झाबुआचा सर्वांगीण विकास
(अगदी आत्ताच्या काळात सुध्दा पाण्यासाठी वणवण करणार्या, २/२ मैलांवरून पाण्याचे हंडे डोक्यावरून वाहून आणून पाण्याची गरज भागवणार्या लोकांविषयी आपण ऐकतो पाहतो. विशेषतः महिलांना हे काम करावं लागतं. पावसाच्या पाण्याला योग्य प्रकारे अडवून, ते साठवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी, जंगलवाढीसाठी योग्य रितीने उपयोग केला तर हे संकट टळू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे झाबुआ या आदिवासी बहुल भागात ‘शिवगंगा’ संस्थेने केलेलं काम. )
‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं।
गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं’।।
खरं तर आपल्या देशातील बर्याच गावांमध्ये पाटाचं पाणी ही कवी कल्पनाच राहिली आहे.
माणूस, प्राणी, पशू पक्षी, झाडं एकूणच जीवसृष्टीसाठी पाणी किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. जीवसृष्टीच्या निर्मितीपासूनच पाण्याचं महत्व अधोरेखित झालं आहे.
महाभारतात कौरव-पांडव युध्दानंतर युधिष्ठिराच्या राज्यात एकदा नारदमुनी त्याच्या भेटीला गेले. प्रजेचे क्षेमकुशल विचारताना त्यांनी युधिष्ठीराला विचारले…
कच्चित राष्ट्रे तडागानी पूर्णानि वहन्ति च।
भागशः विनिविष्टानि न कृषि देवमातृका।।
‘हे राजा, तुझ्या राष्ट्रात जलसिंचनासाठी मोठमोठे तलाव खोदण्यात आले आहेत ना? हे सर्व तलाव पाण्याने पूर्ण भरलेले आहेत ना? शेती, देवमातृका म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावर निर्भर नाही ना? ‘ म्हणजेच पावसाचं पाणी साठवणं हे हजारो वर्षांपूर्वी सुध्दा महत्वाचं मानलं जायचं हे नारदांनी विचारलेल्या प्रश्र्नावरून सिध्द होतं.
झाबुआ हा मध्यप्रदेशातील एक जिल्हा. जिल्ह्याची लोकसंख्या १०२४०९१ (२०११ च्या जनगणनेनुसार) आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची११७१’ आहे. साक्षरतेचं प्रमाण ४४. ४५% आहे. प्रमुख नद्या माही, अनास या आहेत. जिल्ह्यामध्ये जवळ जवळ ३७%लोक भिल्ल, भिलाला आणि पटालिया या जनजातींचे आहेत. इथल्या जनजातींबद्दल बरेच गैरसमज पसरविले गेले होते. त्यांना बदनाम करण्यात आले होते.
झाबुआ जिल्ह्यात पाऊस बर्यापैकी पडतो. पण ते पाणी अडविण्याची सोय नसल्यामुळे सर्व पाणी वाहून जात असे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होई. पिण्याला पाणी मिळणे दुरापास्त होई. जंगले उजाड होत. जल, जंगल, जमीन यावर अवलंबून असलेले आदिवासी ना धड शेती पिकवू शकत ना जंगल संपत्तीवर गुजराण करू शकत. त्यामुळे त्यांना कामाच्या शोधात गुजराथ, महाराष्ट्र किंवा इतर राज्यात जावे लागे.
काही संस्थांनी या भागात पाण्याच्या व इतर समस्यांवर कामं केली पण त्यात त्यांनी आदिवासींना सहभागी करून घेतले नाही. त्यांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाहीत. त्यामुळं ही कामं वरवरची झाली. त्यांच्या समस्या तशाच राहिल्या.
या समस्या खर्या अर्थी दूर केल्या पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा आणि त्यांच्या टीम मध्ये असलेल्या डाॅ. हर्ष चौहान, राजाराम कटारिया आणि इतर सहकार्यांनी.
पद्मश्री प्राप्त महेशजी शर्मा, संघाचे स्वयंसेवक. १९९८ला संघाने त्यांच्यावर वनवासी कल्याण परिषदेची जबाबदारी सोपवली. महेशजींनी झाबुआ जिल्ह्यात प्रवास केला. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की, ज्या लोकांना चोर, दरवडेखोर ठरवून त्यांच्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे लोक अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आहेत. कोणाचे पैसे बुडवत नाहीत. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांची पाणी ही मुख्य समस्या आहे. म्हणून शर्माजींनी त्यावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले.
२००७ साली त्यांनी ‘ शिवगंगा ‘ प्रकल्पाची स्थापना केली. त्यांच्या मदतीला होते, दिल्ली आय आय टी मधून सुवर्णपदक प्राप्त करून एम् टेक् झालेले, देश-विदेशातील उच्चपदस्थ नोकर्यांकडे पाठ फिरवलेले, संघ प्रचारक, भिल्ल राजघराण्यातले श्री. हर्ष चौहान आणि जनजातीतील राजारीम कटारिया, ज्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर जनजातीतील लोकांसाठीच काम करायचे ठरविले. हे तिघे वत्यांचे इतर साथीदार यांनी झाबुआला जलमय करायचे ठरविले.
या टीमने प्रथम गावातील तरूणांबरोबर संवाद साधला. संकटात साह्य करणार्या गावातील तरूणांचे सघटन केले. इंदोर मध्ये ‘ ग्राम इंजिनियर वर्क ‘ या संस्थेमध्ये त्यांना प्रशिक्षण दिले. पहिल्यांदा ६ ‘ उंचीचे तलाव बांधून पाणी अडविण्यास सुरूवात केली.
महाभारतातील कथेनुसार भगिरथाने तपश्र्चर्या करून गंगा पृथ्वीवर आणली तेव्हा तिचा आवेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून शंकराची प्रार्थना करून त्याच्या जटांमधून ती जमिनीवर आणली.
अगदी याच तत्वाचा अवलंब करून ‘शिवगंगा ‘ च्या कार्यकर्त्यांनी२००७ पासून पाणी अडविण्यास सुरूवात केली. पावसाळ्यात डोंगरातून धो धो वाहणारे, नुसतेच वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा पिण्यासाठी, शेतीसाठी उपयोग करण्यात येऊ लागला. लोकांच्या साह्याने तलाव बांधले गेले. हजारो बांध बांधले. ग्राम अभियंत्यांना; समतल रेषा, (कंटूर) काढण्याचं, बांध बंदिस्ती, नाला बंडिंगचं, पाणलोट, वृक्ष लागवड यांचं शास्रीय शिक्षण देण्यात आलं. इंजिनिअर्स आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने हाथीपावा पहाडावर १ लाख ११ हजार समतल रेषा (कंटूर ट्रेन्स) पाणी प्रकल्प राबविले. ३५० गावांमध्ये रिचार्जींग हॅंडपंप बसविण्यात आले. ४५०० मेड बंधान, चेक डॅम, तलाव इ. च्या माध्यमातून करोडो लिटर पाणी जमिनीत मुरले आणि जमिनीतील पाण्याचा साठा वाढला. झाबुआ जिल्हा दुष्काळ मुक्त झाला. जिथे वर्षात एकदा मक्याची शेती व्हायची तिथं वनवासी लोक गव्हाची शेती करायला लागले. वर्षातून दोन पिकं घेऊ लागले.
शेतीबरोबरच त्यांना हस्तकलेचे, बांबूपासून निरनिराळ्या वस्तू तयार करण्याचे, कुंभारकामाचे शिक्षण देण्यात आले. बी-बियाणे, वनौषधी यांच्या पारंपारिक जतन करण्याच्या पध्दतीला चालना देण्यात आली.
हलमा… या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ‘ एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ ‘या उक्तीनुसार संकटात असलेल्या भिल्ल कुटुंबाला, सर्व कुटूंबे एकत्र येऊन साह्य करतात. उदा. एखाद्याचे घर पडले तर गावातील सर्वजण एकत्र येऊन त्याचे घर उभे करून देतात.
पडजी… शेतीचे काम असेल तर ८/१० कुटुंबं एकत्र येतात आणि शेतातील कामं निपटतात.
मातानुवन… हा उत्सव वर्षातून ५/६ वेळा सर्व भिल्ल एकत्र येऊन साजरा करतात.
वृक्षारोपण… दुष्काळामध्ये झाडं लावणं बंद झालं होतं. पण आता पुन्हा वन उभारणीचे काम सुरू झाले आहे. ११० गावात ७०, ००० वर झाडे लाऊन झाली आहेत.
विशेष म्हणजे रूरकी, मुंबई, दिल्ली इ. ठिकाणच्या IIT चे विद्यार्थी इथे प्रशिक्षणास येतात.
‘शिवगंगा’ प्रकल्पाने फक्त जलसंवर्धनाचेच काम केले नाही तर आदिवासींचा सर्वांगीण विकास, ग्रामविकास, स्वयंरोजगार याबरोबरच जगाला पर्यावरण संरक्षणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
© सुश्री शोभा जोशी
कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर.
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈